23/09/2026
तुम्ही कधी वारी केलीय का?
किंवा कधी टीव्हीवर, रस्त्यावर चालणाऱ्या वारकऱ्यांचे ते चेहरे पाहून मनात विचार आलाय का, "का करायची एवढी वारी? पाय दुखेपर्यंत..पायाला फोड येईपर्यंत, शरीराचे हाल करून काय मिळतं? विठूरायाच्या एका दर्शनासाठी एवढा अट्टहास का?"
हेचं सगळे प्रश्न पडलेले असतात नाटकातील डीकेला म्हणजे ज्ञानेश्वर कदमला. वारी म्हणजे अंधश्रद्धा असं स्पष्ट मत असणारा, नाईलाजाने आणि काहीसा वैतागून वारीच्या वाटेवर निघालेला 'डीके' ... आणि त्याच्यासोबत हळूहळू सुरू होणारा आपला स्वतःचा अंतर्यात्रांचा प्रवास!
डीकेचे हे प्रश्न कदाचित आपल्याला पडलेले नसतील, पण त्याच्या या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे तरी कुठे असतात?
मग वारीच्या धुरळ्यात चालत राहताना त्याला आणि आपल्याला ही भेटत जातात वेगवेगळे रंग...सुहृदयी पोलीस, केस पिकलेला वृद्ध, संवेदनशील गर्भवती डॉक्टर, विठ्ठलाच्या प्रेमापोटी जपानहून आलेला एक परदेशी पाहुणा... आणि वाटेतच विठ्ठलरूपात
विलीन होणारी ती एकटी म्हातारी. काय बोलतात हे सगळे डीकेबरोबर?
आस्तिक आणि नास्तिकतेच्या सीमेवरून सुरू झालेली ही कथा हळूहळू आपल्या मनाच्या गाभाऱ्यात शिरते. इतकी हळुवार आणि तितकीच खोssल मनाला भिडते , की आपण प्रेक्षक राहतच नाही... आपण स्वतःचं वारकरी होऊन त्या दिंडीत चालू लागतो.
पुणे, सासवड, नातेपुते ओलांडत जेव्हा नाटकातील वारी वाखरीला पोहोचते आणि ज्ञानोबा-तुकोबांच्या दिंड्या एकत्र येतात आणि ती ऐतिहासिक गळाभेट होते... तेव्हा आपल्याही डोळ्यांतून नकळत अश्रू वाहू लागतात.
पुढे काय होतं? डीके शेवटपर्यंत ही वारी पूर्ण करतो का? विठ्ठलाचं दर्शन त्याला घडतं का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाटकाच्या प्रत्येक प्रसंगातून उलगडत जातात...
मनोज डाळिंबकर यांनी ज्या तन्मयतेने विविध पात्रं जिवंत केली आहेत. त्यांची बदलती देहबोली, भाषेचे विविध बाज, वय... एकाच व्यक्तीने हे सगळं साध्य केलंय यावर आपला विश्वासच बसत नाही! प्रणव सपकाळे, अंकिता शिवतरे आणि सर्वच कलाकारांचे अभिनय ही अतिशय सुंदर आहेत.
नाटकात पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरची गाणी, भूपाळी या सर्व लोककलांच्या पारंपरिक रूपांपासून ते आधुनिक रॅप साँगपर्यंतचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.
गीतं लिहिली आहेत मुराद तांबोळी यांनी आणि अतिशय सुमधुर असं संगीत दिलं आहे निरंजन पेडगावकर यांचं..!
भक्ती, कला आणि संगीताचा हा सोहळा पाहताना कान, मन आणि अंतरात्मा सगळंच तृप्त होऊन जातं. नाटक पाहताना कित्येक वेळा अंगावर काटा येतो, मन गहिवरून येतं. पाहणारा प्रत्येक जण प्रत्येक गाण्याला भान हरपून ताल धरतो..हरवलेला अंतर्नाद इथे सापडतो..!
डीकेच्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि तुमचाही हरवलेला अंतर्नाद शोधण्यासाठी 'अंतर्नाद' हे नाटक रंगमंचावर नक्की पहा!
निर्माते: भाऊसाहेब भोईर
संकल्पना व दिग्दर्शन: मनोज डाळिंबकर
सहाय्य्क दिग्दर्शन: आकाश थिटे
लेखन: विनोद रत्ना
संगीत: निरंजन पेडगावकर
गीते: मुराद तांबोळी
#ऐकलंयका
#वारी