24/02/2026
- आजच्या नाशिक क्राईम न्यूज -
३० किमी पाठलाग करत तोतया पोलिसांच्या मुसक्या आवळल्या -
नाशिकच्या अंबड पोलिसांनी 'पोलीस' असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या दोघा सराईत भामट्यांना सिनेस्टाईल अटक केली आहे. पोलिसांनी संशयितांचा पाथर्डी फाटा ते ओझर असा तब्बल ३० किलोमीटर पाठलाग केला. या कारवाईत त्यांच्याकडून १० गुन्ह्यांमधील तब्बल ३० लाख रुपये किमतीचे २० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. हे आरोपी भिवंडीचे रहिवासी आहेत.
लाचखोरीत नाशिक राज्यात अव्वल -
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्हा राज्यात नंबर एक ठरला आहे. नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, अवघ्या २१ दिवसांत नाशिक विभागात लाचखोरीच्या १३ गुन्ह्यांमध्ये तब्बल २६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे.
मालेगावात ७ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग -
नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये मैत्रिणींसोबत खेळत असलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर २१ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे मालेगावात खळबळ उडाली आहे.
सारूळ जंगलातील थरारक हत्याकांडाचा उलगडा -
नाशिक-मुंबई महामार्गालगतच्या वाडीवऱ्हे हद्दीतील सारूळ जंगलात एका तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. मृत तरुणी मूळची बुलढाण्याची असून अकोल्यातून बेपत्ता झाली होती. ती दुसऱ्या मुलांशी बोलते या संशयातून तिच्याच मित्राने तिची हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.