15/11/2025
काल मध्यरात्रीनंतर दवाखान्यात एक जोडपं आलं होतं. नवरा बायको... दोघंही पंचवीसच्या आतील असतील. एक म्हातारी बाई सोबतीला आणि पुरुषाच्या हातामध्ये अलगद उचलून घेतलेलं बाळ होतं. त्या दहा महिन्याच्या बाळाभोवती थंडी वाजू नये म्हणून छान नवीनच घेतलेली कापडं पांघरलेली होती.
पांघरूण उघडून बघत विचारलं,
"काय झालं?"
तसं आई हलकं स्मित करत म्हणाली,
"काही नाही हो डॉक्टर... थोडी सर्दी झाली आणि ताप आला."
त्या दहा महिन्याच्या मुलीची हाताची नाडी तपासून म्हणालो,
"पहिल्यापासून सांगा..."
तसं वडील म्हणाले,
"आमचं बाळ आधीपासूनच थोडं कुपोषित आहे, वजन कमी आहे. मान धरत नाही. थोडं काही झालं की आजारी पडते. आता थंडी पडली की लगेच सकाळपासून ताप आला."
"मग काय केलं?"
"घराजवळच्या एका दवाखान्यात घेऊन गेलो. तर डॉक्टरने सांगितलं बाळाला ऑक्सिजन कमी पडतोय, आयसीयूत भरती करावं लागेल. त्यांच्याकडे आयसीयूची व्यवस्था नव्हती म्हणून त्यांनी दुसरीकडे जायला सांगितलं.
"मग?"
तसं तो पुरुष म्हणाला,
"मी ऑटो चालवतो, खिशात काहीच नव्हतं. दवाखान्यासाठी पैसे नव्हते म्हणून आम्ही घरी गेलो. इकडेतिकडे, मित्र, नातेवाईक सर्वांना फोन केले. पाच हजार रुपये जमा होत नव्हते... तीन- चार तास झाले पण पैसे जमले नाही. शेवटी रात्री अकरा वाजता घरातला शेवटचा छोटा दागिना 'जवळच्या' एकाला विकून पैसे घेऊन दवाखान्यात गेलो. त्यांनी आम्हाला इकडे पाठवलं..."
त्या बाळाच्या अंगावरून काढलेलं पांघरूण नीटपणे परत तसंच ठेवत शांतपणे म्हणालो,
"तुमचं बाळ नाही राहिलं..."
मृत घोषित करताना प्रत्येकवेळी जी हृदयाची धडधड होते आज ती पुन्हा झाली. मुलीच्या बापाने बाजूचा टेबल घट्ट धरला... आईच्या चेहऱ्यावर तसंच हलकं स्मित होतं!
मी काय बोललो ते तिला कळलं नव्हतं! कदाचित कळलंही असावं पण तिला ते ऐकायचं नव्हतं!
काही क्षण गेले आणि आई तसंच स्मित ठेवत म्हणाली,
"काय म्हणले?"
"तुमचं बाळ जिवंत नाही!" माझा घसा कोरडा पडला होता.
आईच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं... ते बघवत नव्हतं. तिच्या मनात काय सुरु असेल?
बाजूला घाबरलेल्या अवस्थेत उभ्या असलेल्या नवऱ्याकडे बघत म्हणालो,
"त्यांना सांगा, बाळ जिवंत नाही म्हणून... रडू द्या त्यांना... नाहीतर यांचं हृदय फुटेल.!"
त्या बापात तरी कुठं ताकद शिल्लक होती. माझं बोलणं त्या आईच्या कानावर जातच नव्हतं! तिनं शांतपणे त्या बाळाच्या नवीन कपड्यांसहीत उचललं आणि छातीला घट्ट बिलगावलं. इतकं घट्ट की आई कोणती आणि बाळ कोणतं ओळखू येत नव्हतं...
बाप तसाच थरथरत उभा होता. आई बाळाला घेऊन एकेक पाऊल टाकत निघून गेली. काही वेळाने दूरवरून भिंतीपलीकडून मोठा टाहो ऐकू आला...
बापाच्या मुठीत घट्ट आवळून धरलेल्या काही नोटा घामाने ओल्या झाल्या होत्या...
डॉ. प्रकाश कोयाडे
Avdhut-अवधूत #