01/09/2025
“आस्तिक”
“नाथा चल रे! गाडी काढ. माझी तयारी झालेय.” असं आक्कांनी म्हणताच नाथा धावला गाडी काढायला. तशी गाडी तयारच होती. फक्त चालू करून दाराशी आणायची होती. आक्का म्हणजेच, श्रीमती. मालिनी मधुकर अत्रे, पुण्यामधलं नावाजलेलं प्रस्थ. मधुकरराव असताना त्यांनी अत्र्यांचं पूर्वापार चालत आलेलं घराणं जपलं होतं आणि तद्नंतर वाढवलं पण होतं. त्याकाळी 'बायकांना व्यवसाय काय जमणार!' अशा स्वभावाचे लोक असूनही त्यांची तोंडं आक्कांनी बंद केली होती. मधुकररावांनी त्यांना अगदी अथपासून इतिपर्यंत व्यवसाय शिकवला होता. त्यात त्यांना साथ द्यायला गणपती बाप्पा होताच. अत्र्यांची बाप्पावर कोण श्रद्धा. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला अभिषेक ठरलेला. पहिले पहिले गरिबीच्या दिवसांमध्ये चालू केलेला ११ मोदकांचा नैवेद्य आता १०१ पर्यंत पोहोचला होता. आक्का पण अगदी आनंदाने आणि मनापासून सगळं श्रद्धेने करायच्या. लग्न झाल्यावर वर्षभरातच गोड बातमी कानी आली आणि बाप्पाचा नैवेद्य म्हणून माघी गणेश चतुर्थीला जन्म झालेल्या मुलाचं नाव ठेवलं “प्रसाद”! हा प्रसाद आता डॉक्टर प्रसाद मधुकर अत्रे या नावाने स्त्री रोगतज्ञ म्हणून पुण्यामध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालवत होता. पण आईबाबांची बाप्पावर असलेली अपार श्रद्धा याच्यामध्ये काही उतरली नाही. त्याचा देवावर अजिबातच विश्वास नाही. त्याचं एकच म्हणणं, “श्रद्धा ठेवायची असेल तर आपल्या कर्तृत्वावर ठेवा.. देव वगैरे सगळं थोतांड आहे.”
तर आज संकष्टी चतुर्थी त्यामुळे आक्का छानशी हलक्या पिवळ्या रंगाची साडी, त्यावर मोहनमाळ, कानात मधुकररावांनी दिलेल्या मोत्याच्या कुड्या असं सगळं घालून स्वयंपाकघरात आल्या. स्वयंपाकाला असलेली मंजुळा आणि स्वतः खुद्द आक्का दोघींनी सकाळीच हाताने वळून तयार केलेल्या मोदकांचा नैवेद्य देवळात न्यायच्या तयारीला लागल्या. ते झाल्यावर त्यांनी प्रसाद ला हाक मारली. “प्रसाद, अरे येतोयस न खाली? चल नाश्ता करून घे. मग मला देवळात जायचंय रे. ये लवकर!” प्रसाद हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या निमित्ताने तयार होऊन खाली आला तोच जरा चेहरा कसनुसा करतच. "आई काय ग हे तुझं? नेहमीप्रमाणे चाललीस वाटतं तू? अग मी कितीवेळा सांगितलं आहे हे देव वगैरे काही नसतं गं.. आपलं नशीब आपण घडवतो. उगीच नको त्या गोष्टीचा बाऊ करत जाऊ नकोस. आणि देवळात वगैरे जाऊन काही होत नाही. आपल्याला बरं नसलं की फक्त डॉक्टरच आपल्याला बरं करतात तो तुझा देव नाही गं." हे संवाद आक्कांना आता दर वेळचेच झाले होते. दर वेळी आक्का मात्र त्याला त्याच मृदू स्वरात समजवायच्या. "अरे मला माहितेय आपलं नशीब आपणच घडवतो. आपणच आपले शिल्पकार असतो. सगळं मान्य आहे. पण तुझे बाबा हेच म्हणायचे आणि मी पण की, देव आहे की नाही हे मानायचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण निदान आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्याला बळ देते. आपल्याला सावरते आणि हरभऱ्याच्या झाडावर चढलो असू तर आपली जागा पण दाखवते. यावर तरी विश्वास ठेवायला काय हरकत आहे. ते काही केल्या तुला पटत नाही. शिवाय आज तर मला सकाळपासून काहीतरी विचित्र होतंय. पण काय ते नाही सांगता येत आहे. दरवेळेस असणारा उत्साह आज नाहीये असं वाटतंय. असं आक्कांनी म्हणताच प्रसाद म्हणाला, " चला माझ्या सान्निध्यात राहून वाण नाही पण गुण लागला म्हणायचा तुला आई.” त्याला तिथेच थांबवत त्या म्हणाल्या, "नाही हो. अजिबातच असं नाही.. सध्या तू हरभऱ्याच्या झाडावर चाललायस तेव्हा ये खाली. नाहीतर काहीतरी विचित्र होऊन बसेल बरं!" आक्कांचे शब्द लगेच झेलत प्रसाद उद्गारला, “छे छे! काही होत नाही. जाऊदे! तुझ्याशी आणि त्या तुझ्या देवाशी कोण वाद घालणार. चल मी सोडतो तुला देवळात.” आक्कांनी मात्र नकार दिला, “नको रे बाबा! तू जा तुझा तुझा. मी नाथाला सांगितलं आहे गाडी काढायला. नाश्ता झाला की तू निघ आणि सावकाश जा. उगीच तुझी इच्छा नसताना माझ्याकडून पातक नको घडायला देवळात नेल्याचं..." असा प्रेमळ संवाद करून आक्का हसतच बाहेर पडल्या. देवळात सुंदर आणि मनाजोगं दर्शन झालं. त्यांनी बाप्पाला हात जोडून विनवणी केली, “बाप्पा आज काही ठीक वाटत नाही. काही घडणार आहे का? सारखी मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. मला काही झालं तरी चालेल पण माझ्या बाळाला सुखरूप ठेव रे बाबा.” असं मागणं मागून अर्पण केलेला नैवैद्य गुरुजींना सांगून भाविकांमध्ये वाटायला सांगितला आणि त्यांनी परतीची वाट धरली.
इथे थोड्या वेळाने प्रसाद एका महिलेची अचानक आलेली सिझरची शस्त्रक्रिया करून मोकळा झाला. आल्यावर मोबाईल बघायला घ्यावा तर त्याच्या मोबाईल वर १० मिसकॉल होते नाथाच्या नंबरवरून. इतकं काय झालं असेल म्हणून फोन केला तर त्याला एकदम धक्काच बसला. तो मटकन खुर्चीत बसला. त्याच्या लाडक्या आईला म्हणजेच आक्कांना हृदयविकाराचा झटका आला होता आणि नाथा त्यांना मंगेशी हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होता इतकेच कळले त्याला. पुढे तो ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. तो लगोलग तिकडे धावला. त्याला अचानक आक्कांचे आजचे सकाळचे शब्द आठवले. सकाळीच आई म्हणत होती 'कसंतरी होतंय.' आपण तेव्हाच लक्ष द्यायला हवं होतं. तो लगेचच त्याच्या लाडक्या आणि जिवापेक्षा ही महत्वाच्या आक्कांना बघायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला कळलं की अजून डॉक्टरच आले नाहीत. तिथले जे डॉक्टर हार्ट सर्जन होते, डॉक्टर पाटील, तेच प्रसादचेही ओळखीचे होते आणि ते कालच अमेरिकेला गेलेत. तिथले असिस्टंट डॉक्टर बरेच प्रयत्न करत होते. पण आक्का म्हणाव्या तितक्या प्रतिसाद देत नव्हत्या. प्रसाद ला आता काय करावं ते सुचत नव्हतं. त्याने अजून ओळखीच्या एक-दोन डॉक्टर मित्रांना बोलावण्याचा प्रयत्न केला पण ते ही 'आऊट ऑफ टाऊन' होते. तो बराच वेळ हताश बसला होता. तिथेच समोर एक गणपती बाप्पाची सुरेख आखीव-रेखीव आणि लक्ष वेधून घेईल अशी सुबक मूर्ती होती. बाप्पाचे डोळे तर जणू प्रसादला जवळ येण्यासाठी खुणावतच होते. तो उठून तिकडे गेला. आणि त्याने नकळतपणे हात जोडले. “माझ्या वडिलांची तुझ्यावर खूप श्रध्दा.. आई तर कित्येक वर्ष न चुकता तुझं सगळं मनापासून करतेय. मी मानत नसलो म्हणून काय झालं, तू निदान तिच्यासाठी तरी काहीतरी कर. तुला जशी तुझी आई अत्यंत प्रिय आहे तशीच माझी आई माझा जीव की प्राण आहे. तिला काही झालं तर मला सहन होणार नाही. आई म्हणते ते आज कुठेतरी पटतंय मला. ती नेहमी म्हणते, देवाची लीला अगाध असते. बघ ना मी डॉक्टर असूनही आज तिच्यासाठी काहीच करू शकत नाही. आणि तिच्या उपचारासाठी पण इथे कुणी हजर नाही. हा तुझाच खेळ आहे ना? मला हरभऱ्याच्या झाडावरून खाली आणण्यासाठी हे सगळं करतोयस ना? मग नको बघू आता परीक्षा. मी आज तुझं सकारात्मक अस्तित्व मान्य करतो पण माझ्या आईला बरं कर. तिच्यावर उपचार होऊदेत आणि ती सुखरूप घरी येऊदेत.” अशी त्याने मनोमन देवाला प्रार्थना केली. आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि चमत्कार व्हावा तशी नर्स धावत आली. “पाटील डॉक्टरांच्या ओळखीचे हार्ट सर्जन मुंबईहून एका सेमिनार साठी आले होते ते इथे आले आहेत. आता ते तुमच्या आईवर उपचार करतील. हा फॉर्म तेवढा भरून द्या.” हे ऐकून प्रसाद खूप खुश झाला. मग भरभर सगळं घडत गेलं. आणि नंतर आठवड्याभराने आक्का घरी आल्या. प्रसाद त्यांची खूप मनापासून काळजी घेत होता. महिन्याभराने एका रविवारी सकाळी आक्कांनी बसून बसून यादी करायला घेतली. तेवढ्यात प्रसाद आला. “काय करतेस आई? नाश्ता झाला का?” त्यावर आक्का म्हणाल्या, “काही नाही रे. यादी करतेय. १५ दिवसांवर गणपती बाप्पा आले की. तयारी करायला हवी ना? दादाला बोलवायला हवं. तोच आणतो न आपल्याकडे बाप्पा. आणि दुसऱ्या दिवशी प्राणप्रतिष्ठा पण तोच करतो.” असं म्हणाल्यावर लगेचच प्रसाद म्हणाला, “ मामाला येऊदेत नेहमीप्रमाणे. पण यावर्षीपासून दर वर्षी मीच आणणार बाप्पाला आणि मीच करणार प्राणप्रतिष्ठा. त्याला नको सांगू.” यावर आक्का चकित झाल्या. त्यावर मंद हसून प्रसाद म्हणाला, "एवढं काही तोंड उघडायची गरज नाही.आई, अगं बाबा गेले तेव्हा मला एवढं कळत नव्हतं. आणि तेव्हा तुझा खंबीर आधार होता मला. तुला काही होऊ शकतं हे मन मान्य करतच नव्हतं. आणि मी माझाच टेंभा मिरवत बसलो होतो. पण तू आणि बाबा काय सांगायचात ते तुझ्या आजारपणात मला पुरेपूर कळलं आहे. आपल्या आजूबाजूला खरंच एक सकारात्मक ऊर्जा असते जी आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असते. तिचा मान राखायलाच हवा. तिच्यापुढे नतमस्तक व्हायलाच हवं. शेवटी तो एक सिनेमातला हिरो म्हणतो ना ते खरं आहे. “अगर किसी चीज को बडी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है.” आणि कायनात म्हणजेच तुझा सॉरी! 'आपला' बाप्पा. हो ना?” असं म्हणून तो आक्कांना आनंदाने मिठी मारतो. त्यावर आक्का नुसतंच हो म्हणतात.. आणि त्याच्या केसातून हात फिरवत म्हणतात, “गुणी माझं बाळ ते. बाप्पाने शेवटी सद् बुध्दी दिली म्हणायची तुझ्यासारख्या नास्तिकाला..” असं म्हणून दोघे खो-खो हसतात आणि आक्का मनानेच बाप्पाला भावपूर्ण हात जोडतात आणि मनात म्हणतात,
ll तूच कर्ता आणि करविता,
शरण तुला भगवंता,
शरण तुला भगवंता ll
ll शुभम् भवतु ll
✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे.
(पोस्ट शेअर करावयाची असल्यास कृपया नावासकट करावी ही विनंती..🙏🏻 फोटो गुगलवरून साभार😊)