03/03/2025
काव्यधारा...💕
हे फोटो म्हणजे काव्यधाराचा खळाळता उत्साह आणि चैतन्य आहे... हेच अनुभवण्यासाठी इथला प्रत्येक रसिक कार्यक्रमाची आवर्जुन वाट पाहातो...
किंबहुना कार्यक्रम संपेपर्यंत अगदी रात्री 11 वाजेपर्यंत थिएटरमध्ये शेवटपर्यंत बसून राहातो...
जवळपास आजपासून 10 वर्षांपूर्वी म्हणजे 2015 ला काव्यधाराचा पहिला कार्यक्रम झाला होता... धम्मपाल जाधव, निलेश चव्हाण, अविनाश भारती, रवीराज काळे , कृष्णा काळदाते, कदम सर (काहींची नावं राहून गेली असतील) असे असंख्य हात या कार्यक्रमासाठी पुढे आले आणि त्यांच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम झाला होता... त्यावेळी पहिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी, लेखक, प्राध्यापक आणि आमचे स्नेही दासू वैद्य सर होते... त्यावेळी त्या कार्यक्रमात राज्यातून कवयित्रींचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी मी एकमेव उपस्थित होते... त्यावेळीही असंच गच्च भरलेलं सभागृह आणि पायऱ्यांवर बसूनही तीन तास कविता ऐकणारी माणसं लाभली...
या कार्यक्रमाने मला मराठवाड्याशी जोडलं... जितक्या वेळा मी गावी कोकणात गेले नसेन तितक्या वेळा कवितेच्या निमित्तानं मला मराठवाड्यानं प्रेमानं बोलावलं... माझ्या कवितांचा, माझा सन्मान केला आणि मला उदंड प्रेम दिलं... पहिल्या कार्य़क्रमापासून आजपर्यंत असं कधी झालं नाही की काव्यधाराला मी उपस्थित राहिले नाही...
मध्यंतरी कोरोनानंतर काही वर्ष कार्यक्रमात खंड पडला पण संभाजीनगरातून सुरू झालेला हा कार्यक्रम आणि त्यातल्या कवींनी नंतर कोल्हापूर, लातूर, बीड आणि मुंबईतही त्यांच्या कवितांनी रसिकांच्या मनावर आपलं स्थान कायम कोरलं...
राज्यात आज लिहिणारे असंख्य हात आहेत... अनेकांची उघड आणि काहींची सुप्त इच्छा असतेच की काव्यधारामध्ये जाऊन कविता सादर करण्याची संधी मिळावी...
खरंतर अनेक लिहित्या हातांना बळ देण्याचं काम काव्यधारा
नेहमीच करत आलंय... कोणत्याही वशिल्याशिवायच...!
माझ्यासाठी आनंदाची बाब हीच की 'काव्यधारा' च्या पहिल्या कार्यक्रमापासून ही सगळी धडपड मी पाहिलेली आणि अनुभवलेली आहे...
पहिल्या कार्यक्रमापासून या पूर्ण टीमनं माझ्या कवितांवर जो विश्वास दाखवला त्याचं सार्थक करता आलं आणि मला टीमचा भागही होता आलं...
काव्यधाराचे असंख्य कार्यक्रम राज्यभरात करायचे आहेतच... अनेक नव्या माणसांना, कवी, लेखकांना, रसिकांना जोडून घ्यायचं आहेच...
त्यासाठी तुमच्याही शहरात लवकरच येऊ... काव्यधाराच्या प्रयोगासाठी तुम्ही Dhammapal Jadhav Raviraj Kale यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता...
यावर्षीचा काव्यधाराचा कार्यक्रमही तुफान रंगला... माझ्या सोबतच्या सगळ्याच कवींनी आपापल्या कविता आणि सादरीकरणानं बहार आणली... निलेशचं नेहमीप्रमाणे कमाल निवेदन... एमसीएन न्यूजचं उत्तम आयोजन यामुळे कार्यक्रम सुरेख झाला...
अनेकांच्या भेटी झाल्या... पुन्हा नवी माणसं मिळाली... यासगळ्यात काव्यधाराचा खंदा वीर धम्मपाल याच्या वडिलांचं निधन झाल्यानं तो कार्यक्रमात नसल्यानं त्याची कमी जाणवली...
काव्यधारानं दिलेल्या उदंड प्रेमासाठी खूप खूप खूप आभार दोस्तहो...
- यामिनी विलास