01/09/2026
स्वप्नांचा बाजार आणि फुटलेले पेपर -
महाराष्ट्रात सध्या स्पर्धा परीक्षेचे वातावरण पाहिले, तर एका वेगळ्याच वास्तवाचे दर्शन होतांना दिसत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न घेऊन शहरांकडे येतात. कुणी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये येऊन अभ्यासिका गाठतो, तर कुणी आपल्या गावात राहून ऑनलाइन माध्यमातून तयारी करतो. हातात पुस्तकं, टेस्ट सिरीज, डोक्यात अभ्यासाचे वेळापत्रक आणि डोळ्यांसमोर सरकारी नोकरीचे स्वप्न, अशी लाखो तरुणांची रोजची धडपड सुरू आहे. मात्र या स्वप्नामागे फक्त विद्यार्थ्याची मेहनत नसते; त्याच्या कुटुंबाची आर्थिक गुंतवणूक, भावनिक आधार आणि त्या कुटुंबाच्या भविष्याची अपेक्षा जोडलेली असते.
एका विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला की त्याचा खर्च केवळ क्लासच्या फीपुरता मर्यादित राहत नाही. क्लासेस, टेस्ट सिरीज, पुस्तके, अभ्यासिका, हॉस्टेल किंवा रूम, मेस, प्रवास, इंटरनेट, परीक्षा अर्ज आणि इतर अनेक छोट्या-मोठ्या खर्चांची बेरीज केली तर काही वर्षांच्या तयारीत मोठी रक्कम खर्च होते. मात्र या खर्चापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट विद्यार्थी देत असतो तो म्हणजे त्याचा वेळ. दोन-तीन वर्षे, कधी त्याहून अधिक काळ तो एका संधीसाठी स्वतःला तयार करत असतो. त्याच काळात त्याचे अनेक मित्र नोकरीला लागतात, काही जण व्यवसाय सुरू करतात, काही उच्च शिक्षण घेतात; पण हा विद्यार्थी मात्र पुन्हा पुस्तक उघडतो, कारण त्याला विश्वास असतो की मेहनतीच्या जोरावर एक दिवस त्याची निवड होईल.
याच स्वप्नाभोवती महाराष्ट्रात मोठी अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. स्पर्धा परीक्षांचे क्लासेस, ऑनलाइन कोर्सेस, टेस्ट सिरीज, अभ्यासिका, हॉस्टेल, मेस, पुस्तकांची दुकाने, डिजिटल कंटेंट आणि विविध मार्गदर्शन केंद्रे यामुळे हजारो लोकांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढते, तशी या संपूर्ण व्यवस्थेची व्याप्तीही वाढत जाते. यात गैर काही नाही. शिक्षण आणि रोजगाराभोवती अर्थव्यवस्था निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या विद्यार्थ्याची परीक्षा जर वारंवार अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडत असेल, तर या व्यवस्थेकडे केवळ बाजार म्हणून पाहणे अपुरे ठरते.
कारण पेपर फुटतो तेव्हा केवळ प्रश्नपत्रिका फुटत नाही; विद्यार्थ्याच्या मेहनतीवरील विश्वासाला तडा जातो.
एखाद्या परीक्षेचा गैरप्रकारामुळे फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय झाला, तर कागदावर ती एक प्रशासकीय प्रक्रिया असते. परंतु विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्याचा परिणाम खूप मोठा असतो. त्याने त्या परीक्षेसाठी केलेला अनेक महिन्यांचा अभ्यास पुन्हा त्याच परीक्षेसाठी वापरावा लागतो. पुन्हा परीक्षा केंद्रावर जावे लागते, पुन्हा प्रवास करावा लागतो, पुन्हा खर्च करावा लागतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुन्हा मानसिक तयारी करावी लागते. त्याचवेळी पुढील परीक्षांचे वेळापत्रक, इतर भरतींच्या संधी आणि वयोमर्यादेचे गणित बदलत जाते. त्यामुळे परीक्षा रद्द होणे किंवा प्रक्रिया लांबणे हा केवळ प्रशासनाच्या फाईलवरील एक निर्णय नसतो; त्याची किंमत विद्यार्थी आपल्या आयुष्यातील वेळ आणि संधी देऊन भरत असतो.
इथेच या प्रश्नाचे गांभीर्य वाढते. स्पर्धा परीक्षेत अपयश आले तर त्याची कारणे विद्यार्थी स्वतः शोधू शकतो. अभ्यास कमी पडला असेल, काही विषय राहिले असतील, वेळेचे नियोजन चुकले असेल किंवा परीक्षेची रणनीती चुकीची ठरली असेल आणि कुठेतरी मी कमी पडलो असेल असं समजून तो पुढे जाऊ शकतो किंवा पुढच्या प्रयत्नात तो स्वतःमध्ये बदल करू शकतो. पण परीक्षा व्यवस्थाच निष्पक्ष नाही असे त्याला वाटू लागले, तर सुधारणा करण्यासाठी त्याच्या हातात काय उरते? आणि त्यातून जर त्याच्या मनात "मी प्रामाणिकपणे एवढा अभ्यास करून काय मिळवणार?" हा प्रश्न निर्माण झाला, तर तो प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याचा राहत नाही. तो संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनतो.
विशेषतः ग्रामीण आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीचे महत्त्व समजून घेणे आवश्यक आहे. सरकारी नोकरी म्हणजे फक्त मासिक पगार नाही. ती अनेक कुटुंबांसाठी आर्थिक स्थैर्य, सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबाच्या परिस्थितीत सुधारणा आणि पुढील पिढीसाठी चांगल्या संधी निर्माण करण्याचा मार्ग असतो. म्हणूनच एका विद्यार्थ्याची स्पर्धा परीक्षा ही अनेकदा संपूर्ण कुटुंबाची परीक्षा असते. मुलगा किंवा मुलगी अभ्यास करत असताना घरातील पालक आपल्या परीने त्याला वेळ, पैसा आणि आधार देत असतात. त्यामुळे भरती प्रक्रियेत झालेला अनावश्यक विलंब किंवा गैरप्रकाराचा परिणाम त्या कुटुंबाच्या नियोजनावरही होतो.
यातील आणखी एक दुर्लक्षित मुद्दा म्हणजे वय. परीक्षा आणि भरती प्रक्रिया लांबली की कॅलेंडर थांबत नाही. विद्यार्थ्याचे वय मात्र वाढत राहते. एखाद्या उमेदवारासाठी पुढील संधी उपलब्ध असतीलच असे नाही. काही भरतींसाठी असलेली वयोमर्यादा, प्रयत्नांची मर्यादा किंवा पात्रतेच्या अटी त्याच्या पुढील संधींवर परिणाम करू शकतात. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेतील प्रत्येक अनावश्यक विलंब हा विद्यार्थ्याच्या करिअरच्या टाइमलाइनवर परिणाम करू शकतो. प्रशासनासाठी काही महिन्यांचा विलंब असू शकतो; पण विद्यार्थ्यासाठी तो कदाचित एका महत्त्वाच्या संधीचा फरक ठरू शकतो.
म्हणून पेपरफुटीचा प्रश्न केवळ "पेपर कोणी फोडला?" एवढ्यावर थांबता कामा नये. खरा प्रश्न हा आहे की प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ती विद्यार्थ्याच्या हातात पोहोचेपर्यंत संपूर्ण साखळी किती सुरक्षित आहे? प्रश्नपत्रिका तयार करणारी यंत्रणा, डिजिटल माहितीची सुरक्षा, डेटा, मुद्रण, वाहतूक, स्टोरेज, परीक्षा केंद्रांवरील प्रक्रिया आणि संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी या प्रत्येक टप्प्याचे स्वतंत्र ऑडिट आणि उत्तरदायित्व निश्चित आहे का? आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुरक्षा वाढवण्यासाठी उपलब्ध साधनांचा पुरेपूर वापर होत आहे का? आणि एखादा गैरप्रकार घडल्यास त्याची जबाबदारी फक्त काही व्यक्तींवर टाकून व्यवस्था पुन्हा पूर्ववत केली जाते की त्यातून संपूर्ण प्रणालीत सुधारणा केली जाते?
परीक्षा रद्द करणे कधी कधी अपरिहार्य असू शकते. पण परीक्षा रद्द करावी लागू नये अशी व्यवस्था तयार करणे हा त्यापेक्षा मोठा प्रश्न आहे. कारण परीक्षा रद्द झाल्यानंतर फेरपरीक्षा घेणे हा उपाय असला, तरी विद्यार्थ्याने गमावलेला वेळ परत मिळत नाही. त्याने केलेला मानसिक संघर्ष परत भरून निघत नाही. कुटुंबाने केलेला अतिरिक्त खर्च परत मिळत नाही आणि काही वेळा गमावलेली संधीही परत येत नाही. आणि एकूणच त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची उधळपट्टी होऊ लागते.
आज महाराष्ट्रातील तरुणांना स्पर्धा परीक्षांपासून पळून जायचे आहे असे नाही. उलट, आजही असंख्य विद्यार्थी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कठोर परिश्रमाने तयारी करत आहेत. त्यांना विशेष वागणूक नको आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची अनुचित सवलत नको आहे. त्यांना फक्त समान आणि निष्पक्ष संधी हवी आहे. परीक्षा केंद्रात बसताना त्यांच्या मनात एकच विश्वास असायला हवा. समोरचा विद्यार्थी आणि मी समान परिस्थितीत आहोत; माझ्या मेहनतीचे मूल्य आहे आणि माझ्या ज्ञानावर माझे भविष्य ठरेल.
कारण शेवटी स्पर्धा परीक्षा ही केवळ सरकारी नोकरी मिळवण्याची प्रक्रिया नाही. ती लाखो तरुणांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीशी जोडलेली आहे. आज अभ्यासिकेत बसलेला विद्यार्थी उद्या प्रशासनाचा भाग होऊ शकतो. आज पुस्तकांमध्ये डोके खुपसून बसलेली तरुणी उद्या एखाद्या जिल्ह्याच्या प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे त्यांच्या मेहनतीकडे केवळ एका परीक्षेच्या आकडेवारीतून पाहणे योग्य ठरणार नाही.
निवड न होणे हा स्पर्धेचा भाग आहे; पण अन्यायामुळे संधी गमावणे हा स्पर्धेचा भाग असू नये.
म्हणूनच पेपरफुटीविरोधात कठोर कारवाई जितकी आवश्यक आहे, तितकीच आवश्यक आहे ती संपूर्ण परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता पुन्हा मजबूत करणे. परीक्षा वेळेत घेणे, प्रक्रिया पारदर्शक ठेवणे, प्रश्नपत्रिकेची सुरक्षा सुनिश्चित करणे, निकाल वेळेत जाहीर करणे, भरती प्रक्रिया अनावश्यकपणे लांबू न देणे आणि एखादा गैरप्रकार घडल्यास जबाबदारी निश्चित करून त्यातून प्रणालीगत सुधारणा करणे या सर्व गोष्टी एकाच वेळी आवश्यक आहेत.
कारण आज प्रश्न केवळ फुटलेल्या पेपरचा नाही.
प्रश्न त्या पेपरच्या आधी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचा आहे.
प्रश्न त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचा आहे.
प्रश्न त्याने गमावलेल्या वेळेचा आहे.
प्रश्न त्याच्या पुढील संधींचा आहे.
प्रश्न त्या विद्यार्थिनीच्या लग्नाचा आहे.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रश्न आहे व्यवस्थेवरील त्याच्या विश्वासाचा.
म्हणून आता आपण फक्त एवढेच विचारायचे का की, पेपर कोणी फोडला?
की आपण त्यापेक्षा मोठा प्रश्न विचारायचा?
अशी व्यवस्था आपण का तयार केली, ज्यात एका फुटलेल्या पेपरची किंमत हजारो विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील महिने आणि वर्षे देऊन मोजावी लागते?
आपण फक्त फुटलेले पेपर थांबवणार आहोत, की विद्यार्थ्यांची तुटलेली स्वप्नेही जोडणार आहोत?
हे सगळं भयंकर आहे, आपण विचार करायला हवा!
-अविनाश जाधव
९३५९००३७०७
#स्पर्धापरीक्षा #पेपरफुटी #विद्यार्थी #महाराष्ट्र #सरकारीनोकरी #शिक्षण #विद्यार्थी