29/04/2026
२७ वर्षीय दलित तरुणाला पोलीस व जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तडफडून मारले.!
कोठडीत पोलिसांकडून बेदम मारहाण तर डॉक्टरांचे दहा फुटावरून उपचार
आरोपीवर उपचार न करणे हे कायद्यात आहे का ? मागासवर्गीय नेत्यांचा संतप्त सवाल
बीड/जगमित्र न्यूज
केज तालुक्यातील काळेगाव घाट येथील २७ वर्षीय आशिष अशोक धीवार या दलित तरुणाचा मंगळवारी जिल्हा रुग्णालयातील कैद्यांसाठी असलेल्या लॉकअप वॉर्डमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून बेदम मारहाण तसेच डॉक्टरांकडून योग्य उपचार न केल्याचा गंभीर आरोप नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष धीवार याला केज पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. त्याच्या भावाच्या आरोपानुसार, संबंधित गुन्ह्यात कठोर कलम लागू न करण्यासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र पैसे न दिल्याने आशिषला पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मारहाणीमुळे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथेही त्याच्यावर आवश्यक त्या प्रमाणात उपचार करण्यात आले नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.आशिषला कैद्यांसाठी असलेल्या लॉकअप वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. त्याचे हात-पाय बांधण्यात आल्याने त्याला हालचाल करणे शक्य नव्हते. त्याची प्रकृती गंभीर असतानाही डॉक्टरांनी वेळेवर तपासण्या केल्या नाहीत किंवा योग्य वैद्यकीय उपचार दिले नाहीत, असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, उपचारादरम्यान नातेवाईकांना त्याला भेटण्यास मनाई करण्यात आली होती तसेच त्याच्या प्रकृतीविषयी माहितीही देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर आशिष धीवार याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच दलित समाजातील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, संबंधित पोलीस अधिकारी, डॉक्टर व इतर जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, “एका कैद्याला उपचार घेण्याचा मूलभूत अधिकार नाही का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच हा मृत्यू पोलीस अत्याचार आणि वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे.दरम्यान, या प्रकरणी अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, संबंधित विभागांकडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी जोर भरत असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
Ooooooooooo
डॉक्टर प्रत्यक्ष तपासणी न करता लॉकअपच्या बाहेरूनच करतात उपचार
मानवतेला काळिमा फासणारी बाब म्हणजे, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी या तरुणाला स्पर्श करण्याचेही सौजन्य दाखवले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर लॉकअपच्या बाहेरून, तब्बल १० फुटांच्या अंतरावरून रुग्णाची 'तपासणी' करत होते. डॉक्टरांचे हे वागणे म्हणजे वैद्यकीय व्यवसायाला लागलेला कलंक असल्याची टीका होत आहे. "आरोपीवर उपचार न करणे कोणत्या कायद्यात बसते?" असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
Ooooooooooo
रुग्णालयाच्या लॉकअप मध्ये असताना आरोपी रुग्णाला कॉटला बांधून ठेवण्याचे कारण काय?
रुग्णालयातील लॉकअपमध्ये असताना त्या तरुणाला चक्क कॉटला बांधून ठेवण्यात आले होते. एकीकडे तरुण वेदनेने विव्हळत होता आणि दुसरीकडे त्याला साखळदंडाने जखडून ठेवले होते. त्या 'विक्षिप्त' गार्डच्या दहशतीमुळे मृताच्या आई-वडिलांना आपल्या पोटच्या गोळ्याला साधे जवळून पाहताही आले नाही. मुलाचा टाहो ऐकून रुग्णालय परिसर सुन्न झाला होता, पण यंत्रणेचे हृदय पाझरले नाही.
Ooooooooooo
पोक्सो गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी पोलिसांकडून पैशाची मागणी, मृताच्या भावाकडून आरोप
मृताच्या भावाने पोलिसांवर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. "पोक्सो गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी पोलिसांनी पैशांची मागणी केली होती, असा दावा त्याने केला आहे. पैसे न मिळाल्यानेच तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. आजवर अनेक दलित तरुणांना अशाच पद्धतीने पोलीस कोठडीत लक्ष्य केले गेल्याचा आरोपही आता जोर धरू लागला आहे.
Ooooooooooo
मयत तरुणाच्या आई-वडिलांचा टाहो; रुग्णालय परिसर सुन्न
घटनेची माहिती मिळताच मयत तरुणाच्या आई-वडिलांनी रुग्णालयाबाहेर जो टाहो फोडला, त्याने उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले. आपल्या पोटच्या गोळ्याला पोलिसांनी मारून टाकल्याचा आरोप करत माऊलीने हंबरडा फोडला. या आक्रोशाने संपूर्ण रुग्णालय परिसर सुन्न झाला होता. सणासुदीच्या काळात घराचा आधार हिरावला गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Ooooooooooo
तो विक्षिप्त गार्ड कोण ? अनेकांना कटू अनुभव
या संपूर्ण प्रकरणात एका 'विक्षिप्त' गार्डची भूमिका संशयास्पद ठरत आहे. रुग्णालयात परिसरात तैनात असलेल्या या गार्डचा अनेक सामान्य नागरिकांना यापूर्वीही कटू अनुभव आला आहे. "तो माणूस आहे की हैवान?" असा सवाल नागरिक विचारत आहेत. उद्धट वर्तन आणि मारहाण करण्याची सवय असलेल्या या गार्डला कोणाचे पाठबळ आहे, याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
Ooooooooooo
मयताच्या नातेवाईकांना साधे जवळही येऊ दिले नाही
माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे, वेदनाने तरुण तडफडत असताना त्याच्या रडणाऱ्या-भेदरलेल्या नातेवाईकांना पोलिस गार्डने साधे जवळही येऊ दिले नाही. आपल्या माणसाचा शेवटचा चेहरा पाहण्यासाठी विनवण्या करणाऱ्या नातेवाईकांना गार्ड पोलिसांनी बळाचा वापर करून दूर लोटले. पोलिसांची ही दडपशाही नेमकी काय लपवण्यासाठी होती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ooooooooooo
अजिंक्य चांदणे आक्रमक ; दोषींवर कारवाई करण्यासाठी करणार आंदोलन
या घटनेनंतर दलित पँथर आणि विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. अजिंक्य चांदणे यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे हे 'पोलीस मरण' नसून हा सरकारी यंत्रणेने केलेला 'संस्थामक खून' आहे. दलित तरुणांना टार्गेट करण्याची ही पद्धत आम्ही मोडीत काढू. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकारी, डाॅक्टर आणि तो विक्षिप्त गार्ड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि आंदोलन थांबवणार नाही!असा इशारा अजिंक्य चांदणे यांनी दिला..
Ooooooooooo