19/07/2025
🛑 "येरमाळा – बार्शी घाट मार्गावरील रात्रीच्या प्रवासासाठी सावधान!"
काल रात्री मला येरमाळा-बार्शी घाट मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना एक अत्यंत भयानक आणि धक्कादायक अनुभव आला. या अनुभवामुळे मला आणि माझ्यासोबत असलेल्या चालकाला केवळ आर्थिक नुकसानच झाले नाही, तर जीवित धोक्याची जाणीवही झाली. हा अनुभव इतर प्रवाशांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो, म्हणूनच हा लेख लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतूने लिहित आहे.
---
🕒 घटनाक्रम – पहाटे साडेतीनचा वेळ
मी एका खाजगी प्रवासी वाहनाने हडपसरहून कळंबकडे प्रवास करत होतो.गाडीचा चालक होता स्वामी बांगर,केज तालुक्यातील तरनाली गावचा एक २२ वर्षांचा होतकरू तरुण, जो स्वतःच्या हिमतीवर दोन प्रवासी गाड्यांचा मालक झाला आहे.स्वामी दर आठवड्याला गावाकडे येत असतो असं तो सांगत होता. प्रवासादरम्यान आमच्यात छान संवाद झाला – त्याच्या मेहनतीची आणि प्रगतीची कथा प्रेरणादायक वाटत होती.
बार्शीपर्यंत सर्व प्रवासी उतरले, आणि पुढे बार्शी ते कळंब हा प्रवास फक्त मी आणि स्वामी मिळून करत होतो. घाट चढून जात असताना थोडा वेळ मी डुलकी घेतली.
---
🚨 घटनास्थळी – येरमाळा घाटातला धक्का
अचानक एक मोठा आवाज झाला. जागा होऊन पाहतो तर काय – एक व्यक्ती गाडीची मागील काच फोडून आतील बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता! मी क्षणाचाही विलंब न लावता स्वामीला मोठ्याने ओरडलो –
"स्वामी, पटकन गाडी पुढे घे!"
स्वामीने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडी अत्यंत वेगात चालवली. तो रस्ता प्रचंड खराब असूनही त्याने कुठलाही विचार न करता गाडी घाटातून पुढे काढली. जवळपास दोन ते तीन मिनिटे आम्ही तशीच भरधाव वेगाने गेलो आणि अखेर येडेश्वरी मंदिराच्या कमानीजवळ गाडी थांबवली.
---
🔍 नुकसान आणि मनस्ताप
गाडीची काच फोडली गेली होती आणि चोराने एक बॅग चोरून नेली होती. सुदैवाने त्या बॅगेमध्ये फक्त चार्जर आणि कपडे होते. पण गाडीचं नुकसान, काच फोडण्याचा आवाज, जीवाला आलेला धोका – या सगळ्यांनी आम्हाला हादरवून सोडलं.
स्वामी याआधी आनंदी होता – प्रवाशांकडून मिळालेले दोन-तीन हजार रुपये, सीएनजी भरल्यानंतर उरलेली रक्कम, सगळं तो उत्साहाने सांगत होता. पण काही मिनिटांत त्याचे ८ ते ९ हजार रुपयांचे नुकसान झाले. मी त्याला फक्त एवढंच म्हणालो –
"स्वामी,सर सलामत तो पगडी पचास!"
---
🚧 या रस्त्यावरच्या समस्या – कारण आणि उपाय
या संपूर्ण घटनेतून खालील गोष्टी स्पष्ट होतात:
✅ रस्त्याची अत्यंत खराब अवस्था – घाटातील मार्ग दुरुस्त न झाल्यामुळे वाहनं हळू चालतात, आणि हीच संधी चोरांना मिळते.
✅ अंधार आणि लाईटची नसणे-रस्त्यावर स्ट्रीट लाईट नाहीत, त्यामुळे रात्री प्रवास अधिक धोकादायक होतो.
✅ पोलीस यंत्रणेची अनुपस्थिती किंवा दुर्लक्ष – या भागातील घटनांची माहिती पोलीस प्रशासनाला असूनही ठोस कारवाई नाही.
✅ रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीकडून हलगर्जीपणा – टेंडर घेऊनही वेळेत काम पूर्ण होत नाही.
---
📢 प्रवाशांसाठी सूचना
1. रात्री या मार्गावर प्रवास टाळा.
2. प्रवास करताना गाडीतील सर्व सामान सुरक्षित ठेवा – शक्यतो काचांपासून दूर.
3. गाडीच्या काचा बंद ठेवा आणि लॉक वापरावे.
4. स्थानिक पोलीस स्टेशनला अशा घटना कळवा – त्यांच्यावर सार्वजनिक दबाव निर्माण होणे आवश्यक आहे.
5. स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील याविषयी कळवा – रस्ते, लाईट आणि सुरक्षा यावर ठोस उपाय अपेक्षित आहेत.
🙏 शेवटी एवढंच...
"चोर बॅग घेऊन गेला, पण त्यात काही नव्हतं – फक्त कपडे आणि चार्जर!
कदाचित शेवटी तोही आमच्या नावाने बोंब मारत असणार – ‘डाव फेल गेला म्हणून ’!"
हा लेख लिहिण्याचा एकमेव उद्देश – प्रत्येक प्रवाशाने सावधगिरी बाळगावी.
रस्त्यावरून जाताना बेफिकिरीने नव्हे, तर जागरूकतेने प्रवास करणे आजच्या काळाची गरज आहे.
✍️ लेखक:प्रा.सतिश मातने
📍 स्थान: बार्शी–कळंब मार्ग येरमाळा घाट
🗓️ अनुभवाची वेळ: पहाटे 3.30 – 4.00 दरम्यान
हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, शेअर करा – कारण जागरूकतेमुळेच सुरक्षितता निर्माण होते.
#प्रवासीसावधान #येरमाळाघाट
Devendra Fadnavis राजकिय कट्टा-Rajkiya Katta