
26/03/2024
एक मनस्वी कलाकार हरपला...
मुलुंडमध्ये अनेक दिग्गज मंडळी राहतात. राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, नाटक, चित्रपट, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील नामवंत आहेत. नाट्य आणि कला क्षेत्रातील आज एका कलाकारांने आज मुलुंडकरांचा कायमचा निरोप घेतला. नाट्य अभिनेता - दिग्दर्शक आणि गणेश कलाकार लवराज कांबळी यांचे निधन झाले.
दीड वर्षांपूर्वी त्यांच्या अर्धांगिनी अभिनेत्री गीतांजली वहिनी यांचं कर्करोगाशी सामना करताना निधन झालं होते. त्यातून ते स्वतःला सावरू शकले नाहीत.
कलाकार म्हणून हा माणूस ग्रेट होता. विविध नाटकात त्यांनी भूमिका केल्या. 'वस्त्रहरण' मधील गोप्या अनेकांच्या स्मरणात राहणारी भूमिका कोणीच विसरू शकत नाही.
ते राहत असलेल्या मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनीत त्यांचा गणपतीचा कारखाना होता. आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याची कला त्यांच्याकडे उपजत होती. माझा भाऊ शशिकांत यामुळे त्यांच्या प्रेमात होता. यातून आम्ही त्यांनी घडवलेल्या आखीव-रेखीव मूर्ती सलग चार वर्षे गावी घेऊन गेलो.
मुलुंडकर आणि कोकणी माणूस म्हणून एक विशेष नातं तयार झालं होतं.
यातूनच गावी वाडीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून एक विहीर खोदायची ठरली. यासाठी निधी उभा करतांना मुलुंडमधील मोजक्या दानशूर व्यक्तीन्ची मदत मिळाली. त्यावेळी प्रसिद्ध समाजसेवक म. बा. देवधर, आनंद वालावलकर, कै. विजय दाते, कै. सतीश पटवा यांच्यासोबत एक नाव लवराज कांबळी यांचं घ्यावं लागेल.
लवराज यांचं त्यावेळी 'केला तुका, झाला माका' हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. स्वतः दिग्दर्शन केलेल्या या नाटकात त्यांची पंचरंगी भूमिका होती. वाडीतील पाण्याच्या सोयीसाठी माफक रक्कमेत या नाटकाचा प्रयोग वार्षिक पूजेच्या दिवशी ठेवला होता.
प्रयोग संपल्यावर जेवणात फणसाची भाजी त्यांनी आवर्जून सांगितली होती. त्यांचा त्यांनी आस्वाद घेतला.
भेट होई तेव्हा आवर्जून गावची आठवण काढत.
त्यांची विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होई. आता ती कधीच होणार नाही. या मनस्वी कलाकाराला आदरांजली💐