21/03/2015
Good morning.....
विदेशात अवैध संपत्ती जमा करणाऱ्यांना १० वर्षांच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेसोबतच अघोषित संपत्ती जाहीर करणाऱ्यांना एक मार्ग प्रदान करण्याची तरतूद असलेले काळ्या पैशाबाबतचे एक विधेयक केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सादर केले.
=====================
अलिकडेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने व्याज दर कपात केली असून त्याचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचावेत, अशी अपेक्षा या बँकेने व्यक्त केली आहे. रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी सांगितले, की रिझर्व बँकेने लागोपाठ दोनदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व बँकेने अतिशय कमी काळात दोनदा रेपो दरात कपात केली. त्याचे फायदे ग्राहकांना दिले पाहिजे.
========================
अभिमत विद्यापीठातून व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल देत उच्च न्यायालयाने शुक्रवारी हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
====================
नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे आपल्याला कळते, मात्र तामीळ, मल्याळम सारख्या प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांविषयी माहिती होत नाही ही खेदाची बाब आहे. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीच्या नाते संबंधात दरी निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांनी व्यक्त केली.
=============================
येमेनची राजधानी साना आज तीन आत्मघाती बॉंबस्फोटांनी हादरली. या स्फोटात 137 जण ठार आणि 345 जण जखमी झाल्याचे दूरचित्रवाणी वाहिन्यांचे वृत्त आहे.
===================
पावसाळ्यात दरवर्षी लाखाच्या पटीत झाडे लावण्याची घोषणा करणाऱ्या वनविभागाला त्या झाडांचा हिशेब ठेवावा लागणार आहे. दरवर्षी एकाच खड्ड्यात रोपटी लावून वृक्षारोपणाचा सोपस्कार पार पाडण्याच्या प्रकारांवर "ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम‘ (जीपीएस) ही उपग्रहाद्वारे नियंत्रित होणारी यंत्रणा लक्ष ठेवणार आहे.
==========================
भारताचे "वॉटर मॅन‘ म्हणून ओळखले जाणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांना प्रतिष्ठेचा "स्टॉकहोम वॉटर प्राइज लॉरेट‘ हा पुरस्कार मिळाला आहे. पाणी जतन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांसाठी दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
=====================
हवेतून हवेत मारा करणाऱ्या दृष्टीपल्याडचा वेग असलेल्या "अस्त्र‘ या पहिल्या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या यशस्वितेमुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. "एचएएल‘च्या सहभागातून तयार झालेल्या "अस्त्र‘ या क्षेपणास्त्राची काल (ता. 19) ओडिशातील चंडीपूर येथे सुखोई 30 या लढाऊ विमानातून यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.
===========================
युरोपियन युनियनने भारतीय हापूसवरील बंदी मागे घेतल्यानंतर "अपेडा‘ने आंबा निर्यातीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त आंबा निर्यात होण्यासाठी मॅंगोनेट या ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांच्या नोंदणीचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.
=====================
आयएएस अधिकारी डी.के. रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तासभर अगोदर आपल्या सहकारी महिला आयएएस अधिकाऱ्यासमवेत तब्बल ४४ वेळा संपर्क साधल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यामुळे या प्रकरणास वेगळे वळण लागण्याची दाट चिन्हे आहेत. ही महिला रवी यांच्यासमवेतच आयएएसचे प्रशिक्षण घेत होती, असेही सांगण्यात येते.
===================
लष्करी वेषात आलेल्या दहशतवाद्यांच्या एका आत्मघाती पथकाने शुक्रवारी भल्या पहाटे जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये घुसून हल्ला केला. यामध्ये तीन सुरक्षा जवान हुतात्मा झाले, तर पोलिस उपअधीक्षकांसह 11 अन्य जखमी झाले. दरम्यान, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत घुसखोरी केलेल्या आत्मघाती पथकातील दोन्ही दहशतवादी मारले गेले.
=======================
पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा प्रांत हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला असून, दहशतवाद हेच पाकचे राष्ट्रीय धोरण बनल्याने आपापसांतील शांततापूर्ण संबंधांमध्ये व्यत्यय निर्माण झाला असल्याचे भारताने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाचा 2014-15चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा चव्हाट्यावर आला आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थक धोरणाची पाळेमुळे ही लष्करी संस्थांमध्ये रुजली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
================================
वादग्रस्त खाण व खनिज उत्खनन सुधारणा (विशेष तरतुदी) विधेयक-2015 राज्यसभेत कॉंग्रेसच्या गुप्त-सुप्त सहकार्याने मंजूर करवून घेण्यात सरकारला अखेर आज दुपारी यश आले. या मुद्द्यावर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) सभात्याग केला, तर कॉंग्रेसने ऐन वेळी साथ सोडल्याने डावे पक्ष एकाकी पडले. राज्यांचे अधिकार डावलल्याने हे विधेयक घटनात्मक तरतुदींनुसार निवड समितीकडे पुन्हा पाठविण्याची पी. राजीव (माकप) यांची दुरुस्ती बहुमताने फेटाळली गेल्यावर विधेयकाचा मार्ग आणखी प्रशस्त झाला.
======================
विधान परिषद सभापतींची निवड बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रामराजे नाईक-निंबाळकर यांची शुक्रवारी सभागृहाने एकमताने सभापतिपदी निवड केली. निवडणुकीच्या रिंगणातील शरद रणपिसे (कॉंग्रेस) आणि डॉ. नीलम गोऱ्हे (शिवसेना) या उमेदवारांच्या नावांचे प्रस्ताव मागे घेण्यात येत असल्याचे प्रस्तावाच्या सूचक-अनुमोदकांनी जाहीर केले
===================