30/07/2026
कॅन्सर झालेल्या वडिलांना आपण आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत, याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या अवघ्या ४-५ वर्षांच्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं...
“आईची काळजी घे... बहिणींची काळजी घे... माझी आठवण आली तर ‘तुझे पप्पा कुठे आहेत?’ असं विचारू नकोस... मी कायम तुझ्या सोबत असेन...”
हा व्हिडिओ पाहताना अक्षरशः अंगावर काटा येतो आणि डोळे डबडबून येतात.कारण त्या वडिलांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या मनातली घालमेल जास्त जाणवते.
अलीकडे आयुष्य किती क्षणभंगुर झालंय ना...
आयुष्यात खूप लांबची स्वप्नं पाहणं तर सोडाच, उद्याची स्वप्नं पाहावीत की नाही, असाही प्रश्न कधी कधी पडतो.
खरं तर म्हणतात, “कोणी गेल्याने कोणाचं आयुष्य थांबत नाही...”
पण जाणारा माणूस जर भावनिक असेल, आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा असेल, तर जाताना त्याच्या मनाची काय अवस्था होत असेल?आपल्यामागे राहणाऱ्या माणसांचं काय होईल, याची किती घालमेल त्याच्या मनात सुरू असेल?
कधी कधी मनात प्रश्न येतो...
माणसाला अशी जिंदगी का मिळते?
किमान ७०-८० वर्षांचं आयुष्य तरी माणसाला आपल्या माणसांसोबत जगता यायला नको का?
असं काही पाहिलं की आपल्या स्वतःच्या आयुष्याबद्दलही एक अनामिक भीती निर्माण होते.
एका बाजूला आपली स्वतःची स्वप्नं असतात...
दुसऱ्या बाजूला आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्याला मोठं करणारे आई-वडील असतात. त्यांच्या काही इच्छा असतात, काही स्वप्नं असतात. दिवसेंदिवस त्यांचं वय वाढत असतं आणि मनात एकच इच्छा असते.त्यांच्या शेवटच्या काळात तरी त्यांना सुखाचं आयुष्य देता यावं.
आणि दुसऱ्या बाजूला पत्नी असते, मुलं असतात...
त्यांचीही काही स्वप्नं असतात, अपेक्षा असतात.
आणि या सगळ्यांच्या मध्ये आपली स्वतःचीही काही स्वप्नं असतात.
प्रत्येकाचं आयुष्य सुखी करण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या मनाची जी घालमेल होते ना... ती शब्दांत सांगणं कठीण आहे.
आणि मग असा एखादा व्हिडिओ समोर येतो...
क्षणभर आपण स्वतःला त्या जागी ठेवतो आणि मनात एक भयंकर विचार येतो
“उद्या माझ्यासोबत असं काही घडलं तर...
माझ्यानंतर माझ्या आई-वडिलांचं काय होईल?
माझ्या पत्नीचं काय होईल?
माझ्या मुलांचं काय होईल?”
हा विचारच मनाला आतून हादरवून टाकतो.कदाचित म्हणूनच अशा प्रसंगांकडे पाहताना आपण मृत्यूला घाबरत नाही...
आपल्यामागे राहणाऱ्या आपल्या माणसांच्या आयुष्याला घाबरतो.शेवटी पैसा, यश, प्रसिद्धी, स्वप्नं... सगळं काही महत्त्वाचं आहे.
पण या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट एकचआपली माणसं... आणि त्यांच्यासोबत मिळालेला वेळ.म्हणून उद्याची चिंता करत बसण्यापेक्षा, आज आपल्या माणसांसाठी थोडं जगूया...
आई-वडिलांशी दोन शब्द प्रेमाने बोलूया...
पत्नीला थोडं जवळ घेऊया...
मुलांसोबत थोडा वेळ खेळूया...
कारण आयुष्य किती आहे हे आपल्या हातात नाही...
पण मिळालेल्या आयुष्यात आपण आपल्या माणसांना किती प्रेम दिलं, हे मात्र आपल्या हातात आहे. ❤️