19/09/2024
Complicated Love (भाग 2)
भाग 1 वरून पुढे
" सत्यमेव जयते..सत्याचाच नेहमी विजय होवो. सत्यप्रकाशाचे किरण या समग्र विश्वात पसरून सर्वत्र शांतता नांदो " प्रतापरावांच्या मनाच्या सप्तद्वारात पडघमांचे कटू सत्य बोल घुमत होते. काळाच्या पाठलागावर असतांना नेहमीच त्यांचा सत्यासाठी प्रदीर्घ असा संघर्ष राहिला होता. पण आता परिस्थिती जरा वेगळी होती.
प्रतापराव देसाई हे रिटायर्ड IPS अधिकारी होते. अतिशय धिप्पाड , उंचपुरे ,दिसायला साधारणतः गहूवर्णीय रंग ,लांबसडक नाक ,वाढलेल्या दाढीमिश्या कुणाचंही लक्ष्य वेधून घेईल असं मजबूत व्यक्तिमत्व .आपल्या नौकरीच्या किंवा जनसेवेच्या कारकिर्दीत प्रतापराव देसाई हे नाव ऐकतांच कितीतरी गुन्हेगाराच्या काळजात धडकी भरत असे. याला कारण म्हणजे कुठेही तडजोड नाही. वारा वाहायला कधीच कुणाच्या परवानगीची आवश्यकता नसते , पाऊसही कधी कुणाची परवानगी घेऊन बरसत नाही. त्याचप्रमाणे प्रतापराव देसाई हेसुद्धा गुन्हेगारांच्या मागावर सुसाट सुटत असे आणी त्यांना समूळ नष्ट करीत असे .भारत सदैव सुख ,शांतमय राहो. तसेच भारतातील स्वकीय असो वा भारताबाहेरील परकीय शत्रुंना चोख आळा बसावं हे त्यांच सदैव ध्येय राहील होत. कुठलंही खोल अंतर्मनात वसलेलं ध्येय मनुष्याला स्वस्थ बसूच देत नाही मग प्रतापराव हे तरी कसे स्वस्थ बसणार होते. सिंह थकला जरी असला तरी डरकाळी फोडायचं कधीच विसरत नाही. आपल धगधगत ध्येय मनात फक्त मृगजळ बनून राहू नये तर त्याला मुर्तिमंत रूप यावं यासाठी प्रतापरावांनी "सत्यप्रकाश" ज्याला इंग्लिश मध्ये lBI नावाची गुप्त अशी संघटना सुरु केली. या संघटनेचा कुठल्याही कागदोपत्री, सोशीअल साईट्स वर कधीच उल्लेख होत नसे. किंबहुना ही संस्था कुणाला ठाऊकच नव्हती. भारत सरकारलाही याबद्दल कुठलीच माहिती नव्हती. एकप्रकारे निरव काळोखात गाडलेली संस्था म्हणजेच IBI. देशात वाढलेला दहशतवाद ,गुन्हेगारी प्रवृत्ती , अवैध ड्रुग्स तस्करी , जंगल तस्करी ,चंदन तस्करी ,अस्त्र शस्त्र तस्करी ,सुवर्ण तस्करी या सर्व बेलगाम काळ्या धंद्यांना लगाम लागावा तसेच देशाला हानिकारक असलेल्या गुन्हेगारांचा आणी विविध गँग्सचा कायमचा खात्मा करणं हे IBI संस्थेच प्रमुख लक्ष्य होत . या संस्थेच्या मराठी आणी इंग्लिशमधील नावात तुम्हाला फार तफावत दिसत असेल पण त्यालाही विशिष्ट असं कारण आहेच . भारतातील काही तरुण ज्यांना देशासाठी काहीतरी परिवर्तनात्मक करण्यासाठी इच्छा आहे. ज्यांची शरीरसृष्टी बलदंड आहे... विशेष म्हणजे ज्यांची देशाप्रती तळमळ आहे अश्याना या संस्थेत निवळून गुप्तपणे घेतलं जात असे. या संस्थेच्या सभासदांच जाळ सर्व भारतभर पसरलं होत. या संस्थेची माहिती कुठेही जाऊ नये यासाठी सर्वजण फार काळजी घेत असे.
या संस्थेचा मुख्य कार्यकारी रणनेता म्हणजे करण अरोरा... काही दिवसापूर्वी झालेल्या झटपटीत तो गंभीर जखमी झाला होता .त्यामुळे अर्जुन सरनाईक हा सध्याचा कार्यकारी रणनेता होता. जो कितीतरी भंयकर गँग्स आणी दहशतवाद्यांना पुरून उरला होता. त्यांची विशेषता म्हणजे तो ही गुन्हेगारांच्या मागे अगदी जीव आटवून सुसाट सुटत असे.
ईगल गँग्स, TRI , वीच गँग्स ,स्क्रोपियन गँग्स ह्या भारतातील ड्रुग्स , चंदन , अवैध सुवर्ण , जंगल तस्करी करणाऱ्या घातकी गँग्स आहे. IBI आणी या सर्व गँग्सचा संघर्ष कायम राहिलेला आहे. ईगल गँग्स ही देश विदेशातून ड्रुग्स आणून भारतात अवैधरित्या स्मगलिंग करणारी सर्वात निच्च्ततम गँग्स राहिली आहे . आता या गँग्सचा प्रमुख वेक्टर हा आहे . मागच्या काही झटपटीत अर्जुनने ईगल गॅंगच्या बऱ्याच लोकांना मृत्यूचा रस्ता दाखविला म्हणून वेक्टरला नाईलाजाने या प्रकरणात लक्ष्य घालावं लागलं. व्हेक्टर म्हणजे साक्षात यमराजाच्याच रूप.
प्रतापराव देसाई यांनी आज सर्व मेंबर्सची IBI ऑफिस मध्ये मीटिंग बोलावली होती. विषय जरा गंभीरच आहे. कसल्यातरी नवीन मिशनची ते आज घोषणा करणार होते. वर्तुळाकार टेबलावर बसलेल्या सर्वांवर नजर फिरवित ते म्हणाले
" मिशन धवल...हे आपलं आता सर्वात महत्वाचं नवीन मिशन असणार आहे ".
सर्वांच्या कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं होत. मनावर शंके कुशंकेची चादर पसरली होती.
" मिशन धवल नेमकं निगडित तरी कशाशी आहे ?" अर्जुनने लगेचच प्रश्न विचारला.
" Fentanile ( फेंटानाईल ) शी ...आज जर ड्रुग्सची 1 ते 10 अशी क्रमवारी लावली तर हिरोईनचा दुसरा क्रमांक येईल तर फेंटानाईल हे ड्रुग्स दहाव्या क्रमालाही पार करून एकराव्या क्रमांकावर येईल.एकदम सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास हिरोईन म्हणजे उशीने मारून लागलेला झटका तर फेंटानाईल म्हणजे ट्रेन सोबत झालेली जबरदस्त टक्कर. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणात फेंटानाईल भारतात आणून त्याची अवैधरित्या तस्करी करण्याच नियोजन ईगल गँग्सच आहे. बुद्धीच्या पलीकडे त्यांच्या तस्करीची पद्धत आहे .कुणी विचारही करू शकणार नाही अश्या ते रिकाम्या सुतळी पोत्यातून ते फेंटानाईल भारतात आणणार. अगदी सविस्तरपणे सांगायचं झाल्यास सुतळी किंवा ज्यूटचे पोते यांना हिरोईन या रसायनात कितीतरी दिवस बुडवून ठेवले जातात. त्यामुळे त्या पोत्याला हिरोईन आपोआपच चिकटली जाते. नंतर काही दिवस दिवस ते पोते सुकवले जातात. त्यानंतर त्या पोत्यात जिरं भरून भारतात पाठवली जातात. भारतात फक्त जिऱ्याची अवैधरित्या तस्करी होत आहे कि नाही याचीच फक्त
खात्री केली जाते .त्या पोत्यावर साधं कुणाचं लक्ष्यही जात नाही .त्यानंतर त्या पोत्यांना दिल्लीच्या अवैध कारखान्यात घेऊन त्यावर विविध रासायनीक प्रक्रिया केल्या जातात. शेवटी त्या पोत्याला जेवढ्या प्रमाणात हिरोईन चिकटला असतो तेवढ्याच प्रमाणातला फेंटानाईल मिळवला जातो. साधारणतः एका पोत्यापासून 1 किलो फेंटानाईल मिळवला जातो. ज्याची किमंत करोडो रुपयात आहे. या फेंटानाईलमुळे भारताची तरुण पिढी देशोधळीला लागेल. फेंटानाईलची अवैध्य तस्करी भारतात थांबवण्याच मिशन म्हणजेच.... मिशन धवल". सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नांची वलये गरगर फिरू लागली होती.
" मग यासाठी कुठली योजना आखली आहे आपण ?" अजींक्यने प्रश्न विचारला.
" आपण हे कार्य दोन गटात विभागल आहे. भारतात चेक पॉईंटवर या जिऱ्याच्या पोत्याची तपासणी झाल्यावर त्यातला जिरा हा वेगळा करून मसाल्यांच्या दुकानात नेला जाईल तर ते हिरोईन चिकटलेले ज्यूटचे किंवा सुतळीचे पोते डोंगरांच्या शांत रस्त्याने दिल्लीतल्या अवैध कारखान्यात आणले जाईल. आपला एक गट ज्यात प्रमुख समीर ,अर्णव आणी बरेच जण असेल ते सर्व त्या कारखान्याला उध्वस्त करेल तसेच त्या कारखान्यात वापरले जाणारे रसायनही आपल्या ताब्यात घेईल. त्या रसायनावरून नक्की कुठल्या रासायनिक क्रिया त्या कारखान्यात होतात हे समजण्यास हातभार लागेल . दुसरा गट ज्यात अजिक्य आणी अर्जुन असेल तो गट डोंगरांच्या रस्त्याने येणाऱ्या गाडीला संपवून ते ज्यूटचे किंवा सुतळीचे पोते आपल्या ताब्यात घेतील .त्यामुळे अश्या प्रकारची तस्करी भारतात किती खोलवर रुतली आहे याचा छडान छडा लागू शकेल. उद्या "मिशन धवलला" पूर्ण करण्याचा शिवधनुष्य या दोन गटांना पेलावा लागेल. या मिशनला पूर्ण करणे एवढं सोपही नसेल कारण ईगल गँग्सचा सर्वाधिक क्रूर , भयंकर असा गंगस्स्टर वेक्टर हा या मिशनला पूर्ण करण्यात सर्वात मोठा अडथळा असेल". प्रतापराव आता शांत झाले होते . त्याच्या किलकिल्या नेत्रात उद्या होणाऱ्या मिशन धवलच्या चिंताछटा स्पष्ट दिसत होत्या. हे मिशन पूर्णतः फत्ते होईल यांची त्यांना शाश्वतीही होतीच कारण अर्जुन त्यांच्यासोबत होता.
निळ्या नभाच्या आकाशाला दूर सारून सूर्यांच्या पिवळसर किरणांनी धरतीवर आपले पाऊल ठेवले होते. दिवस उजाळला होता. मिशन धवलच्या योजनेनुसार दोन्ही गटांनी आपापल्या मार्गाकडे कुच करायला सुरवात केली होती. एक गट ज्यात समीर आणी अर्णव होते ते वाऱ्याच्या वेगाने दिल्लीच्या अवैध कारखान्याकडे मार्गक्रमण करीत होते. अजिक्य आणी अर्जुन हे डोंगरात लपून ज्यूटच्या पोत्याची गाडी येण्याची वाट पाहत होते. अर्जुनचा मेंदू आणी मन दोन्हीही दोन वेगळ्या दिशेला धावत होते. ज्याप्रमाणे समुद्राला ओहोटी येते आणी पाणी मागे मागे सरू लागते त्याचप्रमाणे त्याचे विचारही त्याच्या अस्तित्वाबद्दल मागे मागे सरू लागले होते. मनाच्या खोल गाभाऱ्यापर्यंत जिथे भावनेचा उगम आहे अश्या जागी त्याचे विचार आठवणींचा शिरोबिंदू शोधत होते ..पण नक्की कुठल्या आठवणी. जणू दोन अर्जुन ...मनाच्या कोपऱ्यात दडलेला एक अर्जुन तर जगासमोर वावरणारा एक अर्जुन या दोघांमध्ये जणू एक शीतयुद्धच सुरु होते. दोघांचं स्वरूपही कमालीच भिन्न होत. दूरवरून अस्पष्ट दिसणाऱ्या गाडीला पाहून अर्जुन सावध झाला. हातातली बंदूक घेऊन तो रस्त्याच्या मधोमध उभा राहिला. गाडीचा वेगही कमी झाला होता. आपल्या हातातील बंदुकेतील एक गोळी त्याने समोरच्या गाडीवर चालवली .
ताडकन समोरच्या गाडीवरची काच फुटली. तशीच त्याच्या आडव्या दिशेने येणाऱ्या म्हणजेच डाव्या हाताकडून येणाऱ्या गाडीने त्याला धाडकन उडविले. टक्कर एवढी भीषण होती कि अर्जुन कितीतरी दूर फेकल्या गेला होता. त्या गाडीतून एक उंचपुरा पुरुष बाहेर आला. चेहऱ्यावर त्याने काळा मास्क मंकी टोपी घातली होती. अर्जुन जवळ जाऊन त्याने आपल्या हातातील बंदूक अर्जुनवर रोखली.
" हा नक्की कोण आहे ? हा वेक्टर तर निश्चितपणे नाहीच ...मग नक्की हा आहे तरी कोण . कुठल्या दुसऱ्या गॅंगचा तर सदस्य असेल का .कि आणखी काहीतरी वेगळंच रहस्य आहे " त्या क्षणिक काळात अजिंक्यच्या मनाला बरेच प्रश्न सतावत होते .
-------------------------------------------------------------------
हॉस्पटिलमध्ये अदितीचे डोळे उघडले. अदिती दिसायला ही साधारणतः गोरी पण चेहऱ्यावर लख्ख पिवळसर तेज , लांबसडक काळे केस , मासळीसारखे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ, कमनीय बांधा , पिटुकलंस नाक एकंदरीत काय तर अदिती दिसण्यात सुंदर आहे . गोळी लागल्यामुळे तीच सर्व शरीर वेदनेनं जखडलं होत. हाताला लागलेल्या सलाईनमुळे कुठलीही हालचाल करण्यास ती असमर्थ होती. ओठावर हलकंसं हास्य फुललं होत पण क्षणातच ते हास्य कुठेतरी हरवून गेल. तिच्या मनाच्या सुंदर चित्रात कितीतरी रंग उधळले होते पण त्या सर्व रंगात प्रेमाच्या गुलाबी रंगाची फारच कमतरता होती. शिवाय विरह रंग अधिकच गडद होत चालला होता. समोरच्या काचावर दिसणाऱ्या दोन सावल्या ऐकमेकांपासून पार दूर चालल्या होत्या . त्या सवाल्यांना पाहून ती भूतकाळात कुठेतरी हरवून गेली होती.
एका वर्षाच्यापूर्वीचीही गोष्ट. अदिती मुंबईत नवीनच होती. या धाकधुकीच्या मुबंईत काही नव्या गोष्टी Enjoy कराव्या म्हणून आज पहिल्यांदाच ती मुबंईतल्या कसबा कॅफेत एकटीच बसली होती. तिने दिलेल्या स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफीच्या ऑर्डरची प्रतीक्षा करण्यात ती मग्न होतीच कि एवढ्यात कुणीतरी फोनवर बोलता बोलता कॅफेत प्रवेश केला. ती त्याला मागे वळून पाहणारच एवढ्यात त्यांच्याच जोरदार धक्का तिला लागला .खरंतर अदितीला फार राग आला होता पण त्याला पाहताच तिचा राग कुठेतरी विरून गेला. त्यानेही हलकंस स्मितहास्य देऊन सॉरी म्हटलं. अदितीनेही त्या स्मितहास्याला स्मितहास्यानेच प्रतिसाद दिला . तो थोडा दूर समोरच्या टेबलावर बसला होता .आपल्या खिशातली बारीकशी डायरी काढून त्यावर काहीतरी लिहण्यात तो गुंग झाला होता.
तो दिसायला कमालीचा आकर्षक होता..सहा फूट उंचीचा ,देखणा ,रुबाबदार , अंगात आकाशी शर्ट आणी त्यावर काळ्या रंगाचा पॅन्ट .त्याला पाहताच अदितीच्या मनात प्रेम कृष्णकमळ कळ्यांनी गुंजराव केला. पहिल्या नजरेतील प्रेम असेच त्याला म्हणावे लागेल. कॅफेमधील हलक हलक संगीत तिच्या कानाला तृप्त करीत होत .
💕💕 प्यार का दर्द है , मिठा मिठा ,प्यारा प्यारा
प्यार का दर्द है ,मिठा मिठा ,प्यारा प्यारा
ये हसी दर्द ही दो दिलो का है सहारा 💞💞
क्रमश ....
कथेचे पुढील भाग मिळवण्यासाठी Page ला Follow करा!