10/09/2025
साधना साप्ताहिक : 13 सप्टेंबर 2025
कव्हर स्टोरी
कोल्हापुरी चपलेचे जातीय अर्थशास्त्र
...... नीरज हातेकर
‘प्राडा’ ह्या फॅशन व्यवसायात जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या कंपनीने आपल्या फॅशन शो मध्ये ‘कोल्हापुरी’सारख्या दिसणाऱ्या चपलांचा वापर केला. त्यानंतर ‘प्राडाने आमचे डिझाईन चोरले’ वगैरे प्रचंड गदारोळ झाला. मग प्राडा कंपनीचे अधिकारी कोल्हापुरात आले आणि काही लोकांना भेटले. त्यांनी केलेल्या ‘पापाचे’ परिमार्जन झाले ही सार्वत्रिक भावना त्यातून निर्माण झाली.
प्राडा कंपनी युरोप, अमेरिकेत लक्झरी चर्मवस्तू विकते. त्यांचे ग्राहक वर्गीय भांडवलदारी समाजातून येतात. कोल्हापुरी चप्पल हे जातीय भांडवली व्यवस्थेतून निर्माण होणारे उत्पादन आहे. दोन्हींमध्ये मूलभूत फरक आहे. वर्गीय भांडवली समाजातील वस्तू उत्पादनाला जे बाजाराचे नियम लागू पडतात, ते तसेच्या तसे जातीय व्यवस्थेतील भांडवलशाहीला लागू पडत नाहीत. कोल्हापुरी चप्पल हे ह्याचे उत्तम उदाहरण आहे.
सामान्य लोक कोल्हापुरी चपलेकडे एक fashion accessory म्हणून बघतात. सणासुदीला, वाढदिवसाला, लग्नाला, भारतीय परंपरागत वेषभूषेसोबत match करायची एक तशी कमी महत्त्वाची जोडवस्तू असा कोल्हापुरी चपलेकडे पाहण्याचा बहुसंख्य लोकांचा सध्याचा दृष्टीकोन आहे. म्हणजे कोल्हापुरी चप्पल ही रोजच्या वापरातील वस्तू नाही. ही वस्तू ठरावीक दिवशीच वापरायची असल्यामुळे ती टिकाऊ व मजबूत असणे आवश्यक नाही. आता ती बहुतांश लोकांना युज ॲण्ड थ्रो प्रकारातील म्हणून स्वस्त हवी आहे. परिणामी, कोल्हापुरी चपलेचे ‘चिल्लरीकरण’ झाले आहे. प्राडा कंपनी मात्र त्यांची अशीच चप्पल सव्वा लाखाला विकायची म्हणते आहे. प्राडाच्या शो मध्ये कोल्हापुरी आल्यावर ‘आमच्याकडे तर ही दोनशे-तीनशे रुपयांना मिळते’ असे सांगणारे खूप इन्फ़्लुएन्सेर व्हिडिओ आले, ते ह्याच चिल्लरीकरणाच्या पार्श्वभूमीवर.
खरे तर कोल्हापुरी चप्पल ही दक्षिण-पश्चिम महाराष्ट्राची आणि उत्तर कर्नाटकाची ओळख आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, अथणी, निपाणी ह्या भागांत कोल्हापुरी चपलांचे पारंपरिक उत्पादन होते. हा बहुतेक भाग पूर्वापार कमी पावसाचा, माळरान, मुरमाड जमिनी असलेला. अशा भूभागात शेती फार पिकत नाही. म्हणून मोठे, संपन्न, तालेवार शेतकरी कमी असत. जे होते ते सरंजामदार, सरदार, वतनदार. बाकी लोकांसाठी पशुपालन हा महत्त्वाचा व्यवसाय. म्हणून ह्या भागात पूर्वापार धनगर समाज जास्त. शेळ्या-मेंढ्या, गाई-म्हशी इत्यादी प्रकारची जनावरे पाळणारे. शेळ्या-मेंढ्यांची कत्तल होते आणि गुरे मरतात, तेव्हा मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महाराची व ढोरांची असते. त्यामुळे दुष्काळी भागातील परंपरेने पिचलेल्या गरीब समूहांसाठी मृत जनावरे हा रिसोर्स असतो. त्या मृत जनावरांचे मांस खाता येते, त्यांच्या कातडीला मूल्य असते. म्हणजे कोणी काय वापर करायचा हे जातीय समाजात ठरलेले. म्हणून मांस महारांचे, कातडी ढोरांनी कमवायची आणि मातंग, चर्मकार समूहांनी त्याच्या वस्तू बनवायच्या ही रचना. पण वस्तू बनायच्या त्या मात्र इतर ‘सवर्ण’ समाजासाठी. जे लोक प्रत्यक्ष ह्या वस्तू बनवत, त्यांचे काम ‘विटाळ’ करणारे. म्हणून ते लोक ‘अस्पृश्य’. सवर्ण समाजाच्या दृष्टीने त्यांचे माणूस म्हणूनच मूल्य कमी. मग त्यांच्या श्रमाला मूल्य, प्रतिष्ठा असण्याचा प्रश्नच नसतो. परिणामी, चप्पल ही रोजच्या वापरात येणारी, गरजेची वस्तू असली, कितीही उत्तम असली, कितीही कष्टाने बनलेली असली, तरी तिला काय किंमत येणार? म्हणजे जातीय उत्पादनात वस्तूंचे मूल्य ती निर्माण करणाऱ्या श्रमिकांचे जातीय उतरंडीत काय स्थान आहे ह्यावर ठरते. वर्गीय भांडवलशाहीत मात्र खरेदीदार आणि विक्रेते ह्यांचे सामाजिक स्थान महत्त्वाचे नसते.
परंपरागत कोल्हापुरी चपलेत ज्याला ‘फुल ग्रेन लेदर’ म्हणतात ते वापरले जाते. म्हणजे जनावराच्या कातडीची सगळ्यात वरची, बाहेरची बाजू. हे कातडे सगळ्यात टिकाऊ आणि लवचीक असते, म्हणून जगभर त्याला चामड्याचा सर्वोत्तम प्रकार मानले जाते. जगात सर्वांत महागडे चामडे हेच असते. हे चामडे कमवायचे काम ढोर समाजाकडे असते. परंपरेनुसार चामडे नैसर्गिक पद्धतीने कमावले जाते. म्हणजे आधी चुना लावून चामड्यावरील केस, मांसाचे चिकटलेले तुकडे वगैरे काढले जातात. नंतर हिरडा, बाभळीची साल, मीठ ह्यांच्या मिश्रणात महिनाभर ते चामडे कमावले जाते. ही वेळखाऊ पद्धत. ते करताना एक विशिष्ट वास येतो. मी मुद्दाम ‘दुर्गंधी’ हा शब्द वापरत नाही. जे लोक हा व्यवसाय परंपरेने करतात, त्यांना ती दुर्गंधी वाटत नाही. ह्या उलट ज्या समूहांना मांस, रक्त, वगैरेची किळस येते, त्यांना ही दुर्गंधी वाटते. मासे न खाणाऱ्या लोकांना बोंबिलाची दुर्गंधी वाटते तसेच इथेही. म्हणजे जातीय समूहात दुर्गंधीलासुद्धा ‘जात’ असते.
साधारण महिनाभर कमावलेले हे चामडे चर्मकार विकत घेतात. पण थेट चामडे कमावणाऱ्या लोकांकडून नाही विकत घेत. कारण चामडे कमाविणाऱ्या लोकांकडून चामडे खरेदी करून चर्मकारांना विकण्यासाठी भांडवल लागते. शिवाय चामडे साठवायला गोडाऊन लागतात. सवर्ण समुदायात काही लोकांकडे भांडवल असले तरी ह्या ‘विटाळ’ असलेल्या धंद्यात ते पैसे गुंतवत नाहीत. त्यामुळे कमावलेले चामडे खरेदी करून पुढे ते विकायचा व्यवसाय मुस्लीम समाजातील लोक करतात. मुंबईतील चामड्याचा बराच व्यवसाय बोहरी मुस्लीम लोक करतात, कारण इस्लाममध्ये हा विटाळ नाहीये. चर्मकार लोक त्यांच्याकडून चामडे खरेदी करतात. रोख पैसे असले तर चांगले चामडे मिळते, अन्यथा कमी दर्जाच्या चामड्यावर भागवावे लागते. चर्मकार लोकांनी खरेदी केलेले चामडे कारागिरांना दिले जाते. कारागीर घरूनच काम करतात. घरातील सगळे ह्या कामात असतात. पुरुष माणसे चामडे मापाप्रमाणे, आकारात कापतात. ‘कापशी’, ‘कुरुंदवाड’, ‘संकेश्वरी’ वगैरे परंपरागत आकार असतात. कापशीचेच ‘कोल्हापुरी माठ’, ‘हनिमाल माठ’, ‘मडिलगे माठ’, ‘पुना माठ’ वगैरे आकार आहेत. चामड्याचे हे तुकडे चेचून चेचून पातळ, समांतर करावे लागतात.
परंपरागत कोल्हापुरी चपलेची खासियत म्हणजे तिचा पट्टा. त्या पट्ट्यावर भरपूर कलाकुसर. बारीक वेण्या. हे काम मशीनने होत नाही. हातानेच करावे लागते. हे काम बहुतेक वेळा महिला करतात. कोल्हापुरी चपलांना किमान दोन तळ असतात. जास्तीत जास्त चार-पाच तळही, काही चपला तर सात-आठ तळीसुद्धा असतात. हे तळ चामड्याच्या धाग्याने शिवले जातात. हे काम खूप कष्टाचे असते. जाड तळातून दाभण आरपार घालून बारीक शिलाई करावी लागते. कारागीर घामाघूम होतात. कधी कधी दाभण बोटात घुसते. मांस खेचून बाहेर येते. म्हणजे कोल्हापुरी चप्पल रक्त आणि घामातून बनलेली असते. ह्यातसुद्धा कारागीर आपली कला दाखवतो. चपलेच्या तळव्यावर पाना-फुलांचे डिझाईन काढतो. पट्ट्यावर भिंगरी, पान, मुंगरणी ह्यांची सजावट करतो. रिंगा लावतो. गोंडे लावतो. चामडे हा कारागिराचा कॅनव्हास असतो. त्यावर त्याची कला व्यक्त होते.
चांगली चप्पल करायला किमान तीन ते चार दिवस लागतात. बऱ्याच वेळेस अधिकसुद्धा. अगदी साध्या कारागिराच्या वेळेची एका दिवसाची 500 रुपये किंमत पकडली तरी इथेच दोन हजार रुपये होतात. त्यात चामड्याची किंमत पकडली, व्यापाऱ्याचा विक्रीचा खर्च पकडला, अगदी साधे 15 टक्के मार्जिन पकडले, तरी रुपये 2000 ते 2500 पेक्षा कमी किमतीत चांगली कोल्हापुरी तयार होत नाही. ह्यात घरातील महिलांच्या श्रमाची किंमत धरलेली नाही. खरे तर सगळ्यात जास्त काम त्या करतात. तरीही चपलेची ही किंमत अनेक लोकांना खूप जास्त वाटते. मग प्राडा कंपनी कशी ही चप्पल 1.6 लाखाला ठेवते?
प्राडा कंपनी ही चप्पल परदेशात विकणार आहे. फुल ग्रेन लेदरचा बूट जर नैसर्गिक पद्धतीने चामडे कमावून, हाताने बनविला, तर युरोप किंवा अमेरिकेत त्याची किंमत 2000 डॉलरपर्यंत जाते. म्हणजे रुपये 1.6 लाख! युरोप व अमेरिकेत प्राडाचे प्रमुख मार्केट आहे, उच्च दर्जाच्या चामड्याला आणि त्याच्या सुंदर वस्तू बनविणाऱ्या श्रमाला आणि श्रमिकांना तिथे खूप मोल आहे. अशा वस्तू महागच असणार हा समज तिकडे आहे. फक्त खूप श्रीमंत लोकच अशा हाताने बनवलेल्या वस्तू वापरतात. उर्वरित लोकांसाठी मास प्रोडक्शनने, यंत्राद्वारे कारखान्यात निर्माण केलेल्या स्वस्त वस्तू असतात. प्राडाची बाजारपेठ असलेला युरोप, अमेरिकेतील समाज वर्गीय आहे, याउलट भारतातील व्यवस्था जातीय आहे. हा खरा फरक. म्हणून भारतात कोल्हापुरी चपलेला किंमत येणार नाही, पण तिच्या डिझाईनमध्ये काही बदल केले तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ती चांगल्या किमतीला विकली जाईल हा साधा व्यापारी हिशेब प्राडाने केलाय.
जातीय समाजात आर्थिक व्यवहाराला, वस्तू उत्पादनाला काही विशिष्ट संदर्भ असतात. ह्या वस्तूंचे अर्थशास्त्र समजून घेताना ते संदर्भ विसरून चालत नाहीत. चामड्याच्या व्यवसायाला ‘विटाळ’ असल्यामुळे अडचणी उभ्या राहतात. ढोर समुदायातील तरुण पिढी आता ह्या व्यवसायाकडे यायला इच्छुक नाही, कारण ते ज्या सवर्ण समाजातील लोकांमध्ये वावरतात, तिथे ह्या व्यवसायाला सामाजिक प्रतिष्ठा नाही. ‘एकवेळ पैसे मिळतील हो, पण मुलगी कोणी देत नाही’ हा सूर खूप वेळा ऐकू येतो. ज्या काही tannery होत्या त्या बंद पडत आहेत. दुर्गंधी, पाणी प्रदूषण वगैरे कारणे दिली जात आहेत. त्यात हल्ली चामडीसुद्धा मिळत नाहीत. आता गावातील जनावर मेले की जेसीबी आणून पुरून टाकतात. उघड्यावर टाकायचे तर तशी जागा नाही आणि टाकले तरी लगेच फडशा पाडायला पूर्वीसारखी गिधाडे नाहीत. गोवंशहत्या बंदीमुळे पूर्वी भाकड गाई व म्हातारे बैल मिळायचे, आता तेसुद्धा मिळत नाहीत. एकूणच चामडे कमवायची महाराष्ट्रातील व्यवस्था मोडली आहे. म्हणून महाराष्ट्रातील कातडी मोठ्या प्रमाणावर चेन्नईला जातात. तेथे रासायनिक tannery आहेत. चामडे क्रोमियममध्ये बुडवून जास्तीत जास्त आठवडाभरात कमावतात. ह्याला प्रेस लेदर म्हणतात. कर्नाटकात मात्र सरकारी प्रोत्साहनामुळे परंपरागत tannery काही प्रमाणात टिकून आहेत. तिथेसुद्धा काही चामडे जाते, पण जास्त प्रमाणात चेन्नईला. महाराष्ट्र शासनाने संत रोहिदास महामंडळ बनविले. सातारा येथे मोठे क्रोमियम tanning युनिट टाकायचे जाहीर केले, पण त्या महामंडळाकडे निधीच नाहीये. म्हणून काम ठप्प आहे. सध्या तरी त्याचा काही विचार नाहीये.
चेन्नईहून कमावलेले चामडे येतात आणि चपला बनतात. पण परंपरागत पद्धतीने बनविल्या तर जो वेळ द्यावा लागतो, जेवढे श्रम खर्च करावे लागतात आणि त्यामुळे जी किंमत यायला पाहिजे, त्या किमतीला इथे मार्केट नाही. इथे लोकांना स्वस्त चपला पाहिजेत, युज ॲण्ड थ्रो. मग त्या पेस्टिंगच्या बनतात. म्हणजे तळ चामड्याच्या वादीने शिवण्याचे कष्ट न घेता, सरळ सरळ सोल्युशनने चिटकवले जातात. चामड्याचे कलाकुसर केलेले पट्टे टाळून कापडाचे, ‘पैठणी’ वगैरे पट्टे लावले जातात. किंवा मग आत फोम वगैरे घालून, वर रेक्सीन लावून ‘मऊ’ चपला केल्या जातात. ह्या टिकाऊ नसतात. परंपरागत कोल्हापुरी चपला आणि ते वापरणाऱ्याचे नाते नवरा-बायको सारखे असते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांत होणारे जमवून घेण्याचे प्रॉब्लेम सुटले की जोडी एकमेकांना वर्षानुवर्षे फिट बसते. त्या तुलनेत स्वस्त कोल्हापुरी ‘वन नाईट स्टँड’ सारख्या असतात. पण आज नव्वद टक्के मार्केट हेच आहे. अशा कोल्हापुरी चपला कोणीही बनवू शकते. दिल्लीला सरोजनी नगर मार्केटमध्ये 165 रुपयांतही कोल्हापुरी मिळते. त्यामुळे परंपरागत कोल्हापुरी चप्पल स्पर्धेत टिकत नाही. ह्याचा परिणाम म्हणून परंपरागत, कसलेल्या कारागिरांना काम मिळत नाही. आधीच सामाजिक प्रतिष्ठा कमी, त्यात काम नाही. म्हणून तसे कारागीर कमी झालेत. मिळतच नाहीत. पुढची पिढी ह्या क्षेत्रात काम करायला तयार नाही. साहजिकच, पुढील काही वर्षांत ही कला नामशेष झाली तर नवल नाही.
काय मार्ग आहे? महत्त्वाचे म्हणजे कोल्हापुरी चपलेकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलायला हवा. चर्मोद्योगाला असलेला जातीय ‘विटाळ’ हा पदोपदी आडवा येतो. चपलेच्या दुकानात काम करायला इतर समाजातील मुले तयार नसतात. कपड्यांच्या दुकानात कमी पैशांत काम करतील, पण चपलांच्या दुकानात नाही. हीच भावना खरेदीमध्ये आहे. ही भावना बदलली पाहिजे. पैठणी साडी जशी आपली सांस्कृतिक ओळख आहे, तशीच कोल्हापुरी चप्पल असायला हवी. सणासुदीला वापरायला जशी ठेवणीतील पैठणी वापरली जाते, तशी ठेवणीतील एखादी चांगली दोन-पाच हजार रुपयांची कोल्हापुरी चप्पल असायला काय हरकत आहे? ह्यासाठी कोल्हापुरीचे लक्झरी हस्तकला म्हणून ब्रँडिंगसुद्धा करायला हवे. विमानतळांवर, मोठ्या मॉलमध्ये, खास कोल्हापुरी आणि परंपरागत पायतानांचे शोरूम का नसावे? समाजातून थोडी जरी मागणी आली तर गुंतवणूक करण्यात अर्थ आहे. पण मागणीच नसेल तर गुंतवणूक कशी करणार? सध्या शासन लीडकोम सारख्या संस्थांतून ब्रँडिंग करायचा प्रयत्न करते आहे. पण हुशारीने बाजारपेठ सांभाळणे हे शासनाचे कामच नव्हे. त्यांना ते जमतच नाही. हे काम खाजगी व्यावसायिकांनीच करायला हवे. शासनाने त्यांना मदत करावी.
सध्या काही तरुण मंडळी हे काम करत आहेत. मुंबईतील भूषण कांबळे या तरुणाची www.vhaan.com ही वेबसाईट आहे. पुण्यात धनंजय जाधव खाल कारागिरी ह्या ब्रँन्डखाली उत्तम कोल्हापुरी चपलांचा व्यवसाय करतो आहे. तुमच्या मापाप्रमाणे, आवडीनुसार बनवून देतो. शिवाय प्रसाद शूज म्हणून पुण्यातच बाजीराव रस्त्यावर दुकान आहे. इथेसुद्धा चांगल्या कोल्हापुरी चपला मिळतात. कोल्हापुरात साईप्रसाद डोईफोडे याने लिमिटेड कंपनी काढली आहे. कोल्हापुरातच प्रसाद शेटे नावाचा तरुण प्रसाद फूटवेअर चालवतो. राज कोल्हापुरी, रुकडीकर लेदर वर्क्स, शुभम सातपुते, हे सगळे तरुण कोल्हापुरीचे ब्रँडिंग व्हावे हा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर नाथाभाऊ चव्हाण, विजय शिंदे ह्यांसारखे स्वतंत्रपणे काम करणारे कसबी कारागीरही आहेत. कोणाला आवश्यकता वाटत असेल तर मला 9820303479 ह्या क्रमांकावर संपर्क करावा, ह्या सगळ्यांशी मी जोडून देऊ शकतो. ह्या तरुणांपुढेसुद्धा अडचणी आहेत. चांगले कारागीर मिळत नाहीत. शासनाने चांगले कारागीर निर्माण करण्यासाठी आयटीआय सारख्या संस्थांतून चांगला कार्यक्रम चालवावा, ही मागणी आहे. त्याचबरोबर भांडवल कमी आहे. रविदास महामंडळ कर्जावर सबसिडी देते, पण मुळात बँकाच कर्ज देत नाहीत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या कर्जाची हमी खरे तर केंद्र सरकारने गेल्या अर्थसंकल्पात घेतली आहे, पण जमिनी पातळीवर परिस्थिती तशी नाही. चर्मकारांना मदत करायला संत रोहिदास महामंडळ काढले आहे, पण निधीअभावी ते काहीच करू शकत नाहीये. चामडे महाग होते आहे. स्वस्तातील चपलांची स्पर्धा प्रचंड आहे.
शासनाने थेट निधी उपलब्ध करावा. परंपरागत tannery व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे. त्याचे आधुनिकीकरण केले तर त्यातील दुर्गंधीही जाऊ शकते आणि त्याबाबत असलेली हीनतेची भावनासुद्धा दूर होऊ शकते. चर्मकार तरुणांचे विक्री, भांडवलाचे, जोखमीचे व्यवस्थापन, हिशेब ठेवण्याच्या पद्धती, एकूणच आधुनिक व्यापार कसा करायचा ह्याबाबत प्रशिक्षण आवश्यक आहे. खाजगी व्हेन्चर गुंतवणूकदारांनी भूषण कांबळे, साईप्रसाद डोईफोडे, शुभम सातुपते, प्रसाद शेटे, धनंजय जाधव यांच्यासारख्या होतकरू आणि धडपड्या तरुणांच्या व्यवसायात गुंतवणूक करावी. पण ह्या सगळ्याचा पाया मागणी आहे आणि मागणी निर्माण करणे आपल्या हातात आहे. परंपरा टिकवायची तर किंमतसुद्धा द्यायला हवी.
नीरज हातेकर, वाई, जि. सातारा
[email protected]
#कोल्हापुरी #अर्थकारण