21/09/2025
राष्ट्रवादीच्या योगेश क्षीरसागरांची जवळीकता भाजपाशी की, जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून पंकजा ताईंशी?
भाजपाच्या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावल्याने शहर वासियांच्या भुवया उंचावल्या
बीड | किसान न्युज
डॉ. योगेश क्षीरसागर यांनी आज भाजपा कडून आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा रत्न मॅरेथॉनला आवर्जून हजेरी लावल्याने शहर वासियांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादीच्या डॉ. योगेश क्षीरसागर यांची ही जवळीकता नेमकी भाजपाशी आहे की, जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांच्याशी आहे अशी चर्चा सुरू झाली असून, येणाऱ्या काळात ते पक्षप्रवेश तर करणार नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
डॉ. योगेश क्षीरसागर हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीत असून, ते बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. परंतु शहराचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी गटबाजी दिसून येत असून, या गटांचा डॉ. योगेश क्षीरसागर यांना विरोध दिसून येत आहे. फक्त पक्षप्रमुख जिल्यात आल्यानंतरच हे सर्व गट एकत्र दिसतात. ते गेले की, यांची दिशा विरोधात होते. एकीकडे पक्षात असे चित्र असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आलेल्या असल्याने हे एकत्र लढणार का? अशी शंका शहरात व्यक्त केली जात असताना काही घटना पाहता डॉ. योगेश क्षीरसागर आवर्जून पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत. आज रविवार शहरात भाजपाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे “नमो युवा रत्न नशामुक्त भारत मॅरेथॉन स्पर्धे”चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा भाजपा या पक्षाचा कार्यक्रम असतानाही राष्ट्रवादीचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी याही कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावल्याचे दिसून आले. मित्र पक्ष असलेतरी काही वेळा पक्षाच्या कार्यक्रमांना जाणे टाळले जाते पण डॉ. योगेश क्षीरसागर यांनी न टाळता पूर्णवेळ या कार्यक्रमाला हजर राहिले. यामुळे ही त्यांची जवळीकता भाजपाशी आहे की, जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून पंकजा मुंडे यांच्याशी आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच ते राष्ट्रवादी ऐवजी बऱ्याचदा भाजपाच्या गोतावळ्यात दिसून येतात. जवळ आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि भाजपाची जवळीकता पाहता बीडकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर येत्या काही दिवसांत डॉ. योगेश क्षीरसागर वेगळा काही निर्णय घेत पक्ष तर बदलणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. अशी शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण यास काही दुजोरा मिळाला नाही. यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर यावरचा पडदा उघडला जाईल यामुळे तोपर्यंत लोकांच्या चर्चा सुरुच राहतील असे दिसून येत आहे.
.तर चुलते-पुतणे ही सोबत दिसत नाहीत
विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज ऐनवेळी मागे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांचा प्रचार केला आहे. पण या निवडणुकीच्या नंतर हे दोघे चुलते पुतणे कधीच एकत्र दिसून आले नाहीत. तसेच सध्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने डॉ. सारिका क्षीरसागर यांनी 'दांडिया नाईट नवजलसा' हा कार्यक्रम आयोजित केला. याचे बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत. यावर काकु-नाना, भारतभूषण क्षीरसागर, दिपा क्षीरसागर यांचे फोटो आहेत. परंतु यातील एकाही बॅनरवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा फोटो दिसत आहे. यामुळे निवडणूक झाली की, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी चुलत्याची ही साथ सोडली की,काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ajit Pawar Pankaja Gopinath Munde Dr Pritam Gopinath Munde Dhananjay Munde Yogesh Kshirsagar NCPSpeaks_Official