19/07/2025
एका भेटीतला करार..
त्याच्या आणि माझ्यातला करार,
फक्त एका भेटीचा होता.
पण त्या एकाच भेटीत
मी स्वतःचा पूर्ण अंश गमावला.
मी त्याच्या आयुष्यात एक ओलसर गंध होते ..
तो मात्र माझ्यासाठी संपूर्ण ऋतू.
त्याच्या एका स्पर्शाने मी खोलवर दरवळले,
आणि त्याच दरवळीत हरवले.
तो माझ्या ओंजळीत विसावला,
आणि मी त्याच्या नजरेत घर केलं.
पण त्याच्यासाठी
ती नजर फक्त एखादं अर्धवट पान होतं ...
जे वाऱ्याच्या झुळुकेसह उडून गेलं,
आणि माझ्यासाठी
ते आयुष्याचं पुस्तकच होतं.
मी त्याला गोंजारलं,
जसं माती पावसाला स्वीकारते ...
ओलावत जाते, साठवून ठेवते.
पण त्याच्यासाठी
ती माती केवळ वाट होती,
जिच्यावरून चालत पुढे जायचं असतं.
मी त्याला सावली दिली,
जशी एखादं झाड निष्पापपणे उभं राहतं ...
वाऱ्याला, ऊनाला, पाखरांना सामोरं जात.
पण माझ्या फांद्यांमधून तो फक्त विश्रांती घेत राहिला,
कधी कधी हळूवार स्पर्श करायचाही
त्या थकलेल्या फांद्यांना.
माझं प्रेम, माझी माया, माझं सौजन्य ...
साऱ्याच गोष्टी त्याला मिळाल्या,
कारण मी त्याला गृहित धरायला शिकवलं.
त्याच्या प्रत्येक मागणीला "हो" म्हणणं,
हेच माझं अस्तित्व झालं.
आणि म्हणूनच,
जेव्हा तो निघून गेला ...
तेव्हा माझ्या ओंजळीत
फक्त त्याच्या नखांच्या खुणा राहिल्या.
आज मी एक गूढतिलक आहे ...
कधी कपाळावर उमटवलेलं तेज,
पण सहजच पुसून टाकलेलं.
मी अजूनही उभी आहे ...
त्याच्या आणि माझ्यातल्या त्या
एकाच भेटीच्या करारात अडकलेली,
जिथे त्याचं क्षणभराचं ,
आणि माझं ...
पूर्णत्वाचं अर्पण.....