
28/10/2024
पाहुण्याचा दशक्रिया विधी कार्यक्रम उरकून भर उन्हात गावाकडं निघालो होतो ,वाटेतल्या गावाच्या चौकात एका टपरी समोर हातात पाण्याची बॉटल घेवून उभा असलेल्या एका युवकाने मला हात केला.आवाज दिला ,मी थांबलो ,त्याला गाडीवर घेतलं अन निघालो ,
थोडसं पुढं आलो की खिशातला फोन वाजला ,गाडी बाजूला घेवून उभी करून,थांबवून मी फोनवर बोलू लागलो ,
बोला ,काय म्हणातोय ?
गावाला आलो होतो .
एका पाहुण्याच्या दहाव्याला,
हे काय निघलोयचं येतोय तास दिड तासात .
माझं फोनवर बोलणं सुरू अन त्यांचं टुमणं सुरूचं ,
सर चलांना जरा अर्जेंटयं ,
मला ही वाटलं असलं त्यांचं काही महत्वाचं काय म्हणून मी समोरच्या म्हणालो,ठेव निवांत झालो की फोन करतो गाडीवरयं
चालू फोन कट केला आणि निघालो ,
गावाच्या बाहेर थोडं येतो ना येतो तोच माझ्या पाठीवर हलकासा हात मारत तो म्हणाला,
ओ सर ,थांबा थांबा ,
मी गाडीचा वेग कमी करून गाडी थांबवूसतोर तो उतरलाही ही आणि चलाता चलता घाई घाई पॅंटच्या कचकी खोलीत रस्त्याच्या कडला असलेल्या झूडपाच्या आडूंगी जावून बसला ही ,तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं की तो एवढी घाई का करत होता म्हणून,
मनात म्हणलं च्यामारी ,लोकं आपल्या चांगूलपणाचा असा गैरफायदा घेतात ,वाटलं मोठ्याने बोलून त्याला कुभावाने मुद्दाम विचारावा
तुझं उरकूसतोर थांबू का रं ?
तुझं उरकलं की सांग
तुला परत सोडून येतो ,
पण दुसरं मन म्हणलं ,त्यांच्या जागी तू ही असतास अन तुला असा अर्जंट कॉल असता तर तू ही अशाच वागला असतात ,जाऊ दे, दे सोडून ,मी आपला गाडीला किक मारून पुढं निघालो अन विचार करू लागलो ,
कुठं गेली गावं हागणदारीमुक्तीची बिगर खर्ची योजना ?
काय झालं ग्राम स्वच्छता अभियानाचं ?
लोकांचे अनुदानापुरते शौचालय बांधले अन त्यात सरपनं भरून ठेवले ,लोकांने तरी ते वापरावीत तरी कसे ?पडत्या पावसात इथं शेंदून पाणी आणावा लागतंय ,पेयजल योजनेवर कोट्यवधी रूपयांचा निधी खर्च झालायं पण गावातल्या नळाला पाणी येत नाही ,इथं सार्वजनिक गटाराचं पाणी गावभर खेळत ,एक ही गाव तुम्हाला शोधून सापडणार नाही की जिथं सार्वजनिक शौचालय आहे म्हणून ? खाल्लं की हागावा लागतचं हे मग लोकं कुठं ही हागतात कोणतं ही गाव असो नाक दाबून गावात प्रवेश करावा लागतो ,
लसीकरणापुरते आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात येतात , ग्रामसेवक,तलाठी महसूल खात्याचे कर्मचारी तालुक्यातून गावाचा कारभार पाहातात ,गाव चालवणारे बहुतेक लोकनियुक्त पदाधिकारी पुढारी सरपंच बिरपंच वगैरे ही शहरातच राहातात ,नाही म्हणायला सरकारी शाळेचे गुरूजी तेवढे रोज गावात येतात,ते तरी बिचारे करून करून काय करतील ?त्यांच्या मागं सतराशे साठ कामं ..
मी ह्या विचारांच्या तंद्रीत चाललो होतो तेवढ्यात समोरून गाड्यांचा प्रचंड ताफा रस्त्यांने येताना दिसला , तालुक्याचा विकास करण्यासाठी निवडणूकीला उभा असलेला कुणीतरी पुढारी आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह शक्ती प्रदर्शन करत चालला होता,मी आपली गाडी बाजूला उभी करून थांबलो ,तो कळप निघून गेल्यावर पुन्हा पुढं निघालो रस्त्यावरचे खड्डे चुकवीत धक्के खात खात...
--- लक्ष्मण खेडकर