चिकूपिकू - मराठी Magazine - लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी.
आपल्या घरात गोड-गोजिरवाणी आणि तितकीच दंगेखोर मुलं आहेत. ती एका जागेवर मुळीच स्वस्थ बसत नाहीत. सारखी नवी खेळणी हवी असतात, पण खेळणी आणली की त्यांच्याशी न खेळता घरातली पातेली, भांडी, चमचे, नाहीतर आईबाबांच्या मोबाईल-लॅपटॉपशी खेळण्यात ते जास्त रमतात. साधारणपणे 2 ते 6 या वयोगटातल्या या मुलांना सतत नव्या गोष्टी हव्या असतात पण यात त्यांची काही चूक नसते. त्यांच्या बुद्धीची भूकच जास्त असते. प्रत्येक नवा अनुभव, नवा खेळ, नवी कविता त्यांच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सची जोडणी (synapses) करत असते आणि हे काम अत्यंत वेगात होत असतं. म्हणून या जिवाला स्वस्थता म्हणून नसते.
अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच ‘चिकूपिकू’ चा अंक सादर करत आहोत. हा अंक खास या वयातल्या मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या मेंदूत भरपूर आणि चांगल्या गोष्टींच्या जोडण्या व्हाव्यात याचसाठी निर्माण केलेला आहे. काळाची गरज लक्षात घेऊन मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांचा वापर केला आहे. मुलांना तुम्ही तुम्ही गोष्टी वाचून दाखवा. सगळ्या activities शी त्यांच्याबरोबर तुम्ही सोडवा. म्हणजे हळूहळू त्यांच्यात या सगळ्या गोष्टींची आवड निर्माण होईल. अंकात अनेक ठिकाणी एखाद्या activity तून मुलांना काय मिळेल, हे सांगितलं आहे. त्याचाही तुम्हाला उपयोग होईल.
आजकाल गुगलवर खूप गोष्टी उपलब्ध आहेत, तरीही प्रिंट मीडियात हा अंक सादर करत आहोत, कारण गुगल, यू ट्यूबवर मुलं रमतात खरी; पण या वयात त्यांना स्क्रीनपासून लांब ठेवणं अत्यावश्यक आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला , विचारक्षमतेला संधी देणं हे आजकाल जास्त महत्वाचं आहे.
या अंकाची संपूर्ण मांडणी मुलं आणि आईबाबा यांचा विचार करूनच केलेली आहे. मुलांना पेस्टल कलर्स, स्केचपेन, वॉटर कलर सुद्धा वापरू द्या. खडू, कोळशाचा तुकडा याने सुद्धा रंगवायचं असेल तर रंगवू द्या. त्यासाठीच अंकाचा कागद वापरलेला आहे. हे सर्व करताना अंक चुरगळला, फाटला, ओला झाला तर रागवू नका. अंक मनमुराद पद्धतीने ‘वापरला’ गेला आहे, याचीच तर ती खूण आहे.
तर मुलांबरोबर तुम्हीही थोडे लहान व्हायची मजा घ्या! गोष्टी वाचा, ठिपके जोडा, चित्रं रंगवा. आणि हो डोकं लढवल्यासारखं करा पण मुलांना विचार करू द्या. तुमचे अनुभव, सूचना आम्हाला कळवल्या तर छानच!