Booksanstories

Booksanstories Booksanstories is an open platform for young and aspiring writers, Story-tellers!!

 ाय_वाचलंआम्हाला कळवा तुम्ही काय वाचताय!!
25/06/2026

ाय_वाचलं
आम्हाला कळवा तुम्ही काय वाचताय!!

खूप दिवसांनी, महिन्यांनी हातून एक तुकडा लिहून झाला ...वाचून नक्की कळवा. (लिहावंसं नं वाटणं किंवा नं हातून नं लिहून होणं ...
14/04/2026

खूप दिवसांनी, महिन्यांनी हातून एक तुकडा लिहून झाला ...
वाचून नक्की कळवा.
(लिहावंसं नं वाटणं किंवा नं हातून नं लिहून होणं याच्या कारणांवर एक स्वतंत्र post होऊ शकते 🙏)

नितळ निरागसाच्या शोधात मी निघालो. दगडगोटे तुडवत चालत राहिलो. एके ठिकाणी थबकलो. ते माझे घर नाही. तो विसावाही नाही. थांबा म्हणून त्याला. त्या ठिकाणी मग स्थिरावलो. माझ्या आत उसळलेल्या शोधाच्या उर्मीचे काय झाले कुणास ठाऊक. मी श्रांत होऊन तिथेच थिजून राहिलो. त्या थांब्याला थांबा ठरवून त्रयस्थपणे बसून राहिलो. माझ्या पाठीचा कणा ताठ होता. बांधून आणलेली शिदोरी संपत चालली होती. पाणी तळाशी पोहोचले होते. स्वतःला आक्रसून घेण्यापलीकडे काय जमले असते मला? तरीही एकदा आतून आलेल्या रेट्यासरशी मी प्रयत्न केला उठण्याचा, लडखडत उभा राहिलो तेव्हा जाणवले माझ्या चपलेचा अंगठा तुटला आहे. चप्पल तिथेच टाकून तळवा जमिनीला टेकवला. निबर पायांना स्पर्श जाणवेना. दुखऱ्या संध्यांवरून हळुवार हात फिरवत मी एक पाऊल टाकले. मग दुसरे. मग तिसरे. शरीर जडशीळ झालेले. हनुवटी झुकलेली. उरलेल्या पाण्याचे दोन घोट पिऊन तिसऱ्या वेळी भरलेली ओंजळ चेहऱ्यावरून फिरवली. माझ्या सुकलेल्या गालांना त्या पाण्याच्या स्पर्श झोंबला. तेवढ्यात सळसळलेल्या एका झुळकेने किंचित आग झाली. पुन्हा ओला तळवा कपाळ, डोळे आणि गालावरून फिरवला. कोरड्या केसांतून हात फिरवून डोळे बारीक करून वर आभाळाकडे पाहिले मान उंचावून. वेदनेची एक चमक गेली तळपायापर्यंत थेट मानेतून...
पिवळ्या उन्हाने भरलेले विस्तीर्ण आभाळ. त्या असह्य उष्म्याने बंद झाल्या पापण्या. पुन्हा मान थोडी खाली करून किंचित डोळे उघडून समोर पाहू लागलो. म्हणावा असा रस्ता नव्हता. वाटही नव्हती. तरीही चालावे लागणार होतेच. थांबा मागे राहिला होता केव्हाचा.
हा काळ कोणता आहे? कुठे निघालो आहोत आपण? काय आणि किती मागे सोडले आहे?
एक सोनपिवळे फुलपाखरू भिरभीरू लागले माझ्या नजरे समोरून. चिमुकल्या पंखांचे. भटकले असावे बहुदा वाट चुकून? ही फुलपाखरे, पक्षी कशी शोधत असतील वाट? त्यांना कुठून कुठे पोहोचायचे असते का? की असा हिशोबी प्रवास नसतोच त्यांच्या मनात?
मी माणूस. मला मन आहे. भावना आहेत. मी हे सगळे मनात ठेवतो साठवून. त्यांच्या आठवणी होतात साठून साठून. मग त्या शिळ्या होतात. मग कधीतरी त्या आंबतात.
ते फुलपाखरू भिरभिरते आहेच माझ्या डोळ्यासमोर अजून. बराच वेळ चालतो आहे मी. म्हणजे नेमका किती?
हिशोब हवाच असतो आपल्याला सगळ्याचा. आता माझ्याकडे कोणतेही मोजयंत्र नाही. मी माझ्या अशा काही वस्तू, थोडे सामान आणि काही किरकोळ असे त्या थांब्यापाशी सोडून आलो आहे.
फुलपाखरू लांब गेले आहे. त्याला फुलाचा गंध आला असेल?
माणूस कोणत्या गंधाच्या मागे जातो? मला आत्ता काहीतरी भाजल्याचा गंध येतो आहे. उद किंवा धूप जळल्याचा आणि... आणि... आणि कसलातरी...
मी केव्हातरी निघालो होतो, कुठेतरी थांबलो होतो. तिथून उठलो नसतो तर तो थांबाच माझा अंतिम विसावा बनला असता.
अंतिमाचा शोध घेतो आहे का मी? माणसाला सतत उत्तरे हवी असतात. तो स्वतःच कोडी निर्माण करतो आणि सोडवत बसतो. हा त्याचा आवडता छंद आहे.
मला फुले वेचण्याचा छंद होता.
मी चालू लागलो की आपसूक माझी पावले बागेकडे वळत. तिथे फुलांचा सडा पडलेला असे. मी ती वेचे. माझी ओंजळ भरे. भरलेल्या ओंजळीतली फुले कुठेही वाहायची माझी इच्छा नसे. फुल जमिनीवर पडणार नाही अशी खबरदारी घेत मी घरापर्यंत येई. तरीही काही फुले पडतच रस्त्यावर. मला खूप मोठी ओंजळ असावी असे वाटे. माझ्या हातांच्या मुलायम गुलाबी तळव्यावर ती पांढरी फुले उठून दिसत. आता माझ्या हातांच्या तळव्यांचा मुलायमपणा नष्ट झाला आहे.
पावलांना भेगा पडल्या आहेत आणि चालून पोटऱ्या भरून आल्या आहेत.
बहुदा कोणी भाकरी भाजत असावे. मी आता त्या गंधाचा वेध घेत निघालो आहे. पलीकडे कुंपण दिसते आहे. दगडी कुंपणापलीकडून किंचित धूर येतो आहे. फुलपाखरू अगदी लिलया कुंपणावरून पलीकडे गेले आहे. माझा देह जड आहे.
***
आजही, त्या दगडी कुंपणावरून मला एक फुलपाखरू आत येताना दिसले. माझी खिडकी अगदी कुंपणाच्या त्याच भागासमोर आहे, जिथून मी त्या दिवशी आत शिरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.
त्यानंतर ओठांना झालेल्या कोमट पाण्याच्या ऊबदार स्पर्शाने मला जाग आली. तांदळाची गरम भाकरी आणि मुळ्याच्या भाजीचे चार घास पोटात गेल्यानंतर मी भानावर आलो. पुढे बरेच काही घडले.
मी माझी बसायची जागा या खिडकी जवळ निश्चित केली आहे. इथून मला ते बाहेरचे कुंपण दिसते आणि त्या कुंपणावरून सहज आतबाहेर करणारी सोनपिवळी फुलपाखरेही दिसतात.
हा माझा थांबा नाही. हा माझा विसावा आहे. कायमचा. निदान आतातरी मी तसे ठरवले आहे. जो पर्यंत मला फुलपाखरांइतके सूक्ष्म होऊन सहजरित्या त्या कुंपणावरून आतबाहेर करता येणार नाही तो पर्यंत तरी.
तो पर्यंत मी माझ्या मनाला फुलपाखरू म्हणण्याचे ठरवले आहे. या पुढे कितीही दीर्घ चिंतन करता येऊ शकेल. मात्र आता मला त्याची आवश्यकता वाटत नाही.

©अक्षय प्रभाकर वाटवे

#ललित #लेखन

Address

Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Booksanstories posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Booksanstories:

Shortcuts

Share

Category