23/10/2025
बळीराज्य
दिवाळी या सणाचे मुख्य नावच 'बळीराज्य' आहे अशी नोंद 'फादर ऑफ इंडाॅलाॅजी' असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो १०व्या ते ११व्या शतकात होऊन गेलेला भारतीय संस्कृतीचा गाढा अभ्यासक,भारतीय खगोलशास्त्राचा तथा येथील एतद्देशीय विविध धर्म व सांप्रदायांचा,पंथ उपपंथांचा,भारतीय सण सोहळ्यांचा तथा देशी प्रथा परंपरांचा,प्राचीन भारतातील विविध साहित्यांचा सखोल अभ्यास करणारा,भारतीय समाजाचे बारकाईने आकलन करणारा,त्यांच्या लिखित नोंदी करून ठेवणारा,महान साहित्यिक व तर्कनिष्ठ चिकित्सक,गणितज्ञ,भूमापनशास्त्रज्ञ,आद्य मानववंशशास्त्रज्ञ अशा अनेक विद्वत्तापूर्ण बिरूदांनी जगभर ज्याला ओळखले जाते तो 'अबू रहयान अलबिरूनी'(इ.स.९७३-इ.स.१०५०)दिवाळी सणाची नोंद बळीराज्य म्हणून करतो.त्याने केलेल्या नोंदींचे संदर्भ भारतीय तथा जागतिक इतिहासातील अनेक घटनांची कालक्रमनिश्चीती करण्यात उपयुक्त ठरले आहेत.दिवाळीबाबतची त्याची ही नोंद म्हणूनच आत्यंतिक महत्वाची आहे आणि आजही त्यास महाराष्ट्रातील खेडोपाडी दृश्य स्वरूपात दुजोरा मिळतोच.
दिवाळीत खेडोपाडी शेतामध्ये ज्या मातीच्या मानवाकृती पूजल्या जातात त्यांस पाच पांडव असे काही ठिकाणी 'गैरसमजातून' म्हटले जाते,परंतु शेतकरी महिला या ज्या मातीच्या आकृती बनवून शेतामध्ये वा अंगणात सहकुटुंब पूजतात ते पांडव नसून या मानवाकृतीतील मध्यभागी असलेली मुख्य आकृती ही सिंधू संस्कृतीचा इतिहाससिद्ध चक्रवर्ती असूरराज दैत्यबळीराजाची आहे.दगाबाज वैदिक वामनाने बळीराजाला अर्थातच असूरांच्या सिंधूसंस्कृतीला पाताळात घातल्याच्या घटनेचे स्मरण म्हणून गेल्या अनेक पिढ्यांपासून ही घटना शेतकऱ्यांनी या आकृतींतून 'सांकेतिकरित्या' जपली आहे.वैदिकांच्या ऋग्वेदात 'वलासूर' या असूराचा जो उल्लेख आहे तो वलासूर खुद्द बळीराजाच आहे(बळी-वली/बलासूर-वलासूर) शेतकऱ्यांचे पळवून नेलेले पशू तो इंद्राकडून स्वपराक्रमाने सोडवून आणून शेतकऱ्यांना परत करतो.बळीराजा हा स्वतः शेतकरी होता हे वेगळे सांगायलाच नको,लोणीभापकर येथे असूरबळीराजाचे नांगरधारी प्राचीन शिल्प अवगत झाले आहे,तथापि महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हणतात ते असूरबळीराजा मुळेच हे तथ्य महत्वपूर्ण आहेच! तथापि सातवाहनकाळापासून अनेक शिलालेखांतून आपणास असूरबळीचे वंशज म्हणवून घेणारी कृषक कुटुंब इतिहासात होऊन गेलीत(त्यावर स्वतंत्र आढावा घेऊ)
त्यामुळे पाताळात रेटलेल्या बळीराजाच्या भोवती शेतकरी महिला बळीराजाचे डोके मांडीवर घेऊन वा ते कुरवाळत व त्याचे चरणस्पर्श करत आदरभाव दाखवताना या चिखलाच्या वा शेणाच्या आकृतींद्वारे दाखवले जाते व भोवताली शेतीशी संबंधित कृषीकर्म करणाऱ्या महिला काही ठिकाणी दाखवल्या जातात,पशू हे तर कृषककर्मात महत्त्वाचे असतातच हे वेगळे सांगायलाच नको,त्यामुळे पशुधनांचा सांभाळ करणाऱ्या या स्त्री आकृत्यांना पशूंच्या पालनकर्त्या म्हणून गवळणी म्हणणेही साहजिक आहे,मुख्यत्वे शेतात हा विधी केला जातो हे तथ्यही महत्वपूर्ण आहे.सिंधूसंस्कृतीचे निर्माते हे मूळतः शेतकरीच होते व सोबतच ते वाणिज्य व व्यापारातही त्यांच्या समकाळातच विख्यात होते तेच ऋग्वेदात 'पणि' संबोधले गेले आहेत, या व्यापारी वाणिज्यिक सैंधवांचे अस्तित्व आता पुरातत्वीय व 'शिलालेखीय' पुराव्यानिशी सिद्ध झाले असून जागतिक पातळीवर ते मान्य केले गेले आहे.
दिवाळीत शेतात केले जाणारे हे सांकेतिक दृश्य बळीराजाच्या कुटुंबियांना व त्याच्या रयतेला आक्रमक आर्यांनी सिंधू खोऱ्यावर हल्ला करून कशा प्रकारे दूर रेटले व त्यावेळी शेतकरी असूरांवर व बळीराजाच्या रयतेवर कसे जुलुम करण्यात आले हेच या दृश्यातून प्रकटते.सिंधूसंस्कृतीच्या उत्खननात रोगाचे बळी पडलेल्या प्रेतांसोबतच हत्या केलेली अनेक प्रेते उत्खनकांना सापडली,पैकी काहींच्या निर्घृण कत्तली केल्याचे त्यांच्या सांगांड्याचा अभ्यास करताना अभ्यासकांनी वेळोवेळी नोंदवून ठेवले आहे,महत्वाचे म्हणजे या मृतदेहांपैकी काही मृतदेह हे लहान मुलांचेही आहेत,त्यांना क्रूरपणे मारण्यात आले होते असे काही विद्वानांचे ठाम मत आहे,एखाद्या कुटुंबाचा वा समाजाचा निर्वंश केल्याप्रमाणे हे हत्याकांड करण्यात आले होते असे अभ्यासक मानतात,हा 'पुरातत्वीय पुरावा' बळीराजाच्या संस्कृतीच्या पतनाची व पाताळात रेटले गेल्याच्या घटनेची आठवण दर्शविणाऱ्या दिवाळीतील या प्रथेचे मूलत्व जाणण्यासाठी महत्वाचा आहे,बळीराजाच्या भोवती दिसणाऱ्या या आकृत्या त्या लहानग्यांच्या मातांचे प्रतीक असाव्यात? केरळमध्ये मावेली उर्फ बळीराजाच्या स्मृतीप्रित्यर्थ 'ओणम' या सणाला इतर आकृत्यांसह जसे चिखलाचे सुळके व चौरसाकृत्या केल्या जातात तशाच आकृत्या महाराष्ट्रात बव्हंशी खेडोपाडी दिवाळीत केल्या जातात,खरेतर असूरांच्या सिंधू संस्कृतीच्या चौरसाकृती,आयताकृती नगरांची स्मृती शेतकऱ्यांनी या प्रतिकात्मक आकृत्यांतून जपली आहे असे दिसते,अभ्यासकांनीही आता या तथ्यांना दुजोरा दिला आहे.तेलंगणामधील शेतकरी रेड्डी कुळेही अशाच चौरसाकृती आयताकृती आकृत्या व सुळके बनवतात यातही तोच संकेत पाळला जातो.हरप्पा व मोहेंजोदारो ही सिंधू संस्कृतीची मुख्य नगरे(व इतरही)चौरसाकृती व आयताकृतीच असल्याचे जगमान्य असून पुरातत्वीय पुराव्यांंनुसार त्या नगरांचे नकाशे अभ्यासकांनी अत्यंत बारकाईने बनवले आहेत ते या तथ्यास बळकटी देतात.सिंधूसंस्कृतीच्या पतनानंतर बळीवंश इतस्ततः विखुरला,पण तो जेथे जेथे स्थिरावला तेथे तेथे बळीवंशजांनी कृषकांनी आपल्या प्रथा परंपरांतून आपल्या लोकोद्धारी असूरराज बळीराजाच्या स्मृती आपापल्या क्षमतेनुसार जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे,दक्षिण भारतातील ओणम असो की महाराष्ट्रातील कृषकांचा सण दिवाळी,बळीराजाच्या व त्याच्या राजवटीच्या आठवणी बहुजनांनी या सणांतून टिकवून ठेवल्या आहेत.कर्नाटक,महाराष्ट्र,तेलंगणा हा प्रदेश विभाजीत होण्याआधी प्राचीन काळी त्रिराष्ट्र म्हटला जाई,११व्या ते १२व्या शतकात बळ्ळीगावी हा प्रदेश बळीराजाची राजधानी म्हणून ओळखला जाई असे समकालीन शिलालेख सांगतात म्हणजे याच्याही पूर्वी अनेक शतकांपासून हे स्थान बळीराजाची राजधानी(पाताळगमनानंतरची)म्हणून ओळखले जात होते असे दिसते,विशेष म्हणजे या तिन्ही राज्यातील कृषकांनी बळीराजाची आठवण उपरोक्त प्रमाणे टाकोटाक जपल्याचे आपण जाणतो,प्रदेशपरत्वे बळीचे वारसदार त्याच्या स्मृती टिकवून आहेत हेच यातून दिसते.
महाराष्ट्रातील माताभगिनी आजही दिवाळीच्या सणाला 'इडा पिडा जावो बळीचे राज्य येवो' असे म्हणत असतात ते बळीराजाच्या आठवणीमुळेच,या आकृत्या त्याचेच द्योतक आहेत.
क्रमशः
©लेखक Mayur D Chavan