08/09/2023
तुमच्या शिफारसीनुसार जवान आजच पाहून टाकला सहकुटुंब… स्पॉइलर देणारे रिव्ह्यू वगैरे येण्याच्या आतच.
फुल पैसा वसूल सिनेमा आहे… त्यापलीकडेही बरंच काही आहे.
मेनस्ट्रीम हिंदी सिनेमाने सध्या आणि पुन्हा एकदा दक्षिणेचा हात पकडला आहे, हे उत्तम काम झालेलं आहे.
लेखक-दिग्दर्शक ॲटलीमध्ये इंडियन, नायक, शिवाजी द बॉसचा शंकर संचारला आहे. गंभीर समस्यांची सुटसुटीत सोपी आणि झटपट सोडवणूक हा फॉर्म्युला घिसापिटा असला तरी रंजक आहे, प्रेक्षकांना खोटं खोटं का होईना समाधान देणारा आहे. हा सिनेमा कमलहासन किंवा रजनीकांत यांच्यासाठी लिहिला असावा, असाच प्रचंड मोठ्या कॅनव्हासवरच्या बोल्ड स्ट्रोक्सचा मेगा मासी सिनेमा आहे. त्या प्रकारच्या मांडणीत शाहरूख परफेक्ट फिट बसतो, हे त्याचं क्रेडिट. शिवाय कथानकातले ट्विस्ट अँड टर्न, शाहरूखचे अवतार, त्याचा सर्वार्थाने कडक परफॉर्मन्स, सातही पोरींची अफलातून साथ, ईशान्य भारताचा रेफरन्स, खतरनाक सिनेमॅटोग्राफी, अंगावर येणारं पार्श्वसंगीत हे सगळं आहेच. मला खास आवडला तो कावेरी अम्माचा उल्लेख… शाहरूखने स्वदेस रिलीझ झाला तेव्हा जवळपास डिसओन केला होता. नंतर अनेक वर्षांनी त्याने करण जोहरच्या शोमध्ये दोन सिनेमांपैकी आवडता सिनेमा निवडताना स्वदेसची निवड केली होती, तेव्हा छान वाटलं होतं, आता आणखी छान वाटलं.
या सिनेमाचं सबटेक्स्ट, कितीही बटबटीत वाटलं तरी, आजच्या वातावरणात फार महत्त्वाचं आहे. इथे मी अमुक बनवलं, तमुक बनवलं, केवढी प्रचंड प्रगती केली, असं रेकून रेकून धादांत खोटं बोलणारा राजकीय नेता आहे. काफिल खानशी उत्तर प्रदेशाच्या बुलडोझर सरकारने केलेल्या गैरवर्तणुकीची आठवण करून देणारी कहाणी आहे, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न आहे, फोर्थ वॉल भेदून लोकांना मताधिकाराचा योग्य वापर करा, जात, धर्म, पंथ याच्या आधारावर मतदान करू नका असं पोटतिडिकीने सांगणारा शाहरूख खान आहे… या सिनेमात बऱ्याच काळाने सगळ्या देशभरातले, सर्व धर्मपंथांचे लोक ‘गर्दी’ म्हणून का होईना दिसतात, हे फार महत्त्वाचं आहे. दक्षिणेत व्यावसायिक सिनेमे थेट राजकीय भाष्य करणारे असण्याची परंपरा आहे. हिंदी व्यावसायिक सिनेमा मधल्या काळात (बहुतेक बहिष्कारी कावळे, सनातनी, ट्रोल गँग यांना घाबरून) एकदम तकलादू परीराज्यात, इतिहासाच्या कंटाळवाण्या पोषाखी मांडणीत, कॉमिक बुक्समध्ये शिरला होता. तो पठाण आणि जवानमधून शाहरूखने व्यवस्थित जमिनीवर आणलेला आहे. त्याला रंजक आणि समकालीन बनवून टाकलं आहे.
पडद्यावर कोणी सिगरेट ओढणारी व्यक्तिरेखा असली तर सतत खाली वैधानिक इशारा येतो. त्याची खिल्ली उडवण्यासाठी की काय सिनेमात सतत धूम्रपानाचे प्रसंग आहेत. त्यात विनोद म्हणजे शेतकरी आत्महत्यांच्या प्रसंगात सेन्सॉर बोर्डाने आत्महत्या करणं हा समस्या सोडवण्याचा योग्य मार्ग नाही, असं सांगणारी पाटी लावली आहे. तुमचं काम आहे का हे? कसल्या बिनडोक पाट्या लावत फिरता? सर्वसामान्य लोक मूर्ख आहेत की शेतकरी? हिंमत असेल तर सरकारने शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आणता कामा नये, अशी पाटी लावा राव! उद्या हे किसिंग सीनच्या खाली चुंबन घेण्याआधी शक्यतो ब्रश करावे, अशी पाटी लावतील.
असो.
शाहरूखने दोनच सिनेमांमध्ये तो काय चीज आहे, ते दाखवून दिलं आहे. फक्त आता क्लीन शेव्हन लुकमध्ये (इथे गरज होती, याची कल्पना असली तरी) त्याने येता कामा नये, एवढीच एक विनंती आहे. आता त्यात वय लपत नाही आणि वय लपवण्याचा प्रयत्न झाला तर तो लैच केविलवाणा दिसतो.
अमिताभने ‘आखरी रास्ता’ आणि ‘हम’सारख्या सिनेमांतून आपल्या वयाला सुसंगत वयाच्या व्यक्तिरेखांकडे वळण्याचा मार्ग फार चतुराईने पत्करला होता (नंतर लाल बादशहा, हिरवा अर्जुन, नारिंगी मेजर साहब वगैरे सप्तरंगी माती खाल्ली तो विषय वेगळा…) शाहरूखने त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली आहे… मुरलेल्या मद्यासारखा मुरत चालला आहे हा भिडू. तो जवान आहे, तोवर आम्ही पण जवान राहणार आहोत. मोअर पॉवर टु हिम!
Mukesh machkar