
29/08/2025
#मंत्रपुष्पांजली
भारतीय इतिहासात अयोध्येचा एक राजा खणिनेत्र होऊन गेला. हा राजा प्रजेवर अत्याचार करत असे , म्हणून एक दिवस प्रजेने त्या राजाला राजपदावरून बेदखल केलं.
राजाची हकालपट्टी करणारी प्रजा हे एक विलक्षण उदाहरण इथे सापडतं.
खणिनेत्राला पायउतार करून त्याचा मुलगा आविक्षित याला राजा बनवले व सुयोग्य कारभार करण्यासाठी अनेक अटी प्रजेनी घालून दिल्या. वडिलांनी शेजारी राज्यांशी शत्रुत्व पत्करल्यामुळे आविक्षिताला वारंवार आक्रमणांच्या संकटांना तोंड द्यावे लागले. पण प्रजेच्या भक्कम पाठिंब्याने तो विजयी झाला आणि त्याने उत्तम राज्य केले.आविक्षित हा प्रजाहित रक्षक राजा होता. या आविक्षिताचा मुलगा मरुत्त.
“आविक्षितस्य कामप्रे” —- मधला हा आविक्षित
“मरुत्तस्यावसनगृहे” —- मधला हा मरुत्त
हा मरुत्त चक्रवर्ती राजा झाला. त्याच्या गौरवासाठी रचली गेलेली ही मंत्रपुष्पांजली होय.
भारतात अनेक चक्रवर्ती राजे झाले मग या मरुत्ताचं वैशिष्टय काय ? त्यानी प्रजेसाठी अनेक अडचणींना तोंड देत एक मोठ्ठा यज्ञ केला.
यज्ञ म्हणजे समाजातील अनेकांच्या भल्यासाठी केलेला प्रकल्पच.
यज्ञ म्हणजे असं मोठं कर्म ज्यात अनेक लोकांचा सहयोग घेऊन एक संघ तयार होतो. या संघातील सहयोगी हे विविध विषयांचे जाणकार,तज्ञ,कामगार असतात त्यांना “ऋत्विक” म्हणतात. या संघाच्या प्रमुखाला “होता” म्हणतात. हे सगळे मिळून एकत्र येऊन प्रजेच्या कल्याणासाठी यज्ञ करतात. जसे नदीवर बांध घालणे, तळी खणणे, डोंगरावर झाडी लावणे , जलाशय स्वच्छ करणे, अनाचारी दुष्ट चोरांवर वचक बसवणे, औषधोपचार करणे , शिक्षण देणे, अन्न धान्याची सोय करणे इत्यादि साठी अनेक यज्ञाची स्वरूपं आहेत. यज्ञ करणे म्हणजे सगळ्यांनी मिळून सगळ्यांच्या भल्यासाठी मोठं काम करणे.
यज्ञो वै श्रेष्ठतमं कर्म ! अर्थात यज्ञ हे महानतम कर्म आहे.
तर मरुत्त राजानी प्रजेला दुष्काळापासून वाचवण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घ्यायचं ठरवलं. पण मरुत्त राजाची कीर्ति यामुळे अधिकच पसरेल अशी ईर्ष्या उत्पन्न झाल्याने त्याकाळातील अनेक प्रबळ आणि संसाधन पुरवणा-या गटांनी( इंद्र आदि देवांनी ) मरुत्ताला विरोध केला. मरुत्ताचे सल्लागार असलेल्या बृहस्पतिलाही त्यांनी ह्या यज्ञात सहयोग देण्यापासून परावृत्त केले. यामुळे खचलेल्या मरुत्त राजाला समवर्त नावाच्या बृहस्पतीच्या दुर्लक्षित भावानी मदत द्यायचं मान्य केलं.
समवर्तासोबत मरुत्त राजानी प्रकल्प पुढे नेला. एवढेच नव्हे तर नंतर हळू हळू मरुत्ताने सर्व विरोधक गटांना आमंत्रित करून , त्यांचं मन वळवून यज्ञात सहभागी करून घेतलं आणि यज्ञ उत्तमप्रकारे यशस्वी केला.
यामुळे “मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसनगृहे” - अर्थात मरुत देव मरुत्त राजाच्या घरी अन्न देऊ लागले म्हणजेच मरुत्ताचे राज्य पर्जन्याने/योग्य पाऊस पाण्याने अन्नधान्यानी समृद्ध झाले.
"अशाप्रकारे यज्ञेन....” यज्ञाद्वारे मोठ्ठी कार्य सार्थकी लावता येतात ही पूर्वापार केवळ श्रद्धा नसून आपली परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे सर्वांना सहभागी करत, अडचणीत मार्ग शोधत, न खचता लोककल्याणकारी प्रकल्प पूर्ण केल्याने संपन्नता ( कुबेर म्हणजे संसाधन विपुलता) राहील आणि संपूर्ण पृथ्वीवर सार्वभौम प्रजाहितकारी राज्य पसरेल.
असा हा मंत्र पुष्पांजली चा इतिहास आणि आशय आहे. एकत्र येऊन सर्व कल्याणासाठी यज्ञ करा हा समाज, देश आणि विश्व सुखी आणि आनंदी बनवण्याचा परंपराप्राप्तमार्ग वारंवार आपल्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यासाठी ही मंत्रपुष्पांजली आहे.
मंत्रपुष्पांजली हे प्राचीन राष्ट्रगीत मानतात. मंत्रपुष्पांजलि शिवाय पूजेची सांगता होत नाही.स्पष्ट आणि शुद्ध उच्चार करण्यासाठी असा हा मंत्र खाली दिलाय.
🙏🙏
प्रथम:
ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा:||
द्वितीय:
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मे कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय। महाराजाय नम:।
तृतीय:
ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळ इति ॥
चतुर्थ:
ॐ तदप्येषश्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥
॥ मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि ॥
🌹🪷🌸🙏