31/08/2025
**दिव्य स्पर्श आणि निसर्गोपचारातील विज्ञान**
पूर्वीच्या काळी सिद्ध योगी, तपस्वी आणि संत यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्यांच्या दिव्य स्पर्शाने कुष्ठरोग, त्वचारोग, जुने-जीर्ण आजार किंवा अपंगत्व यांसारखे गंभीर विकारही बरे होत असत, अशी श्रद्धा होती. आजच्या दृष्टीने हे केवळ अंधश्रद्धा वाटू शकते, पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास या मागे सूक्ष्म ऊर्जाविज्ञानाचे भक्कम आधार आहेत.
मानवी शरीर हे केवळ मांस, रक्त आणि हाडे यांनी बनलेले नसून त्याभोवती सूक्ष्म ऊर्जा क्षेत्रही (Bio-Energy Field) असते. शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र यालाच 'प्राणशक्ती' किंवा 'बायो-मॅग्नेटिक फील्ड', 'बायो-एनर्जी फील्ड' म्हटले जाते. ही प्राणशक्ती जितकी संतुलित तितके शरीर निरोगी राहते. योगी आणि साधक दीर्घ साधना, प्राणायाम, ध्यान आणि संयम यांच्या साहाय्याने या ऊर्जेला शुद्ध व सामर्थ्यवान ठेवतात. त्यांच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या विद्युत्-चुंबकीय तरंगांचा परिणाम इतरांवरही होतो. त्यामुळे त्यांच्या स्पर्शाने रुग्णातील असंतुलित ऊर्जा संतुलित होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती जागृत होते.
निसर्गोपचार हाच या ऊर्जावैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रत्यक्ष विस्तार आहे. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती आणि आहार यांच्यामार्फत शरीरातील ऊर्जा संतुलन प्रस्थापित केले जाते. उपवास, सूर्यस्नान, जलोपचार, मातीचा संपर्क किंवा ताज्या वनस्पतींचा आहार या सर्व पद्धती मानवी शरीरातील ऊर्जा पुनर्संचयित करतात. त्यामुळे शरीर स्वतःच उपचारक्षम बनते.
नकारात्मक ऊर्जेपासून वाचणे हे आपले नैसर्गिक विज्ञान आहे. मन शुद्ध, विचार संयमी आणि जीवनशैली नैसर्गिक ठेवल्यास, आपल्यामधील ऊर्जेचे संतुलन अधिक मजबूत होते. जर हे समजत नसेल तर याला नावे ठेवण्यापेक्ष हे समजून घेण्याची पात्रता योग्यता स्वतःमध्ये निरंतर साधनेतून साध्य करणे व त्यामागील विज्ञान जाणून घेणे अत्यावश्यक आहे, कारण याच ज्ञानातून माणूस स्वतःला रोगमुक्त ठेवू शकतो आणि आपली प्रगती साधू शकतो.
म्हणूनच, सिद्ध योगींचा दिव्य स्पर्श आणि निसर्गोपचार या दोन्ही पद्धतींचा गाभा एकच आहे — मानवी शरीरातील ऊर्जा संतुलन. आज विज्ञान या सूक्ष्म क्षेत्राचा अधिकाधिक अभ्यास करत आहे आणि त्यातून हे स्पष्ट होत आहे की आपली प्राचीन परंपरा ही निसर्गाशी सुसंगत, वैज्ञानिक आणि मानवकल्याणकारी आहे.–स्वास्थ्य किरण किरण गणपतराव सागरे पाटील