Vashi Samachar

Vashi Samachar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vashi Samachar, Media/News Company, Sector 15, Vashi, Navi Mumbai (New Mumbai).

Bring to the knowledge of citizens about the day-to-day happenings, social / political events, civic policies, police reports and other news and current events of Navi Mumbai.

13/04/2026

नवी मुंबई गुन्हे शाखेकडून ऐरोली गोळीबार प्रकरण उघड; ५ आरोपी अटकेत

ऐरोलीतील RTI कार्यकर्ता अमित मौर्य आणि बिल्डर संदीप गावस यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा नवी मुंबई गुन्हे शाखेने छडा लावला असून या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल उर्फ पवन साहनी (शूटर), गुरफान खान (सूत्रधार), सय्यद खान, नागेश माने आणि विशाल महाडिक यांचा समावेश आहे. या सर्व आरोपींना तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना ६ एप्रिल रोजी ऐरोली परिसरात घडली होती. आरोपींनी हेतूपुरस्सर जीवे मारण्याच्या उद्देशाने चार गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात RTI कार्यकर्ता अमित मौर्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस तपासानुसार, या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकामांवरून झालेला वाद तसेच जुन्या आर्थिक व्यवहारातील तणाव कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या वादातूनच हल्ल्याचा कट रचण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

13/04/2026

तुर्भे (एमआयडीसी) मध्ये MTNL केबल जाळण्याचे रॅकेट उघड; २५ जण अटकेत, सुमारे ५ कोटींचा मुद्देमाल जप्त

तुर्भे एमआयडीसी परिसरातील जंगलात MTNL कंपनीच्या केबलची चोरी करून ती जाळून त्यातून तांबे (कॉपर) काढण्याचा मोठा रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तब्बल २५ आरोपींना अटक केली असून सुमारे ५ कोटी रुपयांचा केबलसाठा आणि ४ टेंपो जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरी केलेले MTNL केबल टेंपोमध्ये भरून तुर्भे एमआयडीसीतील निर्जन जंगल भागात आणले जात होते. तेथे केबल जाळून त्यातील तांबे वेगळे करून विक्रीसाठी पाठवले जात होते. हा प्रकार गेल्या काही काळापासून सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक टेंपो घटनास्थळीच पकडला, तर आतमध्ये जाऊन पाहणी केली असता आणखी तीन टेंपो आणि अनेक जण केबल जाळताना आढळले. त्यानंतर सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या रॅकेटमध्ये मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील गुन्हेगारांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निजाम उर्फ नियाज खान यालाही घटनास्थळी अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या रॅकेटमागे आणखी कोणाचे नेटवर्क आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

12/04/2026

घणसोलीतील माथाडींच्या घरांचे नवे स्वप्न साकार होणार...नगरसेवक सौरभ शिंदे यांच्या प्रयत्नांना यश; 79(अ) ठराव बहुमताने मंजूर

घणसोली येथील माथाडी कामगारांच्या मोडकळीस आलेल्या घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पाला आज झालेल्या महत्त्वपूर्ण सर्वसाधारण सभेमुळे गती मिळाली आहे.

पुनर्विकास प्रक्रियेतील कलम 79(अ) अंतर्गत आज बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्विकास प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर झालेल्या मतदान प्रक्रियेत कलम 79(अ) अंतर्गत पुनर्विकास ठरावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली.

या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी बांधकाम व्यवसायिकाची निवड करण्याची प्रक्रिया देखील पार पडली. यामध्ये भगवती या बांधकाम व्यवसायिकाची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुनर्विकासाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घणसोलीतील माथाडी कामगारांची घरे अनेक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता पुनर्विकासाचा निर्णय झाल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक रहिवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरात लवकर नवीन इमारतींचे काम सुरू व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

12/04/2026

मानखुर्द मेट्रो स्टेशन परिसरात पैसे घेत असल्याचा कथित प्रकार समोर....

मानखुर्द मेट्रो स्टेशन परिसरात (वॉर्ड १४२, सायन–पनवेल महामार्ग) एका पोलिस हवालदाराचा सिव्हिल ड्रेसमध्ये विक्रेते आणि हॉटेल चालकांकडून पैसे घेत असल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार एका स्थानिक पत्रकाराने कॅमेऱ्यात कैद केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाबाबत अद्याप अधिकृत माहिती किंवा पोलीस विभागाकडून स्पष्ट प्रतिक्रिया समोर आलेली नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा केली जात आहे. या प्रकरणाची सत्यता व नेमकी पार्श्वभूमी तपासल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

12/04/2026

घणसोली–तळवली परिसरात सिडकोची मोठी निष्कासन कारवाई; 1100 चौ.मी. भूखंड अतिक्रमणमुक्त

घणसोली नोडमधील सेक्टर 25 तसेच मौजे तळवली परिसरात अनधिकृत बांधकामांवर सिडकोतर्फे दि.10 एप्रिल 2026 रोजी धडक निष्कासन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत रघुनाथ बाळकृष्ण पाटील यांच्या नावावर असलेले अनधिकृत बांधकाम पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आले.

सिडको प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर कारवाई नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. या मोहिमेसाठी 1 पोकलेन मशीन, 5 मजूर, 1 सुपरवायझर, 1 फोटोग्राफर आणि 1 व्हिडिओग्राफर यांची टीम तैनात करण्यात आली होती. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात आली.

सदर अनधिकृत बांधकाम हे सिडकोच्या सुमारे 1100 चौ. मी. भूखंडावर उभारण्यात आले होते. दीर्घकाळापासून या भूखंडावर अतिक्रमण झाल्याची नोंद प्रशासनाकडे होती. अखेर सिडकोने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ही निष्कासन मोहीम राबवत संपूर्ण अतिक्रमण हटवले.

या कारवाईनंतर संबंधित भूखंड पूर्णतः अतिक्रमणमुक्त करण्यात आला असून परिसरात सिडको प्रशासनाने पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आल्याचे समजते.

या कारवाईमुळे घणसोली–तळवली परिसरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग मिळाल्याचे चित्र दिसत आहे.

12/04/2026

मसाला मार्केटमध्ये ५० लाखांची चोरी; CCTV मध्ये कैद चोर, पोलिसांचा शोध सुरु

वाशी मधील मसाला मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याच्या कार्यालयातून सुमारे ₹५० लाखांची मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने रात्रीच्या वेळी कार्यालयात प्रवेश करत रोख रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे, संपूर्ण चोरीचा प्रकार दुकानात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये चोराचा चेहरा आणि हालचाली स्पष्ट दिसत असून, याच आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात आहेत. तसेच, संशयिताचा माग काढण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांनी या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली असून, रात्रीच्या वेळी अधिक कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली आहे.

12/04/2026

ठाणे–बेलापूर (रबाळे) महामार्गावर ‘अपघाताचा बनाव’ करून लूट; कारचालकांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे–बेलापूर रोडवर रबाळे येथे अपघाताचा बनाव करून कारचालकांना गंडा घालणारी टोळी सक्रिय झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐरोलीतील संकेत (नाव बदललेले) हे कामावरून घरी जात असताना दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीमुळे नुकसान झाल्याचा बनाव करत त्यांना अडवले.

त्या तरुणांनी मोबाईल फोन डॅमेज झाल्याचे सांगत वाद घालत “तडजोड” करण्याचा दबाव टाकला. परिस्थिती चिघळू नये म्हणून संकेत यांनी अखेर १००० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. पैसे घेतल्यानंतर आरोपी त्वरित पसार झाले.

विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर रबाळे MIDC पोलीस चौकी असतानाही अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सदर संपूर्ण प्रकार गाडीच्या डॅश कॅमेरामध्ये कैद झाला आहे.




12/04/2026

वाशी-मानखुर्द हायवेवर कार चालकाचा राडा; रिक्षाचालकाला धमक्या, पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

वाशी-मानखुर्द हायवेवर काल घडलेल्या एका घटनेत कार चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत रिक्षाला धडक देत रिक्षाचालकाला धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शी प्रवाशांच्या माहितीनुसार, एमएच 14 BE 3000 क्रमांकाची कार हायवेवर अचानक रिव्हर्स घेत असताना मागून येणाऱ्या रिक्षाला घासली. या चुकीनंतर माफी मागण्याऐवजी कारमधील 4 ते 5 तरुणांनी रिक्षाचालकावरच आक्रमक भूमिका घेत शिवीगाळ आणि धमकावण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर आई-बहिणीवरूनही अपमानास्पद भाषा वापरल्याचा गंभीर आरोप आहे.

घटनेदरम्यान हायवेवरच कार रिव्हर्स घेतल्याने इतर वाहनचालकांच्याही सुरक्षेला धोका निर्माण झाला होता. याच वेळी कारमधील मागील सीटवर बसलेल्या व्यक्तीने अचानक दरवाजा उघडल्याने सदर परिस्थिती निर्माण झाली होती.

प्रवाशांनी या प्रकाराचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित कार चालकाने दबाव टाकत फोटो डिलीट करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही ट्रॅफिक पोलिसांनीही रिक्षाचालकाची बाजू न घेता कार चालकाला समर्थन दिल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी “कायदा फक्त श्रीमंतांसाठीच आहे का?” असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे. सामान्य रिक्षाचालकावर अन्याय होत असताना प्रशासन मूक का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

संबंधित कार चालकावर तातडीने कठोर कारवाई करावी, तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी जोरदार मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


11/04/2026

पोलीस चौकीसमोरच ‘फ्री-स्टाईल’ राडा; कोपरखैरणेत भररस्त्यात हाणामारी, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

कोपरखैरणे परिसरात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन टाकी परिसरात पोलीस बीट चौकीसमोरच दोन वाहनचालकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रॅव्हल्स चालक आणि चारचाकी वाहन चालक यांच्यात किरकोळ कारणावरून सुरुवातीला वाद झाला. मात्र, काही क्षणातच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करत अक्षरशः ‘फ्री-स्टाईल’ राडा घडला. या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, तर वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

घटनेचे गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस चौकीच्या अगदी समोर घडला. त्यामुळे “पोलिसांच्या नाकाखालीच गुंडगिरी होत असेल, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कुणाकडून करावी?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक भूमिका घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




11/04/2026

सिम्प्लेक्स पुनर्विकासाला सकारात्मक दिशा; नागरिकांचा पाठिंबा

घणसोली सेक्टर-7 येथील सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकास प्रकल्पाला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, सुरू असलेला संभ्रम आता दूर होताना दिसत आहे. स्थानिकांनी स्पष्टपणे सांगितले की, “आमचा प्रकल्पाला विरोध नाही.”

नागरिकांच्या मते, काही समाजकंटकांकडून चुकीची माहिती पसरवली जात होती. मात्र आता रहिवासी एकत्र येत प्रकल्पाला समर्थन देत असून, सुरक्षित व आधुनिक घरांच्या दृष्टीने पुनर्विकास आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

दरम्यान, ओमसाईधाम सोसायटीतील डॉ. दिलीप मुंडे यांनी सांगितले की, “आमच्या सह्या वापरल्याचे दाखवून काही जण प्रकल्पाला विरोध करत आहेत.”

नागरिकांच्या एकजुटीमुळे प्रकल्पाला सकारात्मक दिशा मिळत आहे.

11/04/2026

महावितरणच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह; सलग घटनांमुळे संताप वाढला

कोपरखैरणे सेक्टर-19 येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या महावितरणच्या अत्यंत धोकादायक डीपी (विद्युत वितरण पेटी) जवळील ‘जॉईंट’ला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. एक दुचाकी थोडक्यात जळता जळता वाचली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ऐरोली सेक्टर-4 परिसरातील अभिनंदन हॉटेलजवळही अशाच प्रकारे महावितरणच्या डीपीला आग लागल्याची घटना घडली होती. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

स्थानिकांनी महावितरणच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, अनेक ठिकाणी नियमित मेंटेनन्स होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच वारंवार तात्पुरते ‘जॉईंट’ मारून काम भागवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी अशा धोकादायक डीपींची तातडीने दुरुस्ती करून त्यांची नियमित व शिस्तबद्ध देखभाल करण्याची जोरदार मागणी केली आहे.

#पब्लिकसेफ्टी

Address

Sector 15, Vashi
Navi Mumbai (New Mumbai)
400703

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vashi Samachar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share