
20/03/2024
चिमणी
अंगणात चिमण्यांचा कलकलाट चालला होता. खिडकी वरील सज्जावरून चिमणीचे एक पिल्लू खाली पडले होते. पंधरा वीस चिमण्या आजूबाजूला प्रचंड चिवचिवाट करत होत्या. घराचे आम्ही सर्व आणि काही शेजारी अंगणात दुरूनच हे पाहत होतो. त्या छोट्याशा पिल्लाला पंख नीट फुटलेले नव्हते. वर घरट्या पर्यंत पिल्लू जाणे अशक्यच होते. चिमणीच्या पिल्लाला हात लावायचा कि नाही हाच एक बिकट प्रश्न आम्हा सर्वांना होता. खाली राहिलेले पिल्लू मांजरासाठी आयती मेजवानीच होते. पण आपण हात लावला तर चिमण्या पिल्लाला चोची मारून मारून टाकतील ही भीती आम्हाला वाटत होती.
माझ्या लहानपणी असे बऱ्याचदा घडायचे. चिमणीच सोवळ फारच कडक होत. त्यामुळे काही चिमण्यांचा जीवही जायचा, पण तरी सुद्धा घरात खूप चिमण्या यायच्या. घरात ऊंच लावलेल्या तिरप्या फोटोमागे हमखास घरटे करायच्या. खूप कचरा व्हायचा खाली. पण घरट्यातली पिल्ले चिवचिव करायला लागली कि खूप मज्जा यायची. मी खूप वेळ त्यांची गम्मत बघत बसायचो.
अशीच आरश्या समोरची जागा सुद्धा चिमण्याची आवडती होती. माना वाकड्या करून चिमण्या आरश्यात स्वतःला पहायच्या आणि आरश्यावर खूप चोचा मारायच्या. मी दुपारी अभ्यास करताना आरश्यावर सारखा टकटक आवाज यायचा. एकदा तर आरश्याची काच सुद्धा फुटली होती.
घराच्या मागे एक वावडीन्गाचा वेल होता. त्याला मिऱ्यासारखी बारीक बारीक गडद जांभळी फळे यायची. चिमण्या त्याची फळे खूप खायच्या आणि इकडे तिकडे पांढरीच्या ऐवजी जांभळी शी करून ठेवायच्या.
उन्हाळ्याच्या दिवसात अधून मधून पंखा लावला जायचा. पण चिमणी घरात आली की पंखा लगेचच बंद करावा लागे. तरीही अधूनमधून एखादी चिमणी पंखा लागून घायाळ व्हायची. कोपऱ्यात पडलेल्या चिमणीच्या चोचीवर आम्ही थोड पाणी टाकत असू. बहुतेक वेळा चिमणी थोड्या वेळाने उडून जायची.
माणसांच्या प्रमाणे चिमाण्यांमध्ये सुद्धा चिमणा आणि चिमणी असे. चिमणा थोडा काळा आणि जाडा दिसायचा, तर चिमणी गोरी आणि नाजूक दिसायची.
लहानपणी चिऊ काऊ ची गोष्ट ऐकल्याच काही आठवत नाही, परंतु चिमण्यांचा खेळ मात्र खूप आवडीने बघितलाय. लहानपणी घरात येणाऱ्या चिमण्या आता अंगणात सुध्दा दिसत नाहीत. अगदी गच्ची वरून सुद्धा उडताना दिसत नाहीत. मध्ये एकदा वाचण्यात आल कि mobile मुळे चिमण्या मरतात. खरे खोटे माहित नाही पण चिमण्या दिसत नाहीत हे खरच.
तसा चिमणी काही माझा आवडता पक्षी नाहीये . पण बालपणीचा एक सोबती हरवला म्हणून मन फार बेचैन होत होतं. आणि तशात माझ्या छोटीने “चिऊ दाखवा” अशी मागणी केली. आणि मग चिमणी शोधण्याचा उपक्रम सुरु झाला. सिमेंटच्या जंगलात गच्चीवर कबुतरं सहज दिसायची, झाडावर किंवा इकडे तिकडे साळुंकी व बुलबुल दिसायचे. इतकच काय तर पूर्वी क्वचितच दिसणाऱ्या काळ्या किंवा पिवळ्या चिमण्यासुद्धा सहज इकडे तिकडे दिसल्या. पण आपली ती नेहमीची चिमणी काही घराच्या आसपास दिसलीच नाही. थोडा विचार केल्यावर लक्षात आल की रोज सकाळ संध्याकाळ घरात उड्या मारणारी चिमणी कित्येक वर्षात आपल्या घरी आलीच नाही.
आणि शोध सुरु झाला.
कॉलनीत व शहरात इतरत्र पाहत असता लक्षात आले की चिमण्या काही सगळीकडे दिसत नाहीत. काही काही ठिकाणी दिसतात तर कुठे मुळीच दिसत नाहीत. मोठ्या बिल्डींग किंवा अपार्टमेंट येथे चिमण्या जवळपास नव्हत्याच. सुबक प्लास्टरच्या उंचच उंच इमारतीवर चिमण्याच्या घरट्यासाठी कुठेही छिद्र किंवा सोईची जागा नव्हती. तसेच जमिनीवर फारश्या किंवा सिमेंट ब्लॉक लावलेले दिसले. साधी जमीन अशी नव्हतीच. काटलेल-छाटलेल एखाद झाड कोपऱ्यात दिसलं. तेथे चिमण्या नव्हत्याच.
कॉलनीतील बहुतेक घरं आता दोन माजली झाली आहेत व बहुतेक ठिकाणी फारश्या किंवा ब्लॉक्स लावले आहेत. फक्त एकाच ठिकाणी अर्ध्या प्लॉटवर घर व बाकी जागा मोकळी आहे. आणि तेथेच चिमण्या बागडत होत्या. बराच वेळ तेथे चिमण्यांचा खेळ पाहत होतो. चिमण्या मातीत खेळत होत्या. छोटे छोटे खड्डे करुन माती उडवत होत्या. गवतातून कड्या व गवताची पाते घेऊन भूर्र उडत होत्या. प्लास्टर नसलेल्या विटकरींच्या भिंतीच्या छिद्रात त्यांची घरटे होती. दीड दोन वर्षांची माझी छोटी चिमण्यांचा खेळ पाहत चांगलीच रमली होती.
पण माझा मात्र शोध सुरु झाला होता. कुठेही फिरत असताना नजर चिमण्यांचा शोध होती. आधी सगळीकडे दिसणाऱ्या चिमण्या आता शहरात ठराविक ठिकाणीच दिसत होत्या.
१. मोबाईल टॉवर च्या जवळपास च्या भागात चिमण्या मुळीच नव्हत्या
२. ज्या घरांच्या जवळपास गवत, माती व मोकळी जागा होती तेथे चिमण्या होत्या
३. चिमण्यांचा मातकट विटकरी रंग माती, वाळकं गवत, विटांच्या भिंती, कौलारू छिद्र ह्यात मिसळून जातो. चिमण्यांच्या अधिवासा साठी ह्या गोष्टी लागतात.
४. छोटी किडे व गवताच्या बिया हे चिमण्यांच अन्न. कीटक नाशके, सिमेंटचे ब्लॉक, प्लास्टर केलेल्या भिंती हे चिमण्यांचे विनाशक.
चिमणी तसा धीट पक्षी आहे आणि थोडी सोय झाली तर नक्की आपल्या घराच्या आसपास येईल. त्यासाठी घराच्या बाहेरून चिमण्यांना घरट्यासाठी भिंतीत खोपे ठेवा, नसता आडवी सुरई किंवा आडवे पाईप लावून सोय करा. घराच्या आजूबाजूला माती असलेली व गवत उगवलेली जमीन ठेवा. वायफाय व मोबाईल चा वापर गरजेपुरता करा.
चिमण्या नक्की येतील.