30/09/2026
उत्तर प्रदेश कॅडरच्या माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेला रामराम केल्यानंतर आपल्या पुढील वाटचालीची घोषणा केली आहे. सुमारे १३ वर्षांची IAS सेवा केल्यानंतर त्यांनी आता राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश ही आपली ‘कर्मभूमी’ असल्याचं सांगत त्यांनी याच राज्यातून राजकीय प्रवास सुरू करण्याची घोषणा केली.
विशेष म्हणजे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली काम करण्याऐवजी नागरिकांसोबत मिळून स्वतंत्र राजकीय व्यासपीठ उभारण्याचा त्यांचा मानस आहे. सरकारी कार्यालयांपर्यंत पोहोचत नसलेल्या किंवा पोहोचूनही न ऐकल्या जाणाऱ्या सामान्य नागरिकांचा आवाज बनण्याचं उद्दिष्ट त्यांनी व्यक्त केलं.
दिव्या मित्तल यांनी प्रशासकीय सेवेदरम्यान पाहिलेल्या पायाभूत सुविधांच्या समस्या, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांचा उल्लेख केला. तसेच, आपण घाबरणार नसून प्रश्न विचारत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या राजकारणात प्रवेशानंतर कोणताही पक्ष निवडण्याऐवजी स्वतंत्र व्यासपीठ उभारण्याची भूमिका त्यांनी सध्या घेतली आहे.