14/04/2023
Ambedkar Jayanti 2023 : बाभळगावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास करून अभिवादन !
बाभळगाव /प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त सलग १८ तास अभ्यास करत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. १३) स्तुत्य उपक्रम राबवला. सदर उपक्रम लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विश्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांनी आयोजित केला होता. हिंजवडी पुणे येथे पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आयर्नमॅन राम गोमारे यांच्या विशेष सहयोगातून व मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ही आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली.
स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या सुमारे २५ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सलग १८ तास अभ्यास करून ही मानवंदना डॉ. आंबेडकर यांना दिली.
आपल्या गावातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे वातावरण मिळावे याकरिता बाभळगावचे भूमिपुत्र एपीआय राम गोमारे यांनी पुढाकार घेऊन मागील 7 वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमध्ये मोफतमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले असून आजपर्यंत 25 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात अभ्यास करून शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात एपीआय राम गोमारे यांना सचिन गोमारे, तानाजी देशमुख, रत्नदीप गायकवाड, रमा गोमारे, गोविंद आप्पा देशमुख, सुधीर थडकर यांनी मदत केली.