01/07/2025
#मालवण येथे समुद्री पक्षाला जीवदान.. (Masked B***y)
दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. समुद्रालाही उधाण आले होते. सोसाट्याच्या वारा सुरु होता. संध्याकाळी पावसाने थोडी उसंत घेतली. नेहमीप्रमाणे रात्री ९.३० च्या सुमारास 'साहिल' आणि त्याचे बाबा 'चंद्रकांत कुबल' रात्री दांडी येथिल किना-यावर फेरफटका मारीत होते. साहिलला समुद्राच्या लाटेमध्ये एक मोठा पक्षी स्थिर उभा असलेला दिसला. त्याने बाबांना पक्षी दाखवला. 'अरे, ह्यो हलना नाय कसो?' म्हणत ते त्या पक्षाजवळ आले. पक्षी तसाच शांत. आजुबाजुला भटके कुत्रे फिरत होते. साहिलने युथ बीट्स फाॅर क्लायमेट या संस्थेचा सदस्य असलेल्या अक्षयला फोन लावला. अक्षय धावतच आला. अगदी पक्षाच्या जवळ जाऊन बसला. पक्षी गायबगळ्यापेक्षा मोठा होता. डोके आणि त्याखालचा भाग राखाडी रंगाचा. पोट पांढरे. पाय मात्र बदकासारखे. अक्षयने लगेच त्यापक्षाचे फोटो दर्शन व स्वप्नील यांना पाठवले त्यांच्या लक्षात आले त्याचे नांव "मास्कड बुबी जुवेनाईल." हे पक्षी प्रशांत महासागर परीसरात मोठ्या प्रमाणावर असतात. विणीच्या हंगामात समुद्रातील बेटांवरचे खडक शोधतात. तेथे अंडी घालतात. पिल्ले थोडी मोठी झाली की महासागराच्या दिशेने जातात. आपल्याला सापडलेला हाच तो "मास्कड बुबी जुवेनाईल." आहे. अक्षयच्या लक्षात आले हे पिल्लू असल्यामुळे त्याला उडायला शक्ती नाही. पिल्लू इथे असेच राहीले तर कुत्रे फाडून खाणार. अक्षयने स्वातीला फोन लावला. पिंजरा तयार ठेवायला सांगितला. पक्षाला कसे पकडायचे या विवंचनेत साहिल आणि अक्षय होते. अंगावरचे टी शर्ट काढून पकडूया का? विचार चालू होता. साहिलने घरात जाऊन रिकामी पोते आणले. त्या पक्षावर टाकले. त्या क्षणीच अक्षयने अलगद पक्षास पकडले. दोघेही मोटरसायकलवर बसून स्वातीकडे आले.
पिंजरा उघडला आणि पक्षाची रवानगी त्यात केली. पक्षी खरंच खूप दमला होता. त्याने तोंडात छोटे मासे घट्ट पकडून ठेवले होते. पक्षाचा फोटो काढून घेतला. पिंज-यावर कापड घातले आणि पिंजरा हवेशीर जागेत ठेवला. 'रात्रभर आता काय घडते हे बघून उद्या काय तो निर्णय घेऊया' असे अक्षय, साहिल आणि स्वातीने ठरवले. रात्री मनिषा बघून आली. डोळे घट्ट बंद करुन पक्षी झोपला होता.
रात्र अशीच निघून गेली. सकाळी स्वातीने बघितले तर पक्षी ताजातवाना दिसत होता. आपल्या निळसर रंगाची झाक असलेल्या मोठ्या चोचीने अंग स्वच्छ करीत होता. आपली पांढरी, करडी पिसे स्वच्छ विंचरत होता. पंखांची उघडझाप करीत होता. त्याने समोर ठेवलेले खाऊ मात्र खाल्ले नव्हते. आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी तो परीसर पहात होता. सर्वांची खात्री पटली हा उडू शकेल. याला कुठे सोडावे? कांदळवन असलेली खाडी आणि जवळ समुद्र अशी जागा म्हणजे कोळंबी पूलाजवळील जागा. समजा जास्त उडायला समजले नाही तर कांदळवनाच्या फांदीवर बसेल. दर्शनची ही सूचना सर्वांनाच आवडली.
दुपारी ४.०० वा. अक्षय,साहिल, भार्गव, दर्शन आणि संजय स्वाती कडे आले. साहिल आणि अक्षयने पिंजरा आणला. दर्शनच्या मोटरसायकलला पिंजरा बांधला. त्याला घेऊन सगळे खापरेश्वर मंदिराच्या पुढे आले. योग्य जागा बघून पिंजरा ठेवला. त्याचे दार उघडले. अक्षयने आवाज दिला, "बाबू बाहेर ये." पक्षी क्षण दोन क्षण घुटमळला. हलकेच उडून समोरच्या पाण्यात पोहू लागला. वेग पकडत त्याने आकाशाला गवसणी घातली. समुद्रावरुन घिरट्या घालू लागला. समुद्री पक्षाला समुद्र मिळाला. तो आनंदात होता. थोडया अंतरावर जाऊन पक्षाने समुद्रात डुबकी मारून मासा पकडला. आमचे सदस्य हात उंचावून त्याला शुभेच्छा देत होते.. .
#कोकणी