19/09/2026
पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांना फटका; पालकमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधून जाणून घेणार परिस्थितीअमरावती जिल्ह्यात पावसाने दिलेल्या दीर्घ खंडामुळे खरीप पिकांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
दौरा कार्यक्रमानुसार बावनकुळे सकाळी तिवसा येथे दाखल होऊन दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. यावेळी शेतातील पिकांची स्थिती, पावसाअभावी झालेली हानी आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी याची माहिती घेतली जाणार आहे.विदर्भातील काही भागात मागील काही काळापासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून प्रत्यक्ष पाहणी आणि परिस्थितीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना मदत देताना घाईघाईने निर्णय न घेता परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन ठोस मदत करण्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे.आजच्या तिवसा दौऱ्यानंतर बावनकुळे नागपूरकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे अमरावतीतील पीक पाहणीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत पालकमंत्री काय माहिती देतात आणि पुढील मदतीबाबत काय निर्णय होतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.