31/10/2025
काल एका मर्डर केस मधील आरोपी ला जमानत कामी भेटण्या करीता आणि वकीलपत्रावर सही घेण्याकरीता येरवडा येथील जिल्हा कारागृह येथे गेलेलो होतो. परंतु जायला थोडा उशीर झाल्यामुळे वकील पत्रावर सही आणि भेटण्या करीता 3.30 वाजे पर्यंत थांबावे लागणार होते.
त्यामुळे थोडी विचारपूस करण्याकरीता इकडे तिकडे व्यक्ती शोधत असताना, मला एक कैद्याचे कपडे घालून असलेला एक व्यक्ती दिसला जो कारागृह समोरील मैदानाची साफ सफाई करीत होता. मी त्याच्याकडून कारागृह प्रशासनच्या विषयी आणि इतर माहिती घेतली. तो स्वभावाने अतिशय शांत आणि संयमी व्यक्ती सारखा भासत होता. मी त्याचा स्वभाव बघून त्याला त्याचे नाव गाव विचारले त्यावर त्यानी रमेश आणि गाव वणी सांगितले. त्यानंतर संभाषण वाढविण्यासाठी मी त्याला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक आहात आणि केस अंडर ट्रायल चालू आहे का?हे विचारले.
त्यावर तो म्हणाला कि, मी 302(खून ) च्या केसमध्ये अटक आहे आणि सध्या अंडर ट्रायल नाही तर मला जन्मठेपची शिक्षा झालेली आहे परंतु मी व माझ्या घरातील लोकांनी सदर शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केली असल्याचे सांगितले.
मी त्याला सहजपणे विचारले कि तुम्ही तर एकदम शांत आणि संयमी दिसताय आणि बोलण्यावरून सुशिक्षित आणि चांगल्या कुटुंबातील मुलगा दिसतोस. तु मर्डर केला या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही मी असे म्हटले. त्यावर रमेश म्हणाला कि, हो साहेब सुशिक्षित आणि चांगल्या घरातील आहे, वडील नोकरी करीत होते आणि मी मेडिकल (बी ए एम एस ) करीत होतो, परंतु खून मीच केलेला आहे. त्यावर अवाक होऊन मी त्याला विचारले एवढे असताना खून का केला? तर तो म्हणाला कि, तो खून मी नाही केला तर माझ्या "रागाने" केला.
त्याने माझ्या समोर बसुन सांगायला सुरुवात केली कि, मी 18-19 वर्षाचा असताना खूप जास्त रागीट होतो आणि चीड चीड करीत होता , एक दिवस त्याच्या वडिलांचे आणि बाजूच्या व्यक्तीचे थोडे भांडण झाले होते, समोरचा व्यक्ती त्याच्या वडिलांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता, त्यामुळे त्याला राग आणावर झाला आणि त्याने बाजूला पडलेला टिकावं (जमीन खोदन्याचे हत्यार ) उचलला आणि सरळ त्याच्या डोक्यात मारला आणि त्यावर तो तिथेच खाली पडला आणि जागगेवरच मेला असे सांगितले.
त्यानंतर मला पोलिसांनी पकडले आणि तेव्हापासून मी जेलमध्ये आहे..
त्या घटनेला माझ्या वडिलांनी स्वतःला जबाबदार धरले आणि खूप जास्त मानसिक ताण घेतला आणि इतका "हुशार आणि सुशिक्षित" मुलगा जेलमध्ये माझ्या मुळेच गेला असे वाटल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्यामुळे त्यांची नोकरी गेली आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करायला लागले आणि आता इकडे तिकडे फिरत असतात..
कोर्ट कामकाजासाठी खूप खर्च झाला आणि इकडे मला शिक्षा झाली..
मला एक भाऊ व एक बहीण आहे.
केस करीता पैसे लागले आणि बाबाची नोकरी गेल्यामुळे घरची परिस्थिती सुद्धा खूप खराब झाली.
मी खून करून जेलमध्ये आल्यानंतर कोणीच माझ्या बहिणीशी लग्न करायला तयार नसल्यामुळे तिचे लग्न माझ्या आत्याच्या "दारुड्या" मुलाशीच करुन दिले आणि माझा भाऊ फार्मसी करीत होता परंतु वडिलांची मानसिक स्थिती ही बिघडलेली असल्यामुळे आणि केसेसाठी पैसे लागत असल्यामुळे त्याने त्याचे सुद्धा शिक्षण सोडले आणि आता तो शेतात आणि बाहेरचे काम करून आई वडिलांना पोसत आहे.
त्यावर मी रमेशला विचारले कि, तुला या गोष्टीचा पश्चाताप होत नाही का..? त्यावर तो म्हणाला 'मी ज्याला मारले तो तर काही वेळातच मेला पण त्याला मारल्या नंतर मी रोजच मरत असतो.'.
मी रोज मरण यातना भोगत असतो असे म्हणाला आणि 'साहेब त्या दिवशी माझ्या रागाने फक्त एकच खून नाही केला तर मी माझ्या घरातील सर्वांचा खून केला'... असे म्हणून रडतच निघून गेला आणि नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आले.
वरची घटना किती मोठी शिकवण देणारी आहे...
छोटाश्या रागाने एक सुशिक्षित आणि सुसंकृत कुटुंब मातीला मिळवले...
एक नोकरीवाला व्यक्ती रस्त्याने वेडा म्हणून फिरतोय...
एक डॉक्टर होणारी व्यक्ती जेलमध्ये आहे...
एक औषधशास्त्राचा विद्यार्थी शेतात काम करतोय...
एका सुंदर मुलीला दारुड्या व्यक्तीशी संसार करावा लागत आहे...
एका आईला एका मुलाशिवाय आणि पती शिवाय जगावे लागत आहे...
त्यामुळे सर्वांनी रागावर नियंत्रण ठेवा , संयम आणि प्रेमाने विचार करुनच सर्व करा..🙏
दोन मिनिटाचा राग किती मोठे पारीवारीक नुकसान करतो.....
(*ॲडव्होकेट*)