30/07/2026
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमधील E20 (20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणावरून सोशल मीडियावर होत असलेल्या आरोपांविरोधात बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयात किंवा त्याच्या अंमलबजावणीत त्यांचा कोणताही सहभाग नाही.
गडकरी यांनी न्यायालयात सांगितले की, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (EBP) आणि E20 धोरण हे पूर्णपणे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारित येते. रस्ते वाहतूक मंत्री म्हणून ते वाहनांशी संबंधित नियम आणि मानके पाहतात, मात्र इंधन धोरण ठरवण्याचा अधिकार त्यांच्या मंत्रालयाकडे नाही.
सोशल मीडियावरील आरोपांवर कारवाईची मागणी
याचिकेत गडकरी यांनी आरोप केला आहे की, सोशल मीडियावर काही व्यक्ती आणि प्लॅटफॉर्म त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाचा वापर करून डीपफेक व्हिडिओ, बनावट पोस्ट आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करत आहेत. या पोस्टमध्ये E20 धोरणातून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला आर्थिक फायदा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे, जो पूर्णपणे खोटा असल्याचे त्यांनी न्यायालयात नमूद केले.