24/06/2025
नेम धरून बाण फेकते!
जालन्याच्या तेजल राजेंद्र साळवेने आशिया कप स्टेज २ तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वर्ल्ड चॅम्पियन बनण्याची मनिषा तेजलने बाळगली आहे.
१६ ते २० जून दरम्यान सिंगापूर येथे आशिया कप स्टेज २तिरंदाजी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जालना शहरातील तिरंदाज असलेली तेजल राजेंद्र साळवे हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली . शिवाय भारतीय संघाला सांघिक खेळात रौप्यपदकही पटकावून दिले. या अशिया कप स्टेज २ तिरंदाजी स्पर्धेत भारताने सुवर्ण आणि रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी तेजल हिने चीन येथे झालेल्या आशियन युथ चॅम्पियनशिप २०२४ मध्ये रौप्य, तर दक्षिण कोरिया येथे २०२४ मध्ये झालेल्या आशिया कप स्टेज ३मध्ये रौप्यपदक पटकावले होते. तसेच गोवा येथे झालेल्या थर्टी सेव्हन नॅशनल गेम्समध्ये कांस्यपदक आपल्या नावावर केले होते. १४ ते २४ ऑगस्टदरम्यान कॅनडा येथे होणाऱ्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत तेजल आपले नशीब अजमावणार आहे. १७ वर्षीय तेजलने आतापर्यंत आशियाई युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि विविध एनटीपीसी नॅशनल रैंकिंग स्पर्धांमध्ये पदक मिळवून आपल्या खेळाची छाप पाडली आहे.
तेजल साळवे ही जालना शहरातील अंकुशराव टोपे महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी शिक्षण घेत आहे. वयाच्या १३ वर्षापासून तिला तिरंदाजी खेळात रस वाटत होता. शेवटी वडील राजेंद्र साळवे यांनी तिच्यातील कसब ओळखून तिला तिरंदाज होण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिरंदाजीचे प्रशिक्षण घेताना तिला तसेच तिच्या कुटूंबियांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र तेजलला उत्कृष्ट तिरंदाज होण्यासाठी त्यांनी अनेक आव्हाने पेलली.
तेजलला तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत असताना दिल्लीचे प्रशिक्षक लोकेश चंद पाल यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभत आहे. जालन्यामध्ये प्रकाश दुसेजा यांनी तेजलला सुरुवातीपासून प्रशिक्षण दिले. याशिवाय जेईएस महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक वर्मा यांनी तिला तिरंदाजीचे प्रशिक्षण दिले. सप्टेंबर २०२४ पासून चंद्रकांत इलक हे तेजलला प्रशिक्षण देत आहेत.
* भावंडेही तिरंदाज *
तेजलला तिरंदाजीत मिळत असलेले यश बघून तिची बहीण प्रांजल हिनेही तिरंदाजीचे क्षेत्र निवडले, तिने तिरंदाजीच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत नाव रोशन केले आहे, धाकटा भाऊ आदर्श हाही उत्तम तिरंदाजी करतो. एकाच घरातील तीन भांवडे ही तिरंदाजीमध्ये आपला ठसा उमटवित आहेत.
तेजलला तिरंदाजीसाठी प्रोत्साहन देणारे तिचे वडील राजेंद्र साळवे हे जालना शहरातील नामांकित नवजीवन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मुलांनी तिरंदाजी क्षेत्रात भारताचे नाव रोशन करावे, असे स्वप्न ते पाहतात. जालना शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी मैदान, उत्तम प्रशिक्षकांचा अभाव असला तरी आपली मुले ही मेहनत व जिद्द बाळगून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जालना शहराचे नाव रोशन करीत असल्याचे सांगतात.
* वर्ल्ड चॅम्पियन व्हायचयं*
आपल्या कुटुंब व प्रशिक्षकांनी आपला खेळ उंचावण्यासाठी मेहनत घेतली आहे, आपण यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत सहभागी होणार आहोत, ऑलिंपिक स्पर्धांमध्ये निश्चितपणे सहभागी होवून भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्याचा आपला मानस असून तिरंदाजी क्षेत्रात वर्ल्ड चॅम्पियन व्हायचयं, असे स्वप्न असल्याचे तेजल साळवे सांगते.
- राजु घुले, जालना