06/07/2025
चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं, तशी नोटीसच आली, तशी नांदती बिर्हाडं कमीच होती बाकी बंद दाराना कुल्पच जास्त होती
ती लग्न होउन या चाळीत आली तेंव्हा चांगली गजबजलेली चाळ होती ही, हिला कधी अशी अवस्था प्रप्त होईल वाटलच नव्हतं
हिचही नांदतं घर होतं एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालते झाले, रेशनकार्डावरची नावं कमी झाली , शेवटी कपाळावरचं कूंकूही उतरलं एक दिवस...ही एकटी उरली दगड वीटांची चाळ टेकीस आली पण ही? अशीच ठाम सगळं पचवायला तयार असल्या सारखी
दिवस रात्र तिला सगळं सारखच, कितीवेळा घरातला दिवाही लावायची नाही रात्री, स्वत:ची परिक्षा घ्यायची
बघुया हे घर आपल्या किती ओळखीचं आहे
म्हणत अंदाजाने घरात चालायची, मोजकं सामन होतं , गरजा कमी करत आणल्या होत्या सूख दू:ख सुद्धा कमी करत आणली होती
भूक तहानेवर सय्यम राखला होता पण जगण्यात निराशा नव्हती
मोडकळीस आलेल्या चाळीच्या व्हरांड्यात कधीचा लावलेला चीनी गुलाब तगला होता फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची, चार दोन दिवसानी एखादं फुल यायचं ते कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तसबीरीला मनापासून वहायची, एक उदब्त्तीचा पुडा सहा महिने पुरायचा कारण फार सुगंधही सोसायचा नाही,एक उदब्बत्ती चार चार दिवस चालायची
नोटीस पाठवण्यापुरती लोकांच्या ही चाळ लक्षात होती
गेली चार वर्ष पावसाळा आलाकी नोटीस डकवायला वाँर्ड आँफीसमधली माणसं यायची, तळ मजल्यावर लाँड्री होती तो भैय्या मग त्यांच्याशी बोलायचा तेव्हढाच काय तो संवाद या चाळीत ऐकू यायचा
नाही म्हणायला कुठूनसा एक बोका रोज हिच्या हातची पोळी खायला यायचा त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळ्या लाटायची
त्याचा हिस्सा तो खाऊन जायचा, खाऊन झालं की वळून बघायचाही नाही,आपण चाळ सोडल्यावर
त्याचं कसं होणार हीच चींता तिला लागून राहीली होती
जणूकाही हिच्या घरच्या एका पोळीवर तो जिवंत होता... मांजराची जात ! टणाटण उड्या मारत कुठे कुठे जात असेल
त्यासाठी मांजराची जात कशाला हवी? माणसं काय वेगळी वागतात? टणाटण उड्य़ा मारताना दिसत नाहीत पण त्यानाही दाही दिशा खुल्या असतात
हीच एक अशी होती जी या चाळीशी बांधली गेली होती
यावेळी नोटीस घ्यायला सुद्धा ती एकटीच होती,लाँड्री बंद होऊन दोन महिने झाले होते सकाळपासून रिप रिप पाऊस सुरूच होता त्यात नोटीस घेऊन माणूस आला त्याने सवयीने नोटीस तळ्मजल्यावर डकवली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून वर आला, म्हणाला तुम्ही मुदतीचा अर्ज करू शकता, मी सांगेन साहेबाना... तिला मुदत या शब्दाचाच उबग आला
पावसाने आधीच एक दमट तवंग वास्तूला चढला होता, तिच्या अंगावरचे कपडेही ओलसरच होते ,त्याना पूर्ण सुखायला वावच नव्हता, स्वैपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लाऊन घेतलेली, घरात कोंडला गेलेला अंधारही ओलसर भासला ,तिला मुदत नको वाटली
म्हणाली मी सोडते चाळ... तुम्ही तुमची कारवाई करा
जाणार कुठे? हा प्रश्न मनात तसाच दामटवत तो कारकून चालता झाला
आणि जाग आल्यासारखी ही कामला लागली
पावसाची रिप रिप चालूच होती, कधीची कुठेशी ठेवलेली छत्रीही हातशी लागेना
पण तरी साठवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली आणि दोन ताज्या भाज्या नारळाची कवट, गव्हाचं ताजं पीठ, तूप रवा वेलदोडा जे जे सुचेल ते ती घेऊन आली, चारी ठाव स्वैपाक केला
गजाननाच्या पुसट तसबीरीला नैवेद्य दाखवला, तसाच त्या अंधारलेल्या वास्तूलाही दाखवला, म्हणाली आता आपला ऋणानुंबंध संपला , मी तुला जपलं की तू मला सांभाळलस माहीत नाही पण आता पुरे
जिथे कधीकाळी सहा सातजण अक्षरश: मांडीला मांडी लाऊन जेवायला बसायचे, तिथे ती आज एकटी बसली आणि यथेच्छ चवीचवीने जेवली
कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहीत नव्हतं ती जेवत असताना तो रोजचा बोका आला तिने त्यालाही आज ताट लीत पोळी वाढली,पोळीवर तूप वाढलं , तो ही पंक्तीला बसल्या सारखा तिच्या बरोबर पोळी खात बसला
जेवणं आटपली, तिने वेळ न घालवता आवरा आवर केली जे काय समान होतं ते खाली नेऊन ठेवलं गादीसकट पलंग एकाला देऊन टाकला दुधाच्या घोटासहं दुध ताकाचं फडताळं दुसर्याला दिलं घरतले कांदे बटाटे बेसन तांदूळ असेच वाटले एक खुर्ची होती ती मोडली होती तिला कोणी हात लावेना आणि व्हरांड्यातला चिनी गुलाब त्याकडे कुणाचं लक्ष जाईना
मग वारीला तुळस घेऊन जातात तशी ती त्या चिनीगुलाबाची कुंडी घेऊन निघाली, खांद्यावर फक्त यजमानानी कधीची आणलेली पर्स होती आणि अंगात तिच्या आईचा जपून ठेवलेला स्वेटर, आपण उघड्यावर आलोय याची जाणीव तिला व्हायची होती, तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता झपाझप चालून तिला तो ओळ्खीचा परिसर ओलांडायचा होता
परिसर तिच्या ओळखिचा होता
पण तिला ओळखणारं कोणी नव्हतं घरातून बाहेर पडायचं तिने कधीच सोडलं होतं , तिला कोण ओळखणार?
पण बघते तर तो बोका... निमूट तिच्याबरोबर काही अंतर ठेऊन चाललेला
त्याला बघून ती थबकली, आता हा कुठे येतोय आपल्या बरोबर? आपण कुठे जाणार हे आपल्यालाच माहीत नाही आणि हा...ती स्वत:च्या विचारात अशी गुरफटत असताना एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली
गाडीतून एक तरूण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला, कोणाला आशीर्वाद देऊन सुद्धा तिला बरीच वर्ष झाली होती, ती चाचरली
तू मला ओळ्खतोस? तिने आश्चर्याने विचारलं
तो छानसं हासत म्हणाला म्हणजे काय? आपण एका चाळीतले
तिला हसायला आलं, तो ही तिचे भाव ओळ्खून हसला
म्हणाला मी तुमच्याकडेच निघालो होतो... माझ्याकडे? तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं
तो म्हणाला हो! आम्हाला जरा सोबतीची गरज आहे
माझी बायको प्रेग्नंट आहे आणि माझं फिरतीचं काम , कोणी अनुभवी व्यक्ती घरी असेल तर मला तितकाच आधार, तुम्ही यायला तयार झालात तर् मी माझं भाग्यच समजेन
आधार म्हंटल्यावर तिला आपण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी, तिच्या होकाराची वाट नं बघता त्याने गाडीचं दार उघडलं तिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून आपल्याकडे घेतली
तो अगाऊ बोका आधी टुण्णकन उडी मारून गाडीत बसला ती त्याला अरे अरे म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला हा आपलाच बोका आहे , ती चकीत झाली तिला त्या विषयी बोलायचं होतं पण इच्छाच होईना, नियतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली
आणि तो बोलायला लागला म्हणाला मावशी म्हंटल तर आवडेल का?
तर मी शंतनू जठार, माझी आई शिक्षीका होती, तिचं जनार्दन जठरांशी लग्न झालेलं नव्हतं पण तरी तिने मला जन्म दिला, जनार्दन जठार या चाळीचे मालक त्यानी आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली
माझ्या जन्माच्यावेळी आई एकटी होती तेंव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मर्जी विरुद्ध आईच्या मदतीला आलात आणि थोडे थोडके नाही तर सहा महिने तिची काळजी घेतलीत,पुढे काकांच्या कायदेशीर पत्निने आक्षेप घेतल्यावर आम्हाला ही चाळ सोडावी लागली
पण आई तुम्हला कधी विसरली नाही, शेवटपर्यंत तुमची आठवण काढून ती हात जोडायची , म्हणायची त्या माउलीच्या उपकारातून कशी मुक्त होणार आहे कोणास ठाऊक पण माझी देवाला प्रार्थना आहे की त्यामाऊलीला सांभाळ..त्या माउलीला सांभाळ
तो बोलत असताना तिचं बोक्याकडे लक्ष गेलं तो जवळकीने तिला बिलगला होता.. त्याच्या नजरेत ओळ्ख होती संवाद होता
पहिल्यांदी तो चाळीत आला तेंव्हा तर तो तसा इवलासा जिव होता पण तेंव्हाही तो तिला असा बिलगला नव्हता...तिला त्याविषयी ही बोलायचं होतं पण जमलच नाही तिला अचानक भरून आलं पण रडायची तिला सवय नव्हती
तिने नेहमीप्रमाणे श्वसासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेंव्हाच आभाळ ऊर फाटल्या सारखं धुंवाधार बरसायला लागलं
आणि एका टूम्दार बंगल्याशी गाडी थांबवत शंतनू म्हणत होता मावशी आपलं घर आलं........
@चंद्रशेखर गोखले......