24/10/2024
बारा साली, म्हणजे आता बारा वर्षे झाली मी ही कथा लिहिली. ही कथा काल्पनिक आहे का खरी, हे मी ठामपणे सांगू शकत नाही, पण काही प्रमाणात खरी असावी , माझ्या एका मित्राच्या आयुष्यात घडलेली. तो ते गाणेही गाऊन दाखवत असे.. त्याचा आणि माझा संपर्क तुटला तो तुटलाच. आता तो कुठे आहे ते मला माहीत नाही, तो जिवंत आहे का नाही हेही मला माहीत नाही, कारण तो माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा होत १५ वर्षांनी तरी.
तरपत हूं जैसे जलबिन मीन...
..नांदेडचा उन्हाळा ! म्हणजे रात्री झोपेचा प्रश्नच नाही. पहाटेच थोडा वेळ झोप येत असे तेवढीच. अशा ठिकाणी माझी बदली झाल्यावर आणि हातात १९७८ साली महिन्याला देन तीन हजार रुपये हातात खुळखळत असल्यावर उन्हाळ्यात संध्याकाळी काय होत असणार हे मी सांगायला नको. पण ते जाऊदेत अगोदर नांदेडला कसा पोहोचलो ते सांगायला पाहिजे.
१९७६ साली ग्रॅज्युएट झाल्यावर चार आकडी पगारावरच नोकरी करणार या हट्टापायी एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी पत्करली आणि त्यांनी नांदेड येथे जावे लागेल हे सांगितले. म्हटले ठीक आहे. काय फरक पडतो ? एकटा जीव सदाशीव. त्या काळी हा पगार खूप म्हणजे खूपच होता. एक चांगली जागा गावाबाहेर भाड्य़ाने मिळाली आणि अस्मादिक त्या जागेत १० जानेवारी १९७८ रोजी रहायला गेले. १ ते ९ माझा मुक्काम हॉटेलमधेच होता. त्या काळात आमच्या सारख्यांचा आसरा होता तेच हॉटेल ‘‘परिवार हॉटेल’’. नावात होते परिवार पण कुठलाही परिवार त्या हॉटेलात येत नसे कारण आमच्यासारखे लोक. ज्यांच्याकडे पैसे असत त्या लोकांचा परिवार मात्र रोज संध्याकाळी येथे मद्य प्राशन करण्यास, (बियर) गप्पा मारायला जमत. घर सोडून आलेल्यांना संध्याकाळ कशी खायला उठते हे आपल्याला घर सोडल्याशिवाय समजणार नाही. दिवसभर काम करून दमूनभागून घरी आल्यावर जेवणासाठी बाहेर पडायलाच लागायचे मग थोडे अगोदर जाऊन करमणूकही करून घ्यायची असा सर्व ब्रह्मचार्यांचा पायंडाच पडला होता. अर्थात काही वैतागलेले विवाहीत, मध्यमवयीन माणसेही आमच्याबरोबर प्यायला बसायची. पण मला वाटते त्यांना आमची तरूण कंपनी आवडायची, बहुधा त्याचे कारण तरूणांमधील चावट गप्पा हे असावे. असो...
आमचा हा जो कंपू जमला होता त्यात एकंदरीत ८.५ लोक होते. करंदीकर, आठवले हे दोन कोके, भोसले, जाधव हे दोन देशमूख, मी व देवकर हे दोन कोकणी आणि उरलेल्यात होता एक सलीम खान जो उत्कृष्ट मराठी भावगीते म्हणत असे आणि एक होता पानसे. सलीम खान प्रोहिबिशन खात्यात कामाला होता त्यामुळे आमच्या दृष्टीने साला साहेबच होता. पण आमच्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय होता संगीत....कुठलेही संगीत. इंग्रजी, मराठी, हिंदी, शास्त्रीय, उपशास्त्रीय...आम्हाला कशाचेही वावडे नव्हते. इन फॅक्ट दोन कोके, सलीम खान, मी आणि पानसे यांना संगीताची उत्तम जाण होती. वेळात वेळ काढून आम्ही आंबेजोगाईला संगीत महोत्सवाला जायचोच. अर्थात त्या काळी त्याचे स्वरूप फार खाजगी होते पण सलीम मियॉ असल्यावर काहीच अडचण नव्हती.....हा अर्धा मेंबर होता तो होता उद्योगपती अग्रवाल-आमचा डिस्ट्रिब्युटर. तो अर्धा कारण तो कधीकधीच असायचा...
त्या काळी माझ्याकडे तीन खोल्यांचा एक छोटा बंगला होता आणि एक दिवस त्या घराचे मालक जेव्हा माझ्याकडे भाडे गोळा करायला आले तेव्हा त्या बंगल्याची हालत बघून गाडगीळ काकांनी कपाळाला आठ्या घातल्या आणि म्हणाले
“अहो सावंत, तुम्हाला घर भाड्याने दिले आहे याचा अर्थ विकत दिलेले नाही. काय अवस्था केली आहे तुम्ही माझ्या बंगल्याची. साधी साफसफाई करता येत नाही तुम्हाला, कमाल आहे.”
“काका, अहो मला वेळच मिळत नाही. संध्याकाळी घरी आल्यावर जेवायला बाहेर जावे लागते आणि घरही खायला ऊठते, म्हणून बाहेर जातो. सकाळी लवकर उठून कामाला जावे लागते. केव्हा साफ करू हे घर ! सांगा तुम्हीच.
“मग एखादी बाई का नाही ठेवत....... डोळे मिचकावत काकांनी वाक्य पूर्ण केले.... साफसफाईसाठी !”
“नको रे बाबा ! आईने सक्त ताकीद दिली आहे असले काही करायचे नाही म्हणून .....”
“बरं ! मी बोलतो वहिनींशी” काका.
काका गाडगीळ आणि बाबा सावंत कॉलेजपासून मित्र होते.
दुसर्या दिवशी सकाळीच काका एका बाईला घेऊन हजर झाले.
“काका आत्ता मी चाललोय उदगीरला. आपल्याला नंतर नाही का बोलता येणार ? मला अजून गाडीत पेट्रोल भरायचे आहे” मी म्हणालो.
“नाही तुझ्याशी काही बोलायचेच नाही मला. मी वहिनींशी सगळे बोललो आहे. या ताराबाई. आमच्या सौंच्या चांगल्या ओळखीच्या आहेत. घरंदाज आहेत. उद्यापासून या तुझ्याकडे कामाला येतील. पैशाचे काय ते तू त्यांच्याशीच ठरव.. या स्वयंपाकही करतील अर्थात तुला पाहिजे असेल तर. चल निघ तू आता. उशीर होईल. मी सांगतो यांना कामाचे स्वरूप”
“ठीक आहे. मी उद्या यांच्याशी बोलतो” असे म्हणून मी गाडीला चावी लावली आणि फिरवली. फिआटचा फाटका आवाज करत त्या गाडीने जागा सोडली आणि एक डौलदार वळण घेत ती रस्त्याला लागली.
त्या रात्री नेहमीप्रमाणे परिवारमध्ये बरीच बीअर पिऊन झाल्यामुळे नेहमीप्रमाणे झोपायला उशीर झालाच. सकाळी उठतो तो मला दुसर्याच्याच घरात असल्यासारखे वाटायला लागले. मुख्य म्हणजे उशाशी असणारे सिगरेटचे रक्षापात्र कमालीच्या पलिकडे स्वच्छ होते. अजून मला बरेच धक्के बसायचे होते..... मी डोळे चोळत होतो, तेवढ्यात हाक आली “ साहेब उठा आता. चा बी तयार होईल हितक्यात”
हंऽऽऽऽ आत्ता डोक्यात प्रकाश पडला. ताराबाई आलेल्या दिसतात.
सकाळच्या ब्रेक्फास्टला ताराबाईंची गाठ पडली. मी तसा खूष होतो... कारण ब्रेकफास्टला त्यांनी ब्रेड ऑमलेट आणि तेही टोमॅटो घालून केले होते. बर्याच दिवसांनी घरीच वेळेवर ब्रेकफास्ट मिळाल्यामुळे माझी तब्येत खूष होती. त्या मागतील ते पैसे द्यायला मला तरी काहीच प्रश्न नव्हता.
ताराबाई साळूंके ! वय साधारणत: असेल ५० ते ५५. बुटक्या, हाडकुळ्या, बारीक चणीच्या, गोर्यापान. कपाळावर मोठे लालभडक कुंकू. विरलेल्या नववारीचा कपाळावर पदर अगदी व्यवस्थीत. भूर्या रंगाच्या पापण्या, पिंगट, मिचमिचे, डोळे, पण चेहर्याला शोभणारे. खरे तर त्या सुंदरच म्हणायच्या. वयाचा अंदाजही लागणे कठीण पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि नंतर माझ्या अनेक मित्रांच्या लक्षातही आली ती म्हणजे बघताच त्यांचे सौंदर्य डोळ्यात भरायच्या ऐवजी त्यांचे सोज्वळ स्वरूप डोळ्यातून मनात उतरायचे आणि सगळ्यांना स्वत:च्या आईची, आजीची आठवण यायची. ..
क्रमशः
- जयंत कुलकर्णी