18/10/2024
श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.. चरीत्र-कार्य-उपदेश
(११४९ ते १८७८ छेलीखेडा- कर्दळीवन ते अकलकोट अभूतपूर्व जीवन यात्रा.)
श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोटचे परब्रह्म, त्यांच्या देह निर्वाणाला दीडशे वर्षे उलटून गेली, तरी लोकोध्दाराचे त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच आहे. "हम गया नहीं, जिंदा है", याची साक्ष पटवीत करोडो भक्तांच्या पाठीशी ते पहाडासारखे उभे आहेत. असे असले तरी भक्तांच्या मनात त्यांच्या विषयी अनेक प्रश्न व संभ्रम आहेत. स्वामी नेमके कोण होते, त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक का म्हणतात. त्यांचे प्रगटीकरण कुठे व कधी झाले? अक्कलकोटमध्ये ते कधी आले? तत्पूर्वी सातशे वर्षे अखिल भारतवर्षात ते कुठे कुठे हिंडले? ह्या संचार यात्रेचे प्रयोजन काय होते ? जुन्या नव्या गद्य पद्यचरित्रांमधून ज्या भक्त, शिष्य सेवेकऱ्यांचे उल्लेख येतात त्यांचे कार्य काय? स्वार्मीच्या संपर्कात ते कधी व कुठे आले? मुंबईतील पंचवीस वर्षांच्या वास्तव्यात तसेच आपल्या जीवित काळात हजारो मैलांची पदयात्रा करीत, क्षेत्रो क्षेत्री त्यांनी धर्म संस्थापना कशी केली? परकीय सत्तांशी त्यांनी कसा लढा दिला? त्यांची शिकवण व अवतार महात्म्य काय? त्यांची उपासना कशी करावी? असे अनेक प्रश्न, लाखो स्वामी भक्तांच्या मनात आजही घर करून आहेत, ज्याची समाधानकारक उत्तरे आजवर मिळालेली नाहीत.
नेमके हेच प्रश्न मलाही पडले आणि माझी शोध मोहीम सुरू झाली. गेली तीन दशके स्वामींच्या आशेने डोळसपणे, जुनी नवी चरित्रे वाचून मी आसेतू हिमाचल भ्रमंती सुरु केली. धर्मग्लानीच्या काळात या कलियुगात, हरियाणात छेलीखेडा येथे चैत्र शुध्द द्वितीया, सन ११४९ ला हा अजन्मा जन्मा आला. हिंदुस्थानच्या मानगुटीवर बसलेली धर्मांध मुस्लिम राजवट उलथवून टाकण्यासाठी, ठीकठिकाणी चाललेला अन्याय अत्याचार रोखण्यासाठी, हादरलेल्या हिंन्दुस्थानी जन मानसात, दास्य गुलामगिरी झुगारून, श्रध्दाभक्तीची ज्योत फुलवण्यासाठी, भगवंताला स्वार्मीच्या रूपात अवतार घेणे भाग पडले. "प्रथम आम्ही कर्दळीवनातून निघालो" असे म्हणत त्यांनी कलकत्ता बंगाल प्रांत पिंजून काढला. हिंन्दुस्थानातील काशीपासून रामेश्वर पर्यंत व कर्नाटक, सौराष्ट्र, राजस्थान, ओरिसा, हिमालय परिसरात अखंड परिभ्रमण केले. तत्कालीन राजेरजवाडे, संस्थानिक, धर्म मार्तंड यांची कानउघडणी करून त्यांना स्वधर्माचरणास प्रवृत्त केले. अमानवी वाटावी अशी उंचनिंच दीर्घबाहू टोलेजंग देहयष्टी आणि प्रदीर्घ निरामय आयुर्मान ह्या बळावर, हा कृतीशील कर्मयोगी, विरक्त संन्यासी, द्रष्टा समाज सुधारक, हिन्दू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रथम सुलतानी व नंतर विषारी ब्रिटिश सत्तेशी झुंज देत एकांड्या शिलेदाराप्रमाणे, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत राहिला. ह्या पृथ्वीतलावर "मीच राम होतो, मीच कृष्ण होतो" याची ग्वाही देत सात शतके अक्षरशः तळपत राहिला. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात महाराष्ट्रात दाखल झाला. बुवा, दिगंबर, वेडा, पिशाच्च, जादूगार, चंचलभारती, कुलगुरु, वृध्द नृसिंह सरस्वती, अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा हा चालता बोलता परमेश्वर, अक्कलकोटच्या अखेरच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात स्वामी समर्थ नावाने विख्यात ठरला..।
सन ११४९ च्या अवतरणापासून, सन १८०० च्या दरम्यान महाराष्ट्रात येई पर्यंतची, साडेसहाशे वर्षांची त्यांची घणाघाती तेजस्वी जीवनयात्रा, तपशीलवारपणे, क्रमशः आजवर जगासमोर आलीच नाही. अन्यथा रामायण महाभारता सारखा महाग्रंथ सिध्द झाला असता. त्यांच्या आज्ञेने हे कार्य मी स्वीकारले. महाराजांच्या समग्र जीवन यात्रेचा शोध आणि वेध घेण्याचा; सातशे एकोणतीस वर्षांचा त्यांचा चरित्रपट, संपूर्ण जीवनवृत्तांत संक्षिप्तपणे परंतु साकल्याने उलगडण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथाच्या माध्यमातून मी केला आहे. स्वार्मीसारख्या तेजोनिधीच्या महाकार्याचा इतिहास, एका ग्रंथाच्या चौकटीत बसवणे हे केवळ अशक्य. परंतु अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर स्वार्मीच्या कृपेने, ते अंशतः तरी शक्य झाले. माझ्या अल्पमतिनुसार, अनेक चरित्रे व संदर्भग्रंथांचा अभ्यास करून काशी पासून रामेश्वरपर्यंत भ्रमंती करून, दुर्मिळ छायाचित्रे, दस्ताऐवज, विद्यमान वंशजांचा शोध, अशा अनेक प्रकारे प्रयत्नांची शर्थ करून, हे लीलावैभव साकार केले आहे. 'स्वामी समर्थ गौरव गाथा' या नावाचे चार मोठे ग्रंथ मी या पूर्वीच प्रसिध्द केले असून त्यातील महत्वाचा मजकूर आणि गेल्या आठ-दहा वर्षात झालेले नवीन संशोधन, ह्यातून हा नवा कोरा ग्रंथराज सिध्द झाला आहे. ह्या नंदादीपाच्या प्रकाशात आपणा सर्वांचे जीवन सर्वस्वी उजळून निघो, अशी प्रार्थना करीत इथेच थांबते.
अस्तु । शुभं भवतू !!
लेखिका-संपादिका-प्रकाशिका
प्रा. नम्रता भट, मुंबई.
वेबसाइट
www.swapnilprakashan.com
केवळ व्हॉट्सॲप संपर्क
+91 83568 17900
हा ग्रंथ बाजारात वेबसाइट अथवा ऑनलाइन कुठेही विक्रीस उपलब्ध नसून केवळ कुरियर ने घरपोच मिळवण्याकरीता वरील नंबर वर आम्हाला व्हाटसप्प मेसेज करावा कृपया फोन किंवा व्हाटसप्प कॉल लावू नये ही नम्र विनंती. आपल्याला 24 तासांत आम्ही संपर्क करून पुढील माहिती देऊ. हे स्वामी कार्य मी स्वप्नील भट , प्रा. नम्रता भट यांचा मुलगा आपली नोकरी व्यवसाय सांभाळून अर्थात स्वामी कृपेने एकट्याने करत असल्यामुळे उत्तर मिळण्यास उशीर होऊ शकतो त्यामुळे निराश होऊ नये. 👍
🙏श्री स्वामी समर्थ 🙏