14/09/2025
मराठा समाज सुधारणा मंडळाची बैठक संपन्न
बेळगाव प्रतिनिधी
मागासवर्ग आयोगामार्फत 22 सप्टेंबरपासून सुरू होणा-या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणावेळी मराठा समाजातील सर्व पोटजातीनी धर्म हिंदू,जात मराठा, पोटजात कुणबी व भाषा मराठी अशी नोंद करावी असा महत्वपूर्ण ठराव मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात आला.
मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते तर व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सहचिटणीस संग्राम गोडसे, खजिनदार के एल मजूकर कार्यकारिणी सदस्य एस.ओ.जाधव, ईश्वर लगाडे, दत्तात्रय जाधव, राजू पावले, शीतल वेसणे, प्रकाश गडकरी उपस्थित होते.
यावेळी दहावी. बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच अन्य परिक्षेत चांगले यश मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा अशीही सूचना मांडण्यात आली. विवाहाची आचारसंहिता ठरविण्यासाठी लवकरच व्यापक बैठक बोलाविण्यात येईल तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना योग्य ती आर्थिक मदत देण्यासाठी शैक्षणिक निधी उभारण्यासाठी समाजातील सधन व्यक्तीनी यथायोग्य मदत करावी असे आवाहन श्री मरगाळे यांनी करताच उमेश पाटील यांनी 11000 व विनोद आंबेवाडीकर यांनी 5000 रूपयांची देणगी जाहीर केली. यावेळी समाजाच्या कार्यक्रमास वेळोवेळी विनामूल्य सभागृह देणा-या मराठा मंदिर ट्रस्ट व गेले कित्येक वर्षे मंडळाचे लेखापरिक्षण विनामूल्य करून देणारे अनिल मंडोळकर व सुनिल आनंदाचे यांच्याही अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी नेताजी जाधव, परशराम कोकितकर,सतिश देसाई, दीपक किल्लेकर, मोहन कंग्राळकर, राजू मर्वे आदींनी उपयुक्त सुचना मांडल्या.
शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत वाचून त्याला मंजुरी घेतली. सन 2024-25 सालचा जमाखर्च व ताळेबंद के एल मजूकर यांनी सादर करून त्याला मंजुरी घेतली. 2025- 26 सालासाठी लेखापरिक्षक अनिल मंडोळकर व सहाय्यक म्हणून सुनील आनंदाचे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. ईश्वर लगाडे यांनी आभार मानले.