Kalpana Dangat.

Kalpana Dangat. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kalpana Dangat., Digital creator, Pune University.

 #सन्मान_एका_पुस्तकाचा…  ौरव_माणुसकीचा..! ❣️✍🏻काही सोहळे फक्त कार्यक्रम म्हणून संपत नाहीत; तर ते मनात कायमची आठवण बनून र...
24/08/2026

#सन्मान_एका_पुस्तकाचा… ौरव_माणुसकीचा..! ❣️
✍🏻
काही सोहळे फक्त कार्यक्रम म्हणून संपत नाहीत; तर ते मनात कायमची आठवण बनून राहतात. काल राजगुरुनगर येथील चंद्रमा गार्डन हॉलमध्ये झालेला लेखक आणि समाजसेवक कैलास भाऊ दुधाळे यांच्या ‘माणुसकी जिवंत आहे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा असाच मनाला स्पर्श करून गेला.

आपल्या माणसांचं कौतुक आपणच करायचं असतं, त्यांच्या चांगल्या कामाची दखल आपणच घ्यायची असते. कालच्या सोहळ्यात याचा प्रत्यय अगदी मनापासून आला. विवाह सोहळ्याचा हॉल अक्षरशः भरून गेला होता आणि बाहेरही असंख्य माणसं उभी होती. इतका मोठा जनसमुदाय एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जमणे,हीच खरंतर कैलास भाऊंनी आपल्या आयुष्यात कमावलेल्या माणुसकीची खरी पावती होती.

कैलास भाऊ अनेक वर्षांपासून माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार, व्यसनाधीन आणि रस्त्यावर असहाय अवस्थेत आढळणाऱ्या व्यक्तींना आधार देत आहेत. कोणी रस्त्यावर पडलेलं असेल, गटारीत सापडलं असेल किंवा मदतीची गरज असेल, तर स्वतःच्या रिक्षातून त्याला हॉस्पिटलमध्ये, व्यसनमुक्ती केंद्रात किंवा निराधार केंद्रात पोहोचवण्याचं काम ते निःस्वार्थपणे करतात. गोरगरीब आणि आदिवासी बांधवांसाठी शहरातील श्रीमंतांकडून कपडे गोळा करून ते धुवून, इस्त्री करून गरजूंपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी अनेक वर्षे केलं आहे आणि करत आहेत.

याच अनुभवांची, वेदनांची, माणुसकीची आणि समाजसेवेची कहाणी त्यांनी शब्दबद्ध केली आणि त्यातून जन्माला आलं—‘माणुसकी जिवंत आहे’ हे पुस्तक.

या सोहळ्याला साहित्यिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री.श्रीपाल सबनीस सर यांनी पुस्तक प्रकाशनासाठी एवढी गर्दी क्वचितच पाहिल्याचे सांगत कैलास भाऊंच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. ‘एक भाकर तीन चुली’चे सुप्रसिद्ध लेखक श्री.देवा झिंजाड यांनी सामाजिक कार्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी योगदान द्यावे,अशा शुभेच्छा दिल्या.कीर्तनकार चेतनानंद महाराज पुणेकर यांनी तर कैलास भाऊंच्या सामाजिक कार्यासाठी आपल्या मृत्युपत्रात तरतूद करून ठेवली असल्याचे सांगितले.पद्मश्री गिरीश प्रभुणे सर, सुधाताई कोठारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री.रवी बोडके सर यांनी तर त्यांच्या गोड स्वभावाला साजेसा असा भला मोठा पेढ्यांचा हार आणून अनोख्या पद्धतीने सत्कार केला.

विशेष म्हणजे, हा दिवस कैलास भाऊंच्या पुस्तकाचा आणि त्यांच्या सन्मानाचा होता; पण त्यांनी स्वतःचा सन्मान बाजूला ठेवून आजवर सामाजिक कार्यात साथ देणाऱ्या अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव केला. ज्यांनी दिलं, त्यांना परत देण्याची हीच तर खरी माणुसकी!

आपला भाऊ ब्लड कॅन्सरने गमावल्यानंतर संपूर्ण राजगुरुनगर शहराने केलेल्या मदतीची जाणीव मनात ठेवून आपलं उर्वरित आयुष्य समाजासाठी देण्याचा संकल्प कैलास भाऊंनी केला. म्हणूनच आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे मित्र, बॉर्डरलेस पँथर ग्रुपचे सदस्य, सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते या सोहळ्यासाठी आले होते.

म्हणतात ना, ‘पेरलं ते उगवतं!’ काल राजगुरुनगरमध्ये ते अक्षरशः दिसून आलं. वर्षानुवर्षे कैलास भाऊंनी माणुसकीची बीजं पेरली आणि काल ती प्रेम, आदर, आपुलकी आणि हजारो माणसांच्या उपस्थितीत उगवून आली.

या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेट न झालेल्या जवळच्या बॉर्डरलेस पँथर परिवारातील अनेकांची अनपेक्षित भेट झाली, त्यामुळे माझा आनंद आणखी द्विगुणित झाला. दिवसाची सुरुवात प्रभाकरदादा पवार यांनी प्रेमाने दिलेल्या उकडीच्या मोदकांनी गोड केली होती आणि दिवसाचा शेवटही तितकाच गोड अनुभव घेऊन झाला.

आता कैलास भाऊंनी राजगुरुनगरमध्ये लवकरच वृद्धाश्रम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. अनेक मान्यवरांनी त्यासाठी मदतीचे आश्वासनही दिले.एका रिक्षाचालकाने आपल्या प्रामाणिकपणाने,संवेदनशीलतेने आणि माणुसकीने समाजाला काय देता येतं,याचा सुंदर आदर्श घालून दिला आहे.

कैलास भाऊ, तुमचं कार्य असंच वाढत राहो, तुमच्या लेखणीतून आणखी माणुसकी जन्माला येवो आणि तुमच्या सेवेमुळे अनेक निराधारांना आधार मिळो. ‘माणुसकी जिवंत आहे’ हे केवळ पुस्तकाचं नाव न राहता, तुमच्या आयुष्याची ओळख बनत राहो. तुमच्या सामाजिक आणि साहित्यिक वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

✍🏻 #कल्पनादांगट
#माणुसकी_जिवंत_आहे #राम_कृष्ण_हरी 🙏🏻 #पेरलंतेउगवतं #माणुसकी #समाजसेवा #मराठीसाहित्य

21/08/2026

#माणुसकी_जिवंत_आहे....!!

 ादेव 🔱🕉️ नमः शिवाय 🚩
03/08/2026

ादेव 🔱
🕉️ नमः शिवाय 🚩

 #जे_अटळ_आहे_तेच_सर्वात_मोठं_सत्य....!✍🏻कधी शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का?"आज जर  आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस...
01/08/2026

#जे_अटळ_आहे_तेच_सर्वात_मोठं_सत्य....!
✍🏻
कधी शांत बसून स्वतःला एक प्रश्न विचारलाय का?

"आज जर आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता… तर ...
तर मी आज ज्या गोष्टींसाठी रागावतोय,धावतोय,भांडतोय,त्या मला खरंच इतक्या महत्त्वाच्या वाटल्या असत्या का?"🤔

उत्तर बहुतेकांच्या मनात एकच येईल – "नाही!"

कारण एक सत्य आपण कितीही नाकारलं,विसरलो किंवा टाळलं तरी ते कधीच बदलत नाही… #मृत्यू
जन्म हा एक आनंद आहे…
जगणं हे एक नाट्य आहे…
आणि मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे…
बाकी सगळी मोहमाया आहे....🫠

माणूस जन्माला येतो तेव्हा त्याच्या मुठी बंद असतात.जणू संपूर्ण जग जिंकण्याचं स्वप्न घेऊन तो येतो.पण जेव्हा तो या जगाचा निरोप घेतो,तेव्हा मात्र त्याचे दोन्ही हात उघडे असतात... तेव्हा मात्र जणू तो शांतपणे सांगत असतो की…
"मी काहीच घेऊन जात नाहीये…"

मग आयुष्यभर एवढा अहंकार कशाचा?
इतकी स्पर्धा कशासाठी?
इतका मत्सर,इतका द्वेष, इतकी असूया… कोणासाठी?
आपण घरं बांधतो,पण नाती मोडतो.
पैसा कमावतो,पण माणसं गमावतो.
मोठे होण्याच्या नादात मनाने लहान होत जातो.
आणि एक दिवस अचानक लक्षात येतं…
ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर धावलो, त्यांच्यासोबत बसून दोन क्षणही जगलो नाही...

जीवन खरं तर रंगमंचासारखं आहे.
प्रत्येकाला एक भूमिका दिलेली आहे.कोणाला श्रीमंतीची,कोणाला गरिबीची… कोणाला यशाची,कोणाला संघर्षाची… कोणाला टाळ्यांची,तर कोणाला अश्रूंची...
पण एक गोष्ट मात्र प्रत्येकासाठी सारखीच आहे…
पडदा एक दिवस प्रत्येकासाठी पडणारच आहे.
म्हणून आपल्या भूमिकेचा गर्व करू नका. 🙏🏻

कारण नाटक संपलं की राजा आणि भिकारी दोघेही एकाच दारातून बाहेर पडतात.🤞🏻
आज आपण ज्या गोष्टींसाठी झगडतोय,त्या शंभर वर्षांनंतर कोणालाही आठवणार नाहीत.
पण आपण कोणाच्या डोळ्यातले अश्रू पुसले…
कोणाला संकटात आधार दिला…
कोणाच्या चेहऱ्यावर हसू आणलं…
ही माणुसकी मात्र कायम जिवंत राहते.
आयुष्याचं सौंदर्य मोठ्या बंगल्यात नसतं…
ते आपल्या घरातल्या प्रेमात असतं.
आयुष्याचं यश महागड्या गाडीत नसतं…
ते आपल्या िलांच्या चेहऱ्यावरच्या समाधानात असतं.
आयुष्याची श्रीमंती बँकेच्या खात्यात नसते…
तर ती आपल्या माणसांच्या विश्वासात असते.

मृत्यूची भीती बाळगू नका…
मृत्यूची जाणीव ठेवा. 🙏🏻
कारण मृत्यूची जाणीवच माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते.👍🏻
आजचा दिवस शेवटचा असू शकतो,या भावनेने जगणारा माणूस कधीही अहंकारी होत नाही.😊
तो प्रत्येक क्षणाचा आदर करतो.
प्रत्येक नातं जपतो.
प्रत्येक माणसात देव शोधतो.
आणि प्रत्येक दिवसाबद्दल कृतज्ञ राहतो..

शेवटी…
या जगात कोणी कायमचं राहत नाही.
आपण सगळे प्रवासी आहोत.
फरक फक्त एवढाच असतो की…
काही लोक संपत्ती मागे ठेवून जातात,
तर काही लोक आठवणी मागे ठेवून जातात.
संपत्तीची किंमत काळानुसार कमी होते…
पण चांगल्या माणुसकीची किंमत काळही कमी करू शकत नाही.

म्हणूनच…
असं जगा की तुमच्या जाण्याने लोकांना तुमची मालमत्ता नव्हे,तर तुमची माणुसकी आठवली पाहिजे...
असं बोला की तुमचे शब्द कोणाच्या आयुष्याला आधार देतील.
असं प्रेम करा की तुमच्या आठवणी काळालाही पुसता येणार नाहीत.

कारण…
जन्म हा आपल्या हातात नसतो…
मृत्यूही आपल्या हातात नसतो…
पण त्या दोघांच्या मधला प्रत्येक क्षण अर्थपूर्ण,प्रेमळ आणि माणुसकीने भरलेला जगणं… हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतं.👍🏻

#जीवन #माणुसकी #प्रेरणा #आयुष्य #सकारात्मकविचार #नाती #कर्म #विचार

 #कुरुक्षेत्र_ते_मनक्षेत्र :  #गीतेचा_प्रवास..✍🏻आपण आयुष्यात अनेक गोष्टी शिकतो..गाडी चालवायला शिकतो, मोबाईल वापरायला शिक...
31/07/2026

#कुरुक्षेत्र_ते_मनक्षेत्र : #गीतेचा_प्रवास..
✍🏻
आपण आयुष्यात अनेक गोष्टी शिकतो..
गाडी चालवायला शिकतो, मोबाईल वापरायला शिकतो, पैसे कमवायला शिकतो, इतरांशी कसं बोलायचं तेही शिकतो. पण एक गोष्ट मात्र बहुतेक वेळा शिकत नाही ती म्हणजेच स्वतःचं मन समजून घ्यायला.

आयुष्यात एखादा प्रसंग आला की आपण गोंधळतो मग निर्णय चुकतात, नाती तुटतात,राग वाढतो,भीती मन व्यापते आणि मग आपण स्वतःलाच प्रश्न विचारतो की,— "हे माझ्याच बाबतीत का घडलं?"

याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी एक संवाद घडला होता.तो संवाद युद्ध जिंकण्यासाठी नव्हता; तर तो मन जिंकण्यासाठी होता.तो फक्त अर्जुनासाठी नव्हता; तर तो प्रत्येक अशा माणसासाठी होता,जो कधी ना कधी आयुष्यात स्वतःसमोरच हरलेला असा उभा राहतो.

म्हणूनच भगवद्गीता वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की,ती फक्त वाचायची नाही, तर ती समजूनपण घ्यायची आहे. कारण गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही; तर ती जीवनाला नव्याने पाहण्याची दृष्टी आहे.

गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही.तर ती मानवी मनाचा आरसा आहे. ती एका योद्ध्याच्या गोंधळाची, एका मित्राच्या समजावणीची, एका गुरूच्या मार्गदर्शनाची आणि एका माणसाला स्वतःशीच लढण्याची शिकवण देणारी जीवनसंहिता आहे.

गीता वाचताना आपण अनेकदा एक चूक करतो.आपण प्रत्येक श्लोक अक्षरशः आजच्या आयुष्यावर लागू करण्याचा प्रयत्न करतो.. पण गीतेचं खरं सामर्थ्य शब्दांत नाही,तर त्या शब्दांमागच्या तत्त्वज्ञानात आहे.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितलं,ते एका विशिष्ट काळात,विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट जबाबदारीसमोर उभ्या असलेल्या योद्ध्याला सांगितलं होतं. त्या काळची समाजव्यवस्था,राज्यव्यवस्था,नाती,कर्तव्याची व्याख्या आणि जीवनपद्धती आजच्या काळापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. म्हणून प्रत्येक प्रसंग जसाच्या तसा स्वीकारण्यापेक्षा,त्यामागचा विचार समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

त्या काळी युद्ध कुरुक्षेत्रावर होतं; आज मात्र युद्ध आपल्या मनात सुरू असतं...
तेव्हा हातात धनुष्य होतं; आज आपल्या हातात निर्णयांची जबाबदारी आहे... तेव्हा बाण सोडले जात होते; आज शब्द सोडले जातात...
तेव्हा शत्रू समोर उभा दिसायचा; आज तो लोभ,मत्सर,अहंकार,भीती आणि असुरक्षिततेच्या रूपाने आपल्या आतच लपलेला असतो.

आज प्रत्येकाच्याच आयुष्यात एक कुरुक्षेत्र आहे.कार्यालयातील अन्याय असो की,घरातील मतभेद असो, नात्यांतील अहंकार, अपयशाची वेदना, यशाचा गर्व, स्पर्धेचा ताण, मनातील अस्वस्थता – हेच आजचे आपले #कौरव आहेत.
तर विवेक, संयम, कर्तव्य, सत्य, करुणा आणि धैर्य – हेच आजचे #पांडव आहेत.

म्हणून गीता वाचताना प्रश्न असा नसावा की "कृष्णाने तेव्हा काय सांगितलं?" तर प्रश्न असा असावा की...
"आज मी ज्या परिस्थितीत आहे,त्यात कृष्णाचा हा विचार मला काय शिकवतो?"
गीतेचा प्रत्येक श्लोक जीवनाला दिशा देतो;पण ती दिशा मिळण्यासाठी शब्दांपेक्षा विचार समजून घ्यावे लागतात.कारण शाश्वत असतात ती फक्त तत्त्वे; प्रसंग नव्हे. काळ बदलतो,समाज बदलतो,माणसं बदलतात,तंत्रज्ञान बदलतं,पण सत्य,प्रामाणिकपणा,कर्तव्य,संयम आणि आत्मविश्वास यांची किंमत कधीच बदलत नाही.
आज जगाला गीतेचे पाठांतर करणाऱ्यांपेक्षा गीतेचे विचार आचरणात आणणाऱ्या माणसांची अधिक गरज आहे.कारण श्लोक ओठांवर असणं ही विद्वत्तेची गोष्ट आहे; पण तेच तत्त्व आचरणात असणं ही खऱ्या जीवनाची साधना आहे.

गीता आपल्याला इतरांवर विजय मिळवायला शिकवत नाही; तर ती स्वतःवर विजय मिळवायला शिकवते.ती परिस्थिती बदलण्यापेक्षा आपली दृष्टी बदलते.ती संकट टाळण्याचं नाही, तर संकटातही स्थिर राहण्याचं सामर्थ्य देते
म्हणून गीता पुन्हा पुन्हा वाचा.प्रत्येक वेळी नव्या नजरेने वाचा.प्रत्येक श्लोकानंतर स्वतःला विचारा की "हा विचार माझ्या जीवनात मी कसा उतरवू?" कारण गीता पुस्तकात बंद ठेवण्यासाठी नाही,तर जीवनात उघडण्यासाठी आहे.

शब्द पाठ करणं सोपं असतं; पण विचार जगणं मात्र कठीण असतं आणि म्हणूनच गीता ही शब्द पाठ करणाऱ्यांसाठी नाही,तर विचार जगणाऱ्यांसाठी आहे.कदाचित म्हणूनच हजारो वर्षांनंतरही श्रीकृष्णांचे शब्द जुने वाटत नाहीत.कारण ते एका काळापुरते नव्हते; तर ते प्रत्येक काळात,प्रत्येक माणसाला,प्रत्येक संघर्षात नव्याने मार्ग दाखवण्यासाठी आहेत. 🙏🏻

✨ कल्पना दांगट
#भगवद्गीता #गीता #श्रीकृष्ण #आध्यात्म #विचार #सकारात्मकविचार #प्रेरणा #आत्मचिंतन

30/07/2026

 #गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐प्रीतिची ऊबआई देते...धैर्याचा कणावडील देतात...आईचे बोटसुटल्यानंतरभेदरलेल्य...
29/07/2026

#गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐

प्रीतिची ऊब
आई देते...
धैर्याचा कणा
वडील देतात...

आईचे बोट
सुटल्यानंतर
भेदरलेल्या मनाला
आधार देतो
तो गुरू...

गुरू म्हणजे
विश्वासाचा दीप,
गुरू म्हणजे
आयुष्याचा श्वास...

यांच्या चरणी
नतमस्तक होताच,
ज्ञान,संस्कार आणि
जीवनाचा खरा अर्थ सापडतो...


✍🏻 कल्पना दांगट

 #सुख_दुःख_आणि_अभावाचं_गणित.....✍🏻भगवंताने या सृष्टीची रचना इतकी विलक्षण केली आहे की,प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू आणि प...
27/07/2026

#सुख_दुःख_आणि_अभावाचं_गणित.....
✍🏻
भगवंताने या सृष्टीची रचना इतकी विलक्षण केली आहे की,प्रत्येक सजीव, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक माणूस काही ना काही गुणांनी समृद्ध आहे; पण त्याच वेळी प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरताही आहे.ही कमतरता म्हणजे शिक्षा नसते,तर ती जीवनाला अर्थ देणारी,माणुसकी जपणारी आणि अहंकाराला मर्यादा घालणारी ईश्वराची अद्भुत योजना असते.

खरंतर ऊसाला गोडवा दिला,पण त्याला फळ दिलं नाही...कारण त्याचं अस्तित्वच दुसऱ्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करण्यासाठी आहे.तसंच सोन्याला तेजस्वी चमक दिली,पण त्याला सुगंध दिला नाही...चंदनाला मोहक सुगंध दिला,पण त्याला रंगीबेरंगी फुलांचं सौंदर्य दिलं नाही...समुद्राला अथांग विशालता दिली,पण त्याचं पाणी खारट ठेवलं...नदीला गोड पाणी दिलं,पण तिला सतत वाहत राहण्याचं भाग्य दिलं... म्हणजेच स्थिरता दिली नाही..कमळाला पावित्र्य दिलं,पण ते चिखलात फुलवलं; जणू ते सांगत राहिलं की,परिस्थिती कितीही कठीण असली तरी निर्मळपणा जपता येतो.
सूर्याला स्वतःचा प्रकाश दिला,पण शीतलता दिली नाही.चंद्राला शीतलता दिली,पण स्वतःचा प्रकाश दिला नाही. दोघेही अपूर्ण आहेत,पण एकमेकांमुळेच विश्व सुंदर दिसतं...
या सृष्टीत कोणीच एकट्याने संपूर्ण नाही; प्रत्येकाचं अस्तित्व दुसऱ्याशी जोडलेलं आहे.

माणसाच्याही बाबतीत हेच सत्य आहे.कुणाकडे अफाट संपत्ती असते,पण मनःशांती नसते...कुणाकडे ज्ञानाचा अथांग सागर असतो,पण आर्थिक साधनांची कमतरता असते...कुणाकडे सौंदर्य असतं,पण आरोग्य नसतं...कुणाकडे पद,प्रतिष्ठा आणि सत्ता असते,पण जवळची माणसं नसतात.. कुणाकडे प्रेम करणारी माणसं असतात,पण आयुष्यभरासाठी त्यांना सोबत देणारं नशीब नसतं...

इतिहासही आपल्याला हेच शिकवतो..अनेक विद्वानांनी आयुष्यभर ज्ञानाची सेवा केली,पण वैभवाचा स्पर्श त्यांना लाभला नाही..अनेक पराक्रमी राजांनी जग जिंकलं,पण काळावर विजय मिळवू शकले नाहीत..कित्येक संतांनी जगाला अध्यात्माची संपत्ती दिली,पण स्वतः साधेपणात आयुष्य घालवलं.. कारण ईश्वराला माहीत आहे की,प्रत्येक गोष्ट एका व्यक्तीलाच दिली तर अहंकार निर्माण होईल; आणि अहंकार माणसाला माणसापासून दूर नेतो.

अभाव ही केवळ उणीव नसते; तर तो जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक असतो. भूक माणसाला अन्नाचं महत्त्व शिकवते.तहान पाण्याची किंमत समजावते. दुःख आनंदाची ओळख करून देतं.अपयश यशासाठी झगडायला शिकवतं. विरह प्रेमाची खोली दाखवतो आणि अश्रूच माणसाच्या मनात करुणा जिवंत ठेवतात.

जर आयुष्यात सर्व काही सहज मिळालं असतं,तर प्रयत्नांची किंमत उरली नसती.जर प्रत्येक इच्छा क्षणात पूर्ण झाली असती,तर स्वप्नं पाहण्याचं सौंदर्य हरवलं असतं.जर प्रत्येक माणूस परिपूर्ण असता,तर एकमेकांची गरजच भासली नसती.म्हणूनच अपूर्णता आपल्याला जोडते,नम्र बनवते आणि कृतज्ञ राहायला शिकवते.

आज आपण अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी करतो.दुसऱ्याकडे काय आहे, हे पाहताना आपल्याकडे काय आहे, हेच विसरून जातो.पण प्रत्येकाच्या आयुष्याचं गणित वेगळं आहे.ज्याच्याकडे तुम्ही पाहून हेवा करता,तोही कदाचित तुमच्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीसाठी आतून तळमळत असेल. म्हणून आयुष्याची तुलना कधीच करू नका; कारण प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी परीक्षा आणि वेगळं वरदान आलेलं असतं.

ईश्वराने आपल्याला जे दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं आणि जे नाही त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत राहणं,हाच खरा जीवनाचा मार्ग आहे. अपूर्णता स्वीकारली की मन शांत होतं.अभाव स्वीकारला की माणूस नम्र होतो आणि नम्रतेतूनच खरी माणुसकी जन्माला येते.

म्हणून या जगात कोणीही परिपूर्ण नाही.प्रत्येकाच्या हातात काहीतरी आहे आणि प्रत्येकाच्या ओंजळीत काहीतरी रिकामं आहे.त्या रिकाम्या ओंजळीमुळेच प्रार्थना जन्म घेते,कृतज्ञता फुलते आणि माणूस "माणूस" म्हणून जिवंत राहतो.कारण अपूर्णतेतच पूर्णत्व दडलं आहे आणि अभावातच माणुसकीचा खरा सुवास वसलेला असतो... 🙏🏻

#अपूर्णता #अभाव #जीवन #प्रेरणा #मराठीलेखन #विचार #माणुसकी #सकारात्मकता #राम_कृष्ण_हरी 🙏🏻 ✨

Address

Pune University

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpana Dangat. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share