
05/02/2024
अनेकांच्या आयुष्याची दोरी वाढविणारे ज्येष्ठ वैद्यकिय व्यावसायिक डॉ. मोहन शहा यांचा आयएमए डहाणू शाखेतर्फे रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमीत्त विशेष गौरव! डॉ. मोहन शहा होते आयएमए डहाणूचे प्रथम अध्यक्ष!
डहाणू सारख्या ग्रामीण भागात २५ वर्षांपूर्वी इंडीयन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) शाखा सुरु करुन आज स्वत:च्या भव्य वास्तुमध्ये वर्धापन दिन साजरा करण्याची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी असल्याची भावना आयएमएच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे माजी सरचिटणीस तथा अध्यक्षपदाचे दावेदार डॉ. संतोष कदम यांनी डहाणू येथे बोलताना व्यक्त केली. ते आयएमएच्या डहाणू शाखेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विशेष अतिथी म्हणून डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत, आयएमए डहाणू शाखेचे अध्यक्ष तथा आयएमए डहाणू ट्रस्टचे सचिव डॉ. दिपक पंडित, आयएमए डहाणूचे सचिव डॉ. रमेश गायकवाड, आयएमए महाराष्ट्र शाखेचे सह सचिव डॉ. राजेंद्र तिवारी उपस्थित होते.
आयएमए डहाणू शाखेने आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात स्वत:ची भव्य अशी वास्तु उभारली असून शाखेचे अनेक उपक्रम स्वत:च्या वास्तुतून राबविले जात आहेत. डॉ. पंडित यांनी यावेळी शाखेच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला तर डॉ. गायकवाड यांनी शाखेच्या चालू वर्षातील कामकाजाचा अहवाल सादर केला. यावेळी डॉ. ज्योती बापट यांनी संपादित केलेल्या आयएमए डहाणू शाखेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आयएमए डहाणू शाखेचे पहिले अध्यक्ष व ज्येष्ठ वैद्यकिय व्यावसायिक डॉ. मोहन शहा यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्निक विशेष गौरव करण्यात आला.
तसेच आयएमए डहाणू शाखेतर्फे एक दिवसीय सीएमई (कंटीन्युईंग मेडिकल एज्युकेशन) प्रशिक्षण सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ. आदेश मिश्रा, डॉ. अमेय तिरोडकर, डॉ. मिलींद नवलाखे, डॉ. हरिष शेट्टी यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली. प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील वैद्यकिय व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.