
05/08/2025
मा. आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर – दैदिप्यमान नेतृत्वाचा उज्वल प्रवास
प्रसाद हनुमंते : प्रशांत रामशेठ ठाकूर – हे नाव उच्चारलं की कर्तृत्व, नम्रता आणि जनतेशी असलेलं नातं यांचा संगम डोळ्यासमोर येतो. या नावामागे उभं आहे एक ठाम नेतृत्व, जे आपल्या वडिलांचे, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विचार, कार्य आणि जनसेवेची परंपरा पुढे नेत आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातून ‘रामराज्य’ म्हणजे काय, हे सिद्ध केलं. पक्ष संघटनेपासून खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श होता. रायगड जिल्ह्याचा विकास, जनतेशी संवाद आणि समृद्धीचा आराखडा यामागे त्यांची दूरदृष्टी होती.
या परंपरेचे खरे वारसदार ठरले, त्यांचे सुपुत्र – प्रशांत ठाकूर. त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि आता सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून येत आपल्या कर्तृत्वाची ठसठशीत मोहोर उमटवली आहे. त्यांच्या कार्याचा पसारा फक्त राजकारणापुरता मर्यादित नसून, तो समाजकारण, शैक्षणिक प्रगती, सामाजिक उपक्रम आणि सर्वांगीण विकास यांपर्यंत विस्तारलेला आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर या शहराच्या खऱ्या अर्थाने विकासाची गंगा वाहायला लागली ती मा. प्रशांत ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळेच. त्यांच्या अथक प्रयत्नांनी पनवेल हे केवळ नकाशावरील एक ठिकाण न राहता विकासाचं हृदयस्थान बनलं आहे.
त्यांचा स्वभावही तितकाच नम्र आणि संवादशील. कार्यकर्त्यांच्या अडचणी, जनतेचे प्रश्न – हे ते स्वतःचे समजून घेतात. म्हणूनच आज तमाम पनवेलवासीयांच्या हृदयात ते “दादा” या प्रेमळ नावाने वसले आहेत.
त्यांचे बंधू मा. परेश ठाकूर हेसुद्धा नगरसेवक आणि सभागृह नेते या पदांवर कार्य करत पनवेलच्या विकासात मोलाचा वाटा देत आहेत. ठाकूर कुटुंबीयांचे हे एकत्रित नेतृत्व म्हणजे सामूहिक समर्पणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
विरोधकांचे निरर्थक आरोप आणि अस्थिर टिकाटिप्पणी याकडे दुर्लक्ष करत "कृती हीच खरी प्रतिक्रिया" या भूमिकेतून मा. प्रशांत ठाकूर आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवतात. “ज्या झाडाला फळं लागतात, त्यालाच दगड मारले जातात” या उक्तीप्रमाणे त्यांच्यावर होणारी टीका त्यांच्या यशाचंच द्योतक आहे.
आज प्रशांत ठाकूर हे केवळ आमदार नाहीत, तर एक प्रेरणादायी नेतृत्व, कार्यकर्त्यांचा आधार, आणि जनतेचा खरा सेवक म्हणून उदयास आले आहेत. ते नेता असूनही कार्यकर्ता राहतात — आणि हीच गोष्ट त्यांना लोकांच्या मनात अमर बनवते.