
11/07/2025
अनोखा रिश्ता
असं म्हणतात की लग्न ही एक ॲडजस्टमेंट असते. पैश्यांपासून भावनांपर्यंत सर्व गोष्टीत व्यक्त किंवा मूक तडजोड असते.
पण तिचं आणि त्याचं लग्न ही ॲडजस्टमेंट, व्यावहार, अलिखित करार सर्व काही होतं.
तो एका अपघातामुळे अपूर्ण होता. त्याची मर्यादा तिची शरीराची तहान भागवू शकत नव्हती हे त्याला माहीत होतं.
शिवाय तिचा एक्स बॉयफ्रेंड होता.
काही गोष्टी समाजात आणि घरी माणूस स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाही आणि तडजोड स्वीकारतो.
त्याला आणि घरच्यांना त्याच्या कमतरतेची जाणीव होती. तरीही सततचा “लग्न कर” ह्या दबाव असायचा.
तो घरच्यांच्या ह्या दबावाला बळी पडला.
आणि ती
मनात असून सुद्धा एक्स बरोबर लग्न करण्यास घरच्यांचा विरोध आणि त्यांच्या निर्णयामुळे ती जाऊ शकत नव्हती. पण ती त्या एक्सला सोडूही शकत नव्हती. ती एक्स साठी पॅशनेट होती
एक अपूर्ण आणि एक निरिच्छ
अनेक दबाव, आणाभाका आणि धमक्या ह्याच्या समोर मान तुकवून एकत्र आले.
त्याने तिच्याबरोबर डिस्कस करून एक निर्णय घेतला.
“आज पासून आपलं लग्न हे एक ओपन मॅरेज असेल…” तो म्हणाला.
तिने देखील मान्य केलं.
“अट… तो कोण आहे ते मला कळलं पाहिजे आणि माझ्या बरोबर असताना ती वृत्तीने व्हर्जिन असली पाहिजे”
भारतीय समाजात ओपन मॅरेज ही कल्पना फारशी माहितीही नाही. मग ती लोकांनी स्विकारणे हा खूप लांबचा प्रश्न होता.
त्याच्या ह्या खूप वेगळ्या आणि अनोख्या जेस्चरमुळे ती खूप इम्प्रेस झाली. तिने आत्तापर्यंत एव्हढा लिबरल माणूस कुणीच बघितला नव्हता.
त्याने विचार केला होता
“जी गोष्ट माझ्याकडे नाही, जी गोष्ट मला काही कारणाने मिळत नाही आणि मी देऊ शकत नाही, ती गोष्ट तिला का मिळू नये? तिने का विन्मुख राहायचं? तिला सुखी असायचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या मर्यादांच्या जात्यात ती का भरडली जावी?”
त्याचे हे विचार ऐकून ती खूप सुखावली.
तिने त्याला एक्स बद्दल सगळं सांगितलं.
तो तिच्या सर्व सुख दुःखांची काळजी घ्यायचा. आणि ती देखील मानसिक आणि भावनिक दृष्ट्या त्याच्यात खूप गुंतली होती. एक शारीरिक सोडले तर दोघेजण एकमेकांना भरपूर प्रेम देत होते.
काही महिने आणि मागून वर्षे अशीच गेली. त्याची अपेक्षा फार मोठी नव्हती. त्याला मानसिक आणि भावनिक सुख हवे होते आणि ती देत होती. तिला बाकीचे सुख एक्स देत होता. एका समोर दुसर्याचा विषय कधीच निघत नव्हता. दोघांनाही जे हवं होतं ते मिळत होतं. त्यामुळे सगळेच सुखी होते.
किमान दाखवत तरी होते
एके दिवशी सकाळी तीच्या डोक्यात एक्सचं आदल्या दिवशीचं बोलणं घुमत होतं
"उद्या सकाळी दहा वाजता तू आणि मी आउटिंगला जाऊ. चार वाचेपर्यंत परत येऊ"
ती त्याच तंद्रीत आवरत होती.
निघताना तो तिला म्हणाला
"आज घरीच थांबशील? आय ॲम फिलिंग लोनली"
"ओह! नो रे! आज मला जायलाच हवं. परत आले की सगळा वेळ फक्त तुझा असेल" असे सांगून ती निघाली
"इट्स ओके. नो प्रॉब्लेम" तो म्हणाला
तिने निघताना त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या चेहर्यावर स्मितहास्य होतं. तिला त्यात एक उदासीनता जाणवली. त्यात असहाय्यता आणि अगतिकतेचं वैषम्य होतं. तिला प्रथमच हृदयात चर्र झालं.
काही दिवसांनी ती त्याला म्हणाली
"इतका शांत आणि संयमी कसा तू? तुला राग नाही येत? तुला त्रास नाही होत?"
"कशाचा आणि कुणाचा?" त्याने विचारलं
"माझा आणि एक्सचा" ती उत्तरली
तो दोन मिनिटं खिडकीबाहेर बघत शांत बसला आणि एकदम म्हणाला
"नाही! कारण प्रेत जाळले म्हणुन अग्नी अपवित्र होत नाही. अग्नि यज्ञात सुद्धा वापरतात. तसंच प्रेमाचं सुद्धा आहे. प्रेम ही भावना आहे. ती कुठल्यातरी एका कारणाने अपवित्र होत नसते. भावनिक आणि मानसिक पातळीवरचं प्रेम मोठं की शारीरिक प्रेम मोठं हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोन आहे"
त्याच्या उत्तराने रात्रभर ती अस्वस्थ होती.
दुसर्या दिवशी तिने एक्सला मेसेज केला
“मी पुढचे काही दिवस भेटणार नाही”
चार दिवसांनी तिला एक्सचा कॉल आला
"मला तुला आज कुठल्याही परिस्थितीत भेटायचं आहे"
"मी नाही येणार" ती उत्तरली
"का?" तिच्या नकाराने एक्स जरा चिडला होता.
"मी तुला कारण सांगायला बांधील नाही. आजपर्यंत ह्याने सुद्धा असं कधी संशयाने आणि रागाने विचारलं नाही. सो यू बेटर बी इन युवर लिमिट" तिच्या आवाजात डिटरमिनेशन होतं.
"यू स्टूपिड स्लट" एक्स खूपच चिडला कारण बहुतेक तो नकार पचवू शकला नाही "अॅण्ड डोन्ट टॉक अबाउट दॅट लेम इडियट ह्युमन. तू मला आणि त्या इनकॉम्पीटंट माणसाला कंपेअर कशी करतेस? तो तुला काही देऊ शकत नाही. तुझं त्याच्याबरोबर झालेलं लग्न हे फक्त सोसायटीला दाखवायला आहे. तुला खरा आनंद फक्त मी देतोय"
त्याचे हे बोलणे ऐकून ती खूप संतापली
"माइंड युवर टंग. अणि ह्यापुढे मला कधीच भेटू नकोस" असे बोलून तिने फोन कट केला.
तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं.
“इतके वर्ष मी एक्स बरोबर आहे. त्याला मी नेहमीच प्रत्येक गोष्टीला हो म्हंटले. प्रसंगी काही ठिकाणी दुर्लक्ष केलं. आणि त्याच्या बदल्यात आज त्याने मला वेश्या म्हणावं? आणि दुसर्या बाजूला हा. कायम माझं मन सांभाळलं. कायम माझ्या पाठीशी राहिला. आणि मी? का मी माझी किंमत एका बाजारू स्त्री सारखी करून घेतली? रादर त्या स्वाभिमानी तरी असतात आणि आज एक्सने… शीट”
तिला स्वतःचा राग आला. आपलीच घृणा वाटायला लागली. तिचे मन अपराधीपणाच्या झोक्यावर वेगाने आंदोलने घेवू लागलं.
त्याच अवस्थेत ती बाथरूम मधे गेली. अंगावरचे सगळे कपडे काढून शॉवर सोडला आणि अर्धा तास शॉवर खाली उभी राहिली. सगळ्या स्पर्शखुणा आणि आठवणी तिला धुवून टाकायच्या होत्या.
गार पाण्याने संतापाचा दाह कमी झाल्यावर ती बाहेर आली.
बाहेर येवून तिने भरजरी साडी, त्याला आवडतो तसा केसांचा हलका अंबाडा, खूप हलका मेक अप आणि लग्नानंतर प्रथमच ठसठशीत कुंकू लावलं.
आरशात स्वतःला पाहताना तिचं तिलाच लाजायला झालं.
ती त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.
"आज काही विशेष आहे का?" त्याने आश्चर्याने विचारलं
"मी इतके दिवस एका नशेत वागत होते. आज माझी ती नशा उतरली" ती उत्तरली
"म्हणजे?” त्याला कळलंच नाही
"काही नाही. एक विनंती करू?"
"बोल ना"
"प्लीज गिव्ह मी अ बिग हग" तिच्या स्वरात आज खूप आर्तता होती
त्याने तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. ती त्याला घट्ट बिलगली होती.
"आय ॲम सॉरी… आय ॲम रिअली व्हेरी सॉरी…" एव्हढंच त्याला ऐकू येत होतं.
** अंततः हमे केवल उन्हें चुनना है जिनकी कहानी के मुख्य पात्र हम हों **
✍️ विक्रम इंगळे
२८ जून २०२५
#विक्रम_इंगळे
(भारतीय समाजामध्ये ओपन मॅरेज ही कन्सेप्ट नाहीये. खूप जणांनी ती ऐकली नसेल आणि खूप जणांना ती ऐकल्यावर पचणारही नाही.
ओपन मॅरेज ही एक पश्चिमात्य कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये दोन लोक जे भावनिक दृष्ट्या एकमेकात खूप गुंतलेले असतात, ते एकत्र राहतात पण, त्यांचे सेक्शुअल पार्टनर्स वेगवेगळे असतात. आपल्यासारखी पवित्र अशी विवाह संस्था त्यांच्याकडे नाही. त्यामुळे अशा गोष्टी चालतात. प्रश्न हा आहे की मी का लिहिलं ह्याच्यावर?
तर कोणे एकेकाळी लिव्ह-इन रिलेशनशिप, लग्न केलं तरी मूल नको किंवा लग्न न करता तसंच राहायचं ह्या कन्सेप्ट देखील पाश्चिमात्य होत्या आणि आपण विचार करत होतो की आपल्याकडे या कधीच येणार नाहीत.
बहुतेक आता कळलं असेल की मी हे का लिहिलं ते... मॉडर्न ह्या नावाखाली आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही)
#मराठी #वाचालतरवाचाल #भावनात्मक #जीवनाचेसत्य #वायरल #ब्लॉग Avdhut-अवधूत GreatestHighlights