26/07/2026
स्मिता भागवत...
मराठी - गुजराती दोन्हीही भाषेतील साहित्यात लीलया मुशाफिरी करणाऱ्या, दोन्ही भाषेतील मिळून प्रकाशित पुस्तकांची संख्या शंभराच्या घरात असणाऱ्या हाडाच्या, संवेदनशील व राष्ट्रभक्त लेखिका आदरणीय स्मिता भागवत यांचं नुकतंच म्हणजे २१ जुलै रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी मुंबईत दुःखद निधन झाल्याचं समाज माध्यमातून वाचण्यात आलं आणि मन विषण्ण झालं...
स्मिताताईंच्या असंख्य आठवणींचा चित्रपटच जणू डोळ्यासमोरुन सरकायला सुरुवात झाली....
आमची पहिली भेट कधी झाली हे आता नक्की आठवत नाही पण १९९१ साली
'मी एक खलाशी' या माधवी कुंटे लिखित पुस्तकाचा शानदार प्रकाशन समारंभ पार्ल्यात झाल्यानंतर अंदाजे दोन अडीच वर्षांनंतर आमचे घर मालक श्री अनंतराव नेने यांच्या लॅंडलाईन फोनवर स्मिता भागवत यांचा फोन आला होता...
त्यांनी स्वतःची ओळख करुन देतांना सुप्रसिद्ध लेखक आदरणीय श्री रविंद्र पिंगे यांचा संदर्भ देत सांगितले होते कीं 'प्रकाशनो पडछायो' या महात्मा गांधी व त्यांचे ज्येष्ठ पुत्र हरीलाल गांधी यांच्यातील भावनिक तणावाचे.. संघर्षाचे चित्रण करणाऱ्या
श्री दिनकर जोशी लिखित मूळ गुजराती कादंबरीचा स्मिता भागवतांनी केलेला मराठी अनुवाद त्यांना मला वाचनासाठी... प्रकाशनासाठी द्यायचा आहे...
लिखाण पोस्टाने/ कुरियरने पाठवण्या ऐवजी समक्ष भेटीतच त्यांना ते माझ्याकडे सुपूर्द करावयाचे होते...
पण त्यांच्या व्यस्तते मुळे मुंबईहून डोंबिवलीत येणे त्यांना शक्य नव्हते...
सुविख्यात
'मुंबई समाचार'
या गुजराती दैनिकात assistant editor म्हणून रविवार पुरवणीचे काम त्या तेंव्हा पहात
होत्या व त्यामुळे जेवणाच्या सुट्टीत मुंबई समाचार जवळच कुठेतरी भेटता येईल का ? असं त्यांनी विचारलं होतं...
मलाही त्याच भागात असणाऱ्या सेंट्रल लायब्ररीत कामासाठी अनायसे जायचंच होत ...
तेंव्हा दोघांचीही सोय पहात आम्ही सेंट्रल लायब्ररी समोरील हॉर्नीमन सर्कल बागेत भेटायचं ठरवलं...
ठरलेल्या दिवशी आमची भेट झाली व प्रकाशनो पडछायो चे मराठी भाषांतर
'प्रकाशाची सावली' चे हस्तलिखित त्यांनी माझ्या हातात ठेवत स्वतः बद्दल व लिखाणा बद्दल उपलब्ध पंधरा वीस मिनिटात जेवढं सांगता येईल तेवढं सांगून लिखाण अवश्य वाचून मगच निर्णय करावा अशी विनंती करुन त्या मुंबई समाचार मधे घाईने परतल्या....
अशारीतीने एक लेखिका व एक प्रकाशक एखाद्या बागेत भेटण्याचा बहुधा हा पहिलाच आणि एकमेव प्रसंग असावा...
एकीकडे सेंट्रल लायब्ररी तर दुसरीकडे जवळच असलेली मुंबई समाचारची वास्तू अशी साहित्य संबंधित पार्श्वभूमी मात्र आमच्या त्या पहिल्या भेटीला होती एवढे खरे..!!!
स्मिता भागवत... पूर्वाश्रमीच्या विजया कप्तान...
बडोद्याचे
स्वातंत्र्य सेनानी कप्तान ( श्री नारायणराव व सौ.विमल) दांपत्याच्या पोटी जन्म आणि आई वडीलांचे राजकीय गुरु, सरदार पटेलांचे उजवे हात असणाऱ्या अहमदाबादच्या
श्री गोविंदराव भागवतांचे सुपुत्र
श्री सिद्धार्थ भागवत यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता..
सासरच्या संपूर्ण गुजराती वातावरणात आल्यावर माता-पिता व सासऱ्यांच्या मित्र परिवारातील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आदरणीय
श्री उमाशंकर जोशी, श्री नगीनदास पारिख आणि श्री रमणलाल सोनी या प्रथितयश गुजराती साहित्यिकांच्या सहवास व नित्य प्रोत्साहनाने मातृभाषेत लेखन करण्याची प्रचंड उर्मी असूनही त्यांच्या लेखनाचा 'श्री गणेशा' झाला तो मात्र भाषा भगिनी गुजराती मधून.!!!
पहाता पहाता त्या गुजराती मधील २० पुस्तकांच्या लेखिकाही झाल्या... पुढे श्री सिद्धार्थ भागवतांच्या बॅंकेतील ( Bank of India) नोकरी मुळे त्यांचं गुजरातेतून मुंबईत येणं झाल्यावर श्री रविंद्र पिंगे यांच्याशी झालेल्या परिचयाने व आश्वासक प्रोत्साहनाने मातृभाषेत मुशाफिरीचे राहून गेलेले मनसुबे येथील मराठी साहित्य विश्वात त्यांना स्वस्थ बसु देत नव्हते ...
त्यातून त्यांचे साहित्यिक गुरु आदरणीय
श्री उमाशंकर जोशी यांची गुजराती साहित्य इतर भाषां मधे नेण्याची इच्छाही त्यांना खुणावत होती..
यातूनच मग मराठी नियतकालिकांतून लिखाण सुरु झाले व याच काळात सुप्रसिद्ध गुजराती साहित्यिक श्री दिनकर जोशी यांची 'प्रकाशनो पडछायो' त्यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी सिद्ध केलेल्या त्याच्या मराठी अनुवादाचे हस्तलिखित आज माझ्या हातात ठेवले होते...
'प्रकाशाची सावली' मी झपाटल्यागत वाचून काढली होती.
त्यांनी अनुवाद असे आधीच सांगितले नसते तर ते लिखाण अनुवाद आहे हे मला खरेच वाटले नसते इतके ते खरे झाले होते...
महात्मा पित्याच्या ज्येष्ठ पुत्राची आयुष्यभर झालेली घुसमट..फरफट व त्यातून आलेल्या वैफल्यातून केलेली बंडखोरी... व्यसनाधीनता... धर्मांतर व अंती या महान पित्याच्या पुत्राची..
'हरीलाल गांधींची' एक सिफिलीसचा रोगी...मुर्दा नंबर आठ इतकीच ओळख उरावी या सारखी करुण घटना नसावी...
महात्म्याच्या आदर्शवादाच्या हटवादाची ही परिसीमा होती..
कोण खरं कोण खोटं..कोण बरोबर कोण चूक अशा संभ्रमात टाकणारी ही पिता-पुत्रातील संघर्षाची अनोखी कहाणी.... अपरोक्षपणेही महात्मा गांधीं वरील टीका नसूनही ती तशी आहे असे वाचकांना जाणवणारी, खिळवून टाकणारी 'प्रकाशाची सावली', मी प्रकाशित करण्याचे ठरवले व तसे स्मिता भागवतांना कळवूनही टाकले...
माझा सकारात्मक निर्णय कळाल्यावर त्यांना झालेला आनंद त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता..
त्यांच्या आग्रहा वरुन आमची पुढची भेट त्यांच्या बोरीवली येथील घरी सुट्टीच्या दिवशी झाली...
या भेटीत स्मिताताई म्हणाल्या महात्मा गांधींवर अप्रत्यक्ष टीका समजून जवळपास तीन प्रकाशकांनी हे लिखाण नाकारलेले होते....
एका प्रकाशकाने तर तीन चार महीने ठेऊन घेतले होते व न वाचताच ते त्यांना परत पाठवले होते म्हणे...
या पार्श्वभूमीवर तुम्ही दिलेला होकार जरी सुखावणारा असला तरी अजूनही तुम्हाला फेरविचार करायचा असेल तर अवश्य करु शकता असे त्या मला आवर्जून म्हणाल्या होत्या..!!!
पण मी माझ्या निर्णयावर ठाम असल्याचे त्यांना सांगितल्यावर मूळ लेखक श्री दिनकर भाई जोशी यांची भेट घेऊन तीघांमध्ये रीतसर करार झाला आणि प्रकाशाची सावलीचे काम सुरु केले...
मोरया प्रकाशनाचे कल्पक चित्रकार
श्री मनोज चौधरी यांच्या कल्पनेतून साकारलेल्या समर्पक मुखपृष्ठासह प्रकाशाची सावली तयार होत आल्यावर प्रकाशन समारंभाचा विषय पुढे आला..
सौ. स्मिता भागवतांची इच्छाही हा समारंभ पार्ल्यातच व्हावा अशी होती...
कारण श्री रविंद्र पिंगे यांच्या आग्रहाखातर
'मी एक खलाशी' च्या प्रकाशन समारंभास त्या आल्या होत्या म्हणे व तेंव्हाच श्री पिंगे यांनी माझा नंबर माधवी ताईंकडून घेऊन ठेवायला सांगितले होते...
पिंगे यांचा संदर्भ देतच पुढे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता वैगरे हे सर्व नंतर त्यांनीच मला सांगितले होते...
एकूण अशारीतीने मोरया प्रकाशनाचा पार्ल्यातील हा तीसरा समारंभ होणार होता... !!!
प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक श्री गंगाधर गाडगीळ यांच्या नावाला स्मिता ताईंची पहिली पसंती होती. ..
श्री गाडगीळांना फोन करुन भेटायला गेलो..
श्री गाडगीळ एकदम स्पष्टवक्ते होते..
मी कार्यक्रमाला येईन पण मी मानधन घेतल्याशिवाय कुठल्याच कार्यक्रमाला जात नाही... माझे...एवढे... ऐवढे मानधन आहे.. ते देणार असाल व माझी कार्यक्रम स्थळी नेण्या - आणण्याची व्यवस्था करणार असाल तर मी येईन...
त्यांना होकार देऊन परततांना मला आदरणीय
प्रा.शिवाजीराव भोसले यांची थेट फलटण येथे जाऊन घेतलेल्या भेटीची व त्यांच्याशी झालेल्या बोलण्याची आठवण सहजच होऊन गेली...
(एक रुपयाही मानधन न घेता, स्वखर्चाने ते मोरया प्रकाशनाच्या प्रकाशन समारंभास डोंबिवलीत आले होते)
मोरया प्रकाशनाच्या आजवरच्या इतिहासात आधी सांगून मानधन घेऊन कार्यक्रमाला येणारे गाडगीळ हे पहिलेच पाहुणे होते... पण एक मात्र नक्की...
त्यांचं असं स्पष्ट बोलणंही मला आवडलं होतं... आणि प्रत्येकाची आपली विचार पद्धती असतेच..नाही का?
मूळ गुजराती पुस्तकाचा अनुवाद असल्याने लेखक दिनकर भाई जोशी तर कार्यक्रमाला होतेच शिवाय सुप्रसिद्ध गुजराती साहित्यिक श्री गुलाबदास ब्रोकर यांनाही विशेष निमंत्रित केले होते... स्मिता ताईंना मराठी लेखनाची प्रेरणा देणारे श्री रविंद्र पिंगे हे असणं तर स्वाभाविकच होतं...
प्रकाशाची सावली चे शानदार प्रकाशन पार्ल्यात झाले व सौ. स्मिता भागवत यांच्या मराठी लेखनाचा "श्रीगणेशा" 'मोरया प्रकाशनाने' प्रकाशित केलेल्या प्रकाशाची सावली या पुस्तकाने झाला होता... याचा आम्हाला आजही अभिमान वाटतो..
गुजराती भाषेत त्यांचे लिखाण ज्यांच्यामुळे सुरु झाले व स्मिता ताईंनी गुजराती साहित्य मराठीतही न्यावे अशी प्रबळ इच्छा असणारे आदरणीय श्री उमाशंकर जोशी मात्र हा अनुवाद पहायला हयात नव्हते... त्यांचा उचित सन्मान म्हणून प्रकाशाची सावली ही पहिली मराठी साहित्यकृती स्मिता ताईंनी उमाशंकरजींना अर्पण केली होती..
प्रकाशाची सावलीचं मराठी वृत्तपत्रांनी व वाचकांनी चांगलं स्वागत केलं ... अल्पावधीतच याच्या दोन आवृत्त्या काढव्या लागल्या होत्या..
स्मिता ताईंचे 'वीत दूर आकाश' हे पुस्तकही आम्ही नंतर प्रकाशित केलं होतं..
अशारीतीने त्यांच्या मराठी साहित्यातील मुशाफिरीची घोडदौडच या पुढे सुरु झाली... (आज गुजराती व मराठीतील त्यांच्या पुस्तकांची एकूण संख्या १०० पर्यंत गेली आहे.)
या काळात भागवत कुटुंबाशी घनीष्ठ संबंध आला...
त्या डोंबिवलीतील आमच्या घरी आल्या..
मी अनेकदा कामानिमित्त श्री सिद्धार्थ भागवत यांना बॅंकेतही भेटत होतो. ते तेंव्हा मुंबईतील हेड ऑफिस मधे डेप्युटी चीफ मॅनेजर होते...
स्मिता भागवतांची कन्या नंदिताच्या विवाहास ही आम्ही उभयता विशेष निमंत्रित होतो...
पुढे त्यांच्या व्यक्तिगत कारणास्तव त्या कॅनडात स्थायिक झाल्यावर भेटी गाठी व संपर्क कमी होत गेला..
भारतात आल्यावर त्यांचा फोन मात्र हमखास असायचाच..
माझ्यापेक्षा त्यांच्या गप्पा पत्नी सौ सुरेखा व मुली योगिनी व गौरी यांच्याशीच
होत असत..
लग्ना नंतर गौरी पुणेकर झाली आणि
मोरया प्रकाशनाचे कामही तीच प्रामुख्याने पहात असल्याने स्मिताताई पुण्यात गेल्यावर गौरी त्यांना भेटायला हमखास जातं असे.
एकदा त्या अशाच भारतात आल्या असतांना आम्ही उभयता ( मी व पत्नी सौ. सुरेखा) ठरवून मुंबईतील त्यांच्या मुलीकडे... नंदिताकडे भेटलो... सर्व बॅकलॉग भरुन काढत, सुग्रास जेवणासह भरपूर गप्पा झाल्या...
Statue of unity या सरदार पटेलांच्या मा. नरेंद्र मोदींनी उभारलेल्या उचित व सयुक्तिक स्मारकाचा विषय बोलण्याच्या ओघात आला... स्मिता भागवतांच्या तान्हेपणी सरदार पटेलांनी त्यांना मांडीवर घेऊन आशिर्वाद दिला होता ही अनमोल आठवण त्यांनी यावेळी आम्हाला सांगितली...
ही आठवण ऐकतांना अंगावर आलेले रोमांच आताही मला आठवले...
सरदार पटेलांच्या मुळेच आपला भारत एकसंघ राहू शकला..
'पोलादी पुरुष' ही बिरुदावली सार्थ करणाऱ्या या महापुरुषाच्या
जीवन कार्याचे यथार्थ दर्शन घडविणारा ग्रंथ स्मिता ताईंनी लिहावा असा प्रस्तावच तेंव्हा मी स्मिताताईं पुढे तात्काळ ठेवला होता..
कॅनडात परत गेल्यावर आवश्यक ते सर्व संदर्भ ग्रंथ गोळा करुन वर्षभराच्या आत त्यांनी "सरदार" हा ग्रंथ सिद्धही केला..!!!
२०१९ मधे त्या भारतात पुन्हा आल्या होत्या तेंव्हा पुण्यात 'सरदार' चे प्रकाशन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या शुभहस्ते थाटात झाले होते...
सरदार ग्रंथ त्यांच्या साहित्यिक प्रवासातील खूप मोठी उपलब्धीच ठरल्याने त्यांना झालेले समाधान आम्हाला अर्थातच सुखावणारे होते...
नंतरच्या काळात त्यांचं कधी कॅनडात तर कधी भारतात वास्तव्य असायच..
फोनवर संपर्क होता पण समक्ष भेट मात्र झाली नाही...
दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थ भागवत दुर्धर आजाराचे निमित्त होऊन अनंताच्या प्रवासास पुढे निघून गेल्यावर मनाने त्या खचल्याचे बोलण्यातून जाणवायचं..
पण अशाही मनस्थितीत त्यांनी स्वतःला असलेल्या शारीरिक व्याधींचा धीराने सामना केला होता पण काळाने अकस्मात घाला घातला व
त्या आज आपल्यात नाहीत हे वास्तव पचवणं त्यांच्या परिवारातील सर्वांनाच जसे कठीण आहे तसेच त्यांच्या संपर्कात राहिलेल्या माझ्या सारख्या सर्वांनाही आहे...
त्यांच्या प्रेरणादायी स्मृती निरंतर जपणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल...
#दिलीप_महाजन
#मोरया_प्रकाशन
डोंबिवली - पुणे
डोंबिवली -पुणे