06/10/2025
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू..?
(कोजागिरी पौर्णिमा आणि शरद जोशी)
कोजागिरी पौर्णिमा ही अनेक वर्षांपासून मला काहीशी उदासवाणीच वाटत आली आहे. एकदा मी आणि माझी आई आंबेठाणला गेलो होतो. त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा होती. संध्याकाळी हातात काठी घेऊन शरद जोशी धडपडत कारमध्ये गेले. त्यांनी एक हार विकत आणला. आणि लीला काकूंच्या फोटोला घातला. लीला काकू म्हणजे शरद जोशींच्या पत्नी. मी त्यांना विचारलं हार का आणला तर काका म्हणाले लीला कोजागिरी पौर्णिमेला गेली होती...( त्यांनी आत्महत्या केली होती)
माझ्या पुस्तकातला (शरद जोशीः शोध अस्वस्थ कल्लोळाचा) लीला काकूंवर लिहिलेला भाग खाली पोस्ट करतेय..
लीला काकू...
आता शेवटी शेवटी त्यांना लीला काकूंची खूपच आठवण येत होती. बोपोडीच्या त्यांच्या घरी एकदा गेले होते. शरद जोशी, मी अन् दीदी ( दीदी म्हणजे शरद जोशींच्या केअर टेकर) बसलो होतो. बोपोडीचं त्यांचं हे घर खूप सुंदर होतं. खूप स्पेशियस बाल्कनीज. चार बेडरूम्स, हॉल. केनचं फर्निचर. आणि काकांची ठरलेली बसायची खुर्ची अन् जागा. पहिल्यांदा गेले तेव्हा कौतुकाने त्यांनी सगळं घर मला स्वत: दाखवलं होतं. पुस्तकं ही शरद जोशींच्या घराचा अविभाज्य भाग होती. त्यांच्या दोन्ही घराला म्हणजे आंबेठाण आणि बोपोडीला एक गंध होता. तो अर्थातच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गंध होता. तो गंध म्हणजे बुद्धीचा, प्रज्ञेचा, मेधावी असा गंध होता. घरात प्रवेश करताच येणाऱ्याला तो जाणवत असे. हे घर प्रज्ञावंताचे, सरस्वतीच्या उपासकाचे आणि जीवनातील सत्य शोधू पाहणाऱ्या एका प्रयोगशील यात्रिकाचे घर आहे हे जाणवून देणारा गंध...
तर सांगत होते की, मी, शरद जोशी अन् दीदी बसलो होतो. माझ्या आईचा विषय निघाला. माझ्या आईला काका फार मानत. आमच्या वाईट परिस्थितीत आई मोठ्या धैर्याने बाबांच्या पाठीमागे उभी राहीली, लढली याचे त्यांना कोण कौतुक होते. ते माझ्या आईला नेहमी म्हणायचे, ‘’तुम्ही सगळा संसार रस्त्यावर आला असताना नवऱ्याच्या मागे उभ्या राहील्यात, मुलांना सांभाळलं, मोठं केलं. अहो, जीवनात साधा ओरखडा उमटला तरी काही बायका संसार मोडतात. तुम्ही माझ्या आदराचा विषय आहात’’. असे म्हणून कितीदा त्यांनी आईला नमस्कार केला होता. आई त्यांना नमस्कार करायला जायची तर ते आईला नमस्कार करू देत नसत. ‘’तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात त्या अर्थाने नमस्कार करू शकता पण नका करू’’ असे ते म्हणत. जेव्हां यावेळी लीलाकाकूंचा विषय निघाला त्यावेळी ते अक्षरश: रडायला लागले. लीला मला का सोडून गेली, माझी आज काय अवस्था झाली आहे, असे म्हणत खूप चिडले. लहान मुलासारखे चिडून हुंदके देत देत ते रडत होते.
त्यादिवशी मला भयंकर अस्वस्थ वाटलं होतं. राहवलं गेलं नाही म्हणून घरी येऊन मी नव-याशी हे बोलले. म्हंटलं काय करता येईल त्यांच्यासाठी. नवरा म्हणाला की, ‘’तो लीलाकाकूंचा फोटो जो सतत डोळ्यांसमोर असतो तो काढून टाकावा. त्याने त्यांना सतत आठवण येते, पण मी हे कसे सांगू शकणार होते. मला एकदा म्हणाले, ‘’ वसू, लीला आज असती तर, मी काही केलं नसतं. नुसतं खुर्चीत बसून पुस्तकं वाचले असते’’. हे ऐकल्यावर अक्षरश: पोटात ढवळून आलं. एवढा मोठा वाघासारखा माणूस असा बघवत नव्हता. वाटलं, तरूणपणापेक्षाही म्हातारपणी पुरूषाला स्त्रीची खूप भावनिक, मानसिक गरज असते. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला ते काकूंच्या फोटोला हार घालत. कारण काकू त्या दिवशी गेल्या होत्या. मला एकदा बोलता बोलता ते म्हणाले, ‘’बच्चू माझही काही चुकलं आहेच. तरूणपणी अंगात रग होती. कधी दुर्लक्ष झालं असेल लीलाकडे’’. दोन व्यक्तीमधलं नातं हे केवळ अन् केवळ त्याच व्यक्तींना माहिती असतं. ती इतकी खाजगी आणि अनंत पदर असलेली बाब आहे की, कोणी सांगण्याचा प्रयत्नही केला तरी ते सांगू शकणार नाही. त्यातही ते नवरा-बायकोचं नातं असेल तर मग विचारायलाच नको. नात्यातले रंग-बेरंग, त्यातली गुंतागुंत यावर तिसऱ्या व्यक्तीने भाष्य करणं चुकीचं ठरतं.
अन् मुळात शरद जोशींचं आयुष्यच वादळी, चाकोरीबाहेरचं. विवाह आणि दोन मुली ही एकच गोष्ट त्यांनी आयुष्यात चाकोरीतली केली असं मला वाटतं.
पण लीलाकाकूंचं त्यांना खूप कौतुक होतं. एकदा सांगत होते, ‘’लीला स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच शिकली, जर्मन शिकली. गाडी उत्तम चालवायची. जोशी सांगत होते, की आंबेठाणला आल्यावर सगळं आयुष्य बदललं. कोरडवाहू शेती, घरी येणाऱ्यांचा सतत राबता, कार्यकर्ते...अशी सगळी धामधूम असे. लोकांना अटेंड करणं, घरातली सगळी व्यवस्था बघणं, मुलींचं सगळं बघण...हे सर्व करूनही काकू स्वत:ला अत्यंत मेंटेन ठेवत. दिवसातून तीन वेळा त्या साड्या बदलवत असे त्यांनी आवर्जून सांगितले. बऱ्याच स्त्रिया संसाराच्या धबडग्यात, विशेषत: मुलं झाल्यावर खूप गबाळ्या होऊन जातात. मग नॅचरली नवऱ्याला ते आवडेनासं होतं. नवऱ्याला बायकोबदद्ल आकर्षण कमी व्हायला लागतं. संसार सांभाळताना नवरा आणि बायकोच्या नात्यातला शारीर पैलू सांभाळणे, त्यातलं आकर्षण टिकवून ठेवणे ही कसरत असते. असं त्यांना सुचवायचं होतं. पण लीला काकूंनी हे ही सांभाळलं होतं सगळं सांभाळता सांभाळता, हे जोशींना खूप आवडलं होतं. हे सांगतांना लीला काकूंबद्दल त्यांच्या डोळ्यात विलक्षण कौतुकाचे भाव होते.
जोशी तुरूंगात असताना लीला काकूंनी शेतकऱ्यांसमोर भाषण दिले होते आणि आंदोलन सुरू ठेवले होते अशी एक आठवणही शरद जोशींनी सांगितल्याचे मला आठवते. ही आठवण सांगताना लीला काकूंमध्ये किती गट्स होते हे सांगण्याचा त्यांच्या बोलण्यातील भाव होता.
आम्ही जेव्हा जोशींची पुतणी राधा हिच्याकडे गुरगावला तिच्या फार्म हाऊसवर गेलो तेव्हा ती म्हणाली, मिम्मी चॉकलेट छान करायची नाही. मी म्हंटलं कोण ‘मिम्मी’? तेव्हा जोशींनी सांगितलं, की लीला काकूंना गौरी आणि श्रेयाताई ‘मिम्मी’ म्हणत असत. जोशींना ते आवडायचं म्हणून त्यांनी मुलींना ‘मिम्मी’ म्हणायला शिकवलं. मग राधाताई अन् सगळेच त्यांना ‘मिम्मी’ म्हणू लागले. मलाही खूप गोड वाटलं होतं ते नाव ‘मिम्मी’. स्वित्झर्लंडमध्ये त्या चॉकलेट करायला शिकल्या. त्यांनी एक कादंबरी लिहली होती. ती शरद जोशींनी एका पेटीत जपून ठेवली होती. मला ती कादंबरी आंबेठाणला जोशींनी दाखवली, लीला काकूंचे अक्षरं दाखवण्यासाठी.
लीला काकूंबद्द्ल एक गोष्ट ते जवळच्या सगळ्यांना सांगत. शरद जोशींचा ठरवून झालेला विवाह होता. ते जेव्हा लीला काकूंना पहायला गेले त्यावेळी काकू १७ वर्षांच्या होत्या. मग १ वर्ष जोशी थांबले अन् परत जाऊन त्यांनी काकूंना मागणी घातली. लग्न जमलं तेव्हा काकूंचे केस लांबसडक, मोठे होते. आणि लग्न झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्या अन् केस कापून आल्या. जोशींना त्यांना बघितल्यावर धक्काच बसला. जोशी त्यांना म्हणाले की, ‘तू केस का कापलेस’ त्यावर लीला काकूंनी उत्तर दिले, ‘मला कधीपासून कापायचे होते’. जोशींना त्याचा थोडा रागच आला होता पण ते काहीच बोलले मात्र नाहीत. लीला काकूंनी असं का केलं असेल असा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला स्त्री म्हणून त्याचं उत्तर सापडलं. लग्नापूर्वी आई-वडिलांच्या फार बंधनात असणाऱ्या स्त्रियांना लग्न झाल्यावर खूप स्वतंत्र वाटतं. जे काही करायचं फॅशन वगैरे ते लग्नानंतर करू असं बऱ्याच बायका करतात. नवरा असतोच कौतुक करायला आणि त्याच्यावर गाजवताही येतं. उच्च् मध्यमवर्गीय घरात हे चित्र सर्रास बघायला मिळतं. तसंच काहीसं लिलाकाकूंचं झालं असावं. पण यावरून लिला काकूंच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचीही कल्पना येते. त्याही आधुनिक आणि काळाच्या पुढे होत्या हे लक्षात येतं. कारण आज त्या असत्या तर ७३-७४ वयाच्या असत्या. त्या काळात ६० च्या दशकात एखादी स्त्री असा निर्णय घेते यातून तीचं व्यक्तिमत्व कळतं.
स्वित्झर्लंडला युनोमध्ये काम करत असतानाचा एक मोठा गमतीदार प्रसंग शरद जोशींनी सांगितला. एकदा त्यांनी घरी कॉकटेल पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला शरद जोशींची सेक्रेटरी आली होती. लीला काकूंशी बोलता बोलता ती सेक्रेटरी म्हणाली की, मिसेस जोशी तुमचे मिस्टर एवढे लाजाळू आणि संकोची आहेत म्हणून सांगू. कोणत्याच स्त्रीशी ते शेकहँडसुद्धा करत नाहीत.’ जोशी म्हणाले की, ‘सेक्रेटरीचं हे बोलणं ऐकून लीला काय म्हणून खूष झाली आणि नंतर अख्खा दिवस ती खूपच आनंदात होती’.
काकूंचं जाणं ही त्यांच्या आयुष्यातली एक भळभळती जखम झाली होती. काकूंचा विषय निघाल्यावर कळायचं की काय भीषण वेदना घेऊन हा माणूस जगतोय.
जिस तरह से हंस रहां हू, मैं पी पी के गर्म अश्क
यूं दुसरा हंसे तो, कलेजा निकल पडे...
त्यांचं दु:ख तेच जाणोत. एकदा चांदवड अधिवेशनाबद्दल बोलत असताना ते मला म्हणाले होते, ‘’वसू, ज्या माणसाची बायको आत्महत्या करते त्या माणसाकडे समाज कशा नजरेने बघतो हे सांगण्याची गरज नाही. मान वर करून समाजात चालावं अशी स्थिती राहत नाही. त्या पार्श्वभूमीवर चांदवडच्या अधिवेशनाला दोन लाखाहून जास्त महिला आल्या. हा विश्वास त्या वेळी या सगळ्या स्त्रियांनी, माझ्या माय-बहिणींनी माझ्यावर दाखवला त्याने मी पुन्हा उभा राहू शकलो. तो त्यांच्या नाही तर माझ्या आयुष्यातील परिवर्तनाचा क्षण होता’’.
वसुंधरा काशीकर
(वसुंधरा काशीकर यांच्या fb वॉल वरून साभार)
#शरदजोशीशोधअस्वस्थकल्लोळाचा
#शरदजोशी 🌾