15/09/2024
#प्रवासी
टाळ्यांचा कडकडाट झाला आणि आपले भाषण संपल्याची जाणीव होऊन ऊमा भानावर आली. आपण काय बोललो हे तिला आठवतच नव्हते. मन भरून आले होते. आज तिचा निरोप समारंभ होता. सेवापुर्ती सोहळा! ती आज सकाळपासूनच अस्वस्थ होती एक अनामिक हुरहुर मनात दाटून आलेली होती उद्यापासून ही शाळा, ही धावपळ, आपल्या लाडक्या विद्यार्थिनी, वह्या-पुस्तके.... काहीच अवतीभवती नसणार. गेले पस्तीस वर्ष सवयीच जग आता अंतरणार.उद्यापासून सगळंच निवांत... ना कसली घाई.... ना कोणी सोबत.... सगळंच शांत असेल, असे काहीसे काहूर दाटून येत होते मनात. नोकरीतील कित्येक प्रसंग आठवत होते.राहून राहून डोळे भरुन येत होते. आयुष्यात छोट्या-मोठ्या प्रसंगात धावून आलेला, आजवरच्या प्रत्येक शाळेतील स्टाफ आठवत होता. सहलींमध्ये मुलींसोबत मैत्रिणीं सोबत केलेली धमाल आठवत होती. कामात लक्ष लागत नव्हतं.कसबसं घरंच आवरून उमा शाळेत पोहोचली. मुलींचा गराडा पडला तिच्याभोवती. प्रत्येक मुलीला तिच्याशी बोलायचं होतं, कित्येकींनी तिच्यासाठी छोट्या-छोट्या भेटवस्तू आणल्या होत्या. मुलींचे डोळे पण भरून येत होते. प्रत्येक जण येऊन आशीर्वाद घेत होती. एकंदर वातावरण खूपच भारावलेले होते.
उमा स्टाफ रूम मध्ये थोडा वेळ बसली. थोडंसं तिच्याशी बोलून प्रत्येकजण स्वतःच्या कामाला गेली. कारण उमाचा सेंड ऑफ चा कार्यक्रम स्टाफने थोडा मोठाच करायचा ठरवला होता. लवकरच चीफ गेस्ट येणार होते. कुणी मोठे उद्योगपती चीफ गेस्ट म्हणून येणार एवढे उमाला माहिती होते. बहुतेक ते शाळेला देणगी सुद्धा देतील अशी आशा होती, त्यामुळे शाळेच्या प्रत्येक उपक्रमाकडे उपक्रमाबद्दल जी ती तयारीने, जबाबदारीने वागत होती. उमा मुख्याध्यापिका मॅडमला भेटायला गेली. त्यांनी आदरपूर्वक तिला बसवून घेतले.तिच्याशी अगदीच भावनिक होऊन थोड्याशा गप्पा मारल्या. "तुमची कमी भासेल", असे मनापासून म्हणाल्या. तेवढ्यात चीफ गेस्ट आल्याचा निरोप आला आणि मुख्याध्यापिका लगबगीने उठून गेल्या. उमा पण ऑफिस मधून उठून लायब्ररी कडे गेली.सगळी पुस्तकं डोळेभरुन बघितली. थोडावेळ तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसली, तोच शिपाई मावशी तिला शोधत आल्या अन हॉलमध्ये बोलावल्याचे सांगितले.
उमा हॉलमध्ये गेली मुलींनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत केले. उमा स्थानापन्न झाली, सर्वांना नमस्कार करून. नमस्कार करताना तिने पाहिले चीफ गेस्ट म्हणून अनिल होता. होय अनिलची होता तो! अंगाने किंचित स्थूल झाला होता आणि केसात मधून मधून रुपेरी छटा, याव्यतिरिक्त डोळ्यांवर सोनेरी काड्यांचा चष्मा, एवढाच फक्त बदल झाला होता त्याच्यात.बाकी तसाच होता, उंच, रुबाबदार आणि हसरा! उमाला काहीच समजेना, हा इथे कसा? चीफ गेस्ट कसा? ती चक्रावली. त्याने मात्र हसून उमाला अभिवादन केले. कार्यक्रम पुढे सरकू लागला. मुलींनी भाषणातून उमा मॅडम ची तारीफ केली. त्यांचे गुण सांगितले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्या भाऊक होऊन बोलल्या. स्टाफ मधून मोजकी दोन भाषणे झाली. त्यातून उमाची कर्तव्यनिष्ठा, कामाप्रती असणारी तळमळ, शाळेच्या प्रगतीसाठी तिने घेतलेली मेहनत, मुलींशी तिचे असणारे भावनिक नाते.... याबद्दल खूप छान शब्दात त्यांनी सांगितले. त्यानंतर उमाचा विद्यार्थिनींच्या वतीने,स्टाफ च्या वतीने व संस्थेच्या वतीने सत्कार होऊन तिला भेटवस्तू दिल्या गेल्या. सत्काराला उत्तर देताना उमा जास्त बोलूच शकली नाही. जे बोलली ते पण तिला समजलेच नाही. अनिल ला पाहून चित्त थाऱ्यावरच नव्हते तिचे. मुख्याध्यापिका मॅडमने शाळेच्या वतीने त्याचा सत्कार केला. उद्योगपती अनिल साहेब असा अत्यंत आदरपूर्वक त्याचा उल्लेख केला जात होता....!त्याने सत्काराला उत्तर देताना छान भाषण केले. शाळेसाठी एक लाख रुपयांची देणगी त्यांनी दिली. अल्पोपहारा नंतर निघताना तो सहज उमाला म्हणाला, "मॅडम मी सोडतो तुम्हाला.इफ यु डोन्ट माईंड." नकार द्यायला योग्य दिसले ही नसते आणि तसे काही कारणही नव्हते.
सर्वांना नमस्कार करून उमा त्याच्यासोबत गाडीत बसून निघाली. काय बोलावे हेच तिला सुचत नव्हते. तिने एकदम अनिल कडे पाहिले, त्याने हसून ती नजर पकडत तिला विचारले,"कशी आहेस उमा?"
"मी मजेत आहे, पण तू इथे कसा? उमाने विचारले.
"अगं मी इथेच असतो.तू कधी आलीस या कन्या शाळेत बदलून?" अनिल ने विचारले.
"म्हणजे तू मुंबई सोडलीस?" उमाने उत्तर देण्याऐवजी प्रश्न केला.
"हो त्यानंतर तीनच वर्षांनी. आता इथेच स्थायिक झालोय. बिजनेस मध्ये पण हळूहळू जम बसत गेला. साध्या झेरॉक्स सेंटर पासून सुरुवात केली होती उमा. गावाला कशाची गरज आहे ते शोधत गेलो, त्याप्रमाणे गुंतवणूक करत गेलो, प्रचंड कष्ट केले. आता दोन फॅक्टरीज आहेत. आणि चार दुकानांचा मी मालक आहे.इथे मोठा बंगला आहे. दोनशे लोकांना रोजगार पुरवतो. पंचवीस एकर शेती घेतली आहे. फळबाग केलीय. एक फार्म हाऊस आहे शेतात.मुंबईत एक फ्लॅट आहे.ऑफिस कामानिमित्त कधी गेल्यावर तिथे राहतो. तीन गाड्या आहेत दारात. वैशू सारखी सुविद्य, सुंदर कष्टाळू बायको आहे. कर्तबगार मुलगा आणि सून आहे.चिमुरडी नात आहे. तुझ्याच शाळेत आहे. सहा महिन्यांपूर्वी तिला एकदा सोडवायला आलो होतो, तेव्हा तुला पाहिलं होतं.तुझं नव्हतं लक्ष! थोडक्यात उमा तू सोडून सगळं आहे माझ्याकडं!" अनिल बोलून गेला. उमाने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिले.
एका मोठ्या हॉटेल समोर त्याने गाडी थांबवली. "चल जरा कॉफी घेऊ या", अनिल म्हणाला. ती दोघे उतरली. हॉटेलचा मॅनेजर अनिलला पाहून धावत आला.वेलकम केले. त्याचा हसून स्वीकार करत दोघे कोपर्यातील एका टेबलाशी जाऊन बसले. अनिल ने उमा कडे पाहिले.बऱ्यापैकी स्थूल झाली होती ती. केस सुंदर कापलेले होते, पण मेंदीने रंगवल्या मुळे काळ्या केसात काही लाल बटा दिसत होत्या.सुंदर रिमलेस चष्मा होता. रुंद काठाची, फिक्या गुलाबी रंगाची साडी, मोजके दागिने, नाजूक घड्याळ..... तिच्या उच्च अभिरुचीचे दर्शन घडवत होते.
"उमा, तू कशी आहेस? कसं चाललंय तुझं?" अत्यंत हळवेपणाने अनिल ने विचारले.
"छान आहे सगळं अनिल. मिस्टर एल.आय.सी. मध्ये वरच्या पोस्ट वर होते. नुकतेच ते पण रिटायर झालेत.एक मुलगा एक मुलगी आहे. ती दोघेही डॉक्टर आहेत. सून आणि जावई पण डॉक्टर आहेत. चौघांनी मिळून पुण्यात एक हॉस्पिटल सुरु केलेय. छान जमा बसलाय त्यांचा आता. एकाच बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स घेतलेत राहायला. मिस्टर पण पुण्यातच असतात.गेली चार वर्षे मी इथे या कन्या शाळेत बदलून आले होते. पण थोड्या दिवसांसाठी संसार कशाला उचला,मांडा? म्हणून मी एकटीच इथे दोन रूम भाड्याने घेऊन रहात होते. शनिवार-रविवारी ते यायचे इथे, किंवा मी जायची पुण्यात.आता दोन दिवसांनी रूम सोडून जाणार आहे कायमची पुण्यात." उमा ने सांगितले.
"पण तू शिक्षिका कशी काय झालीस?" अनिल ने विचारले.
"तुझी आठवण विसरण्यासाठी शिकत गेले आणि भरपूर मार्क मिळवत गेले. या संस्थेची जाहिरात पेपर मध्ये पाहिली, अर्ज केला अन लगेच सिलेक्ट झाले.पण तू मुंबई का सोडलीस?" उमा म्हणाली.
"अगं मामाच्या वैशालीशी लग्न झालं. पण तुझी आठवण खूप छळायची. इथून जवळच माझं मूळ गाव आहे.गावी थोडी शेती होती वडिलांची. मामाला सांगून वैशू आणि नोकरीतून वाचवलेले थोडे पैसे घेऊन इथे आलो. जाम कष्ट केले. वैशू ने पण छान साथ दिली.अन आज इथे आहे."अनिल उत्तरला.
दोघांचीही मने भूतकाळात गेली.
अनिल चे आई वडील तो पाच वर्षांचा असतानाच एका एक्सीडेंट मध्ये गेले.चुलत्यांचा थंड प्रतिसाद पाहून, मामा त्याला आपल्या घरी मुंबईला घेऊन आला. एकुलत्या एक बहिणी ची शेवटची आठवण म्हणून!अन मामाच्या चौकोनी संसाराला नवीन पाचवा कोन तयार झाला. मामी चांगली होती. तिने आपल्या गरिबी च्या संसारात अनिलला मोठ्या मनाने सामावून घेतले. महापालिकेच्या शाळेत शिकताना अनिलला जग समजत गेले. फार लवकर त्याला परिस्थितीची जाणीव झाली. बारावीनंतर रात्रीचे कॉलेज करून तो दिवसा मिळेल त्या नोकर्या करू लागला.महागाई आणि खाणारी तोंडे यांचा मेळ घालताना मेटाकुटीला आलेला मामा अनिलच्या येणाऱ्या पैशांना नाही म्हणूच शकला नाही. दोनच वर्षात अनिल एका कारखान्यात कामगार म्हणून लागला. लवकरच परमनंट ही झाला. अजून ग्रॅज्युएशन मात्र पूर्ण व्हायचे होते.
उमा ही त्याच कारखान्यात नुकतीच लागली होती. अनिल सारखीच कामगार म्हणून. वडिलांची मिल बंद पडल्याने त्यांची नोकरी गेली होती, त्याचा धक्का बसून त्यांच्या मनावर परिणाम झाला होता. ते चालता-फिरता पुतळाच जणू बनले होते. भाऊ छोटा होता.आईने घर चालवण्यासाठी चार घरची धुणी-भांडी, स्वयंपाकाची कामे धरली.अन घरातील कामाची जबाबदारी आपसूकच छोट्या उमाने उचलली. घरकाम करत, छोट्या भावाला सांभाळत, कसबसं शिक्षण घेत उमा बारावी झाली. आणि शिक्षणाची गोडी व आवड सोडून देत आईच्या फाटक्या संसाराच्या आभाळाला सावरायला या कारखान्यात लागली कामगार म्हणून!
बरेचदा अनिल आणि उमा एकाच बसने यायचे जायचे. क्वचित शेअर रिक्षाने सुद्धा. हळू हळू बोलता बोलता कधी मैत्री झाली कळलेही नाही. घरगुती प्रॉब्लेम्स परस्परांना शेअर होऊ लागले. जमेल तशी एकमेकांना मदत केली जाऊ लागली. कधी मनानं दोघेही एकमेकात गुंतून गेले दोघांनाही कळलंच नाही. आता एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नव्हती. गिफ्ट वगैरे देण्याजोगी दोघांची ही परिस्थिती नव्हती. क्वचित कधीतरी उडप्या कडे जाऊन एक डोसा दोघात आणि एक कॉफी दोघात म्हणजे चैन होती. तिची शिक्षणाची आवड लक्षात घेऊन तिला बाहेरून कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी अनिलने तिच्याबरोबर धावपळ केली होती.
असंच एके दिवशी अनिल तिला बळेबळे चौपाटीवर घेऊन गेला.खूप टेन्शनमध्ये होता तो. थोडा वेळ बसल्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला," उमा आपण पळून जाऊन लग्न करूयात".
उमा एकदम दचकलीच. तिने विचारले, " का बरं? काय झालं अचानक? "
"अगं मामा माझ्या मागे लागलाय, आता परमनंट झालास वैशूशी लग्न कर म्हणून! त्याला बहुतेक कळलंय आपल्याबद्दल." अनिल उद्विग्न होऊन म्हणाला.
त्याचा हात हातात घेऊन लांब कुठेतरी खूप वेळ शून्यात बघत बसलेली उमा म्हणाली, "अनिल तू करून टाक वैशू शी लग्न!"
"उमा अगं पण आपलं प्रेम आहे एकमेकांवर मग असं कसं बोलू शकतेस तू?" अनिल चिडून म्हणाला.
"शांतपणे विचार कर अनिल. चुलत्यांनी नाकारली तशी मामाने ही तुझी जबाबदारी नाकारली असती तर? त्याने तसं केलं असतं तर आज तू असा दिसला असतास का? कदाचीत कुठेतरी भीक मागावी लागली असती तुला. आणि मामी ही चांगलं वागली रे तुझ्याशी! त्यांच्या अर्ध्या घासात त्यांनी तुला वाटेकरी केलेय. त्यामुळे निदान तुझ्या डोक्यावर आधाराचे छप्पर तरी राहिलेय. त्या बदल्यात त्यांनी तुझ्याकडे ही अपेक्षा व्यक्त केली तर चुकले कुठे? आणि त्यांना तरी त्यांच्या मुलीची चिंता असेलच ना? परक्या कुणाला तरी मुलगी देण्यापेक्षा, जो आपल्याचकडे लहानाचा मोठा झालाय त्याच्याकडे ती नक्कीच खूप सुरक्षित राहील, असा व्यवहारी विचार त्यांनी केला तर त्यात चूक काय? माझं खरोखर खूप प्रेम आहे रे तुझ्यावर! पण आपण परिस्थितीने बांधलेले आहोत. माझा भाऊ कमवायला लागेपर्यंत मी तुझ्याशी काय कोणाशीच स्वप्नात पण लग्न नाही करू शकत रे! अजून किमान पाच वर्षे तरी मला लग्नाचा साधा विचार सुद्धा नाही करता यायचा. माझी कष्टकरी आई, आजारी वडील,शिकत असलेला भाऊ.....यांचे आयुष्य अंधारात लोटून माझ्या आयुष्याचा दिवा मी कसा पेटवू अनिल? तू कदाचित थांबशीलसुद्धा माझ्यासाठी! पण तू कृतघ्न ठरशील मामा-मामी यांच्या नजरेत त्याचे काय? आणि लग्न करता आलं नाही एकमेकांशी म्हणून आपलं प्रेम कमकुवत आहे,असं मुळीच नाही. कर्तव्य करण्याचं भान देतं तेच खरं प्रेम अनिल!" बोलता-बोलता उमा हमसून हमसून रडू लागली.
बराच वेळ विचार करता करता,तिला थोपटून शांत करीत अनिल म्हणाला, "किती मोठ्या मनाची आहेस उमा तू!आपण पळून जाऊन लग्न करु शकतो, पण त्यामुळे कदाचित आपण दोघंच सुखी होऊ. पण दोन परिवारांची वाताहत होईल हे खरं! डोळ्यातील पाणी त्याने खूप निग्रहाने परतवले.
"अनिल, समांतर रस्त्यांवरून चालणं नशीबात आहे रे आपल्या", उमा अजून रडतच होती.
खूप वेळ तिथे बसून दोघे उठली. घरी निघाली त्यानंतर उमाने ती नोकरी सोडली आणि अनिलच्या ओळखीनेच एका कापड दुकानात तिने नोकरी मिळवली.
त्यानंतर थेट आज भेट झाली होती दोघांची!
"उमा डोसा खाऊ यात?" अनिल हसून तिच्याकडे बघत म्हणाला. त्याने एक डोसा आणि एक कॉफी मागवली. अर्धा अर्धा डोसा खाताना आणि अर्धी अर्धी कॉफी पिताना पुन्हा दोघांनाही जुने दिवस आठवले. उमाच्या डोळ्यात पाणी आले.
तिच्या हातांवर थोपटत अनिल म्हणाला, " उमा त्यावेळी भावनांमध्ये वाहावत न जाता आपण योग्य निर्णय घेतला. शेवटी आयुष्य म्हणजे तडजोडच गं! आपलं लग्न झालं असतं, तरी परिवाराशी ताटातूट होऊन तडजोडीत जगावं लागलं असतं.तुला मी कधीच विसरलो नाही उमा! तूच माझी शक्ती आणि स्फूर्ती होतीस या सगळ्या कष्टांत!! बाय द वे, तुझे आई-बाबा, भाऊ कुठे आहेत? कसे आहेत आता? "
"बाबा मागेच गेले. ते बरे झालेच नाहीत. भाऊ आयटीआय होऊन एका कारखान्यात लागला. जिद्दीने आणि फार कष्टाने पुढे शिकला. मेकॅनिकल इंजिनिअर होऊन महींद्रा मध्ये चांगल्या पगारावर आहे आता. वहिनी पण इंजिनीअर असून चांगल्या कंपनीत आहे. तो महिंद्रा मध्ये लागल्यावर मी लग्न केले.दरम्यान मी पण शिक्षिका झाले होते. आई भावाकडे राहतेय, सुखात आहे. तिच्या कष्टांचे चीज झाल्याची भावना आहे तिच्या मनात.तुझे मामा मामी कसे आहेत? " उमा ने विचारले.
"आहेत.छान आहेत. मामाच्या मुलाला शिक्षणात डोकं नव्हतंच!त्याने वडापावच्या गाडी पासून सुरुवात केली, मामा मामीने ही त्याला साथ दिली. आज त्याचे दोन हॉटेल्स आहेत. मोठा फ्लॅट आहे. दोन चार चाकी गाड्या आहेत. सुंदर गुणी बायको आणि एक मुलगा आहे.मामा-मामी सुखात आहेत.सगळं सगळं छान आहे!! सगळं क्रेडिट तुला याचं उमा." खुप भावनिक होऊन अनिल म्हणाला.
"मला एकटीलाच नाही अनिल, आपल्या दोघांनाही!आपल्या त्यागावर या इमारती उभ्या राहिल्यात." गाडीत बसता बसता उमा म्हणाली.
उमाला तिच्या घरासमोर सोडून अनिल निघाला.
"घरात नाही येणार?" तिने विचारले.
"नको उमा, समांतर रस्त्यावरचे प्रवासी आपण! नशिबाने भेट झाली, खुशाली कळली, छान वाटले!निघतो आता, चल बाय.....!"असे म्हणून मोठ्या जड मनाने अनिल ने गाडी स्टार्ट केली.
त्याला बाय करून पाणावले डोळे अन जडावले पाय घेऊन उमा घराकडे वळली.
दूर कुठेतरी गाणे वाजत होते.........
हर खुशी हो वहाँ.....
तू जहाँ भी रहे......!
नीतू (सुनिता दरे)
*माझी कथा शेअर करायची झाल्यास माझ्या नावासह तिच्यात कसलाही बदल न करता शेअर बटन वापरूनच करावी. अन्यथा करू नये