10/06/2026
उदय सामंत-तटकरे आमनेसामने; रायगडच्या पालकमंत्रीपदावरून पुन्हा वाद
रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची दुखरी नस आहे. जवळपास दीड वर्ष झाले अजून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेला नाही. यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध कसे आहेत, हे स्पष्ट होते.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार विरुद्ध सुनील तटकरे असा संघर्ष आहे. अशातच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांना बिनविरोध निवडणूक दिल्यामुळे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, यावरून अजूनही एकमत होत नसल्याचे चित्र असल्यामुळे पुन्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचे दिसत आहे.
विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) महायुतीत पुणे आणि कोकण अशा दोन जागा मिळाल्या होता. त्यातील कोकणमधील जागेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अनिकेत सुनील तटकरे यांनी 1 जून रोजी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजपकडून मंत्री नितेश राणे, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत आणि आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. शिवसेनेचे सर्वाधिक मतदार असताना आणि तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस असताना अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळवून दिली. एवढेच नाही तर शिवसेनेचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकार्याची हमी मिळवली. यातून तटकरे यांचे दिल्ली कनेक्शन किती तगडे आहे, याची रायगडसह राज्यात चर्चा सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला म्हणजे भरत गोगावले यांना मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. उदय सामंत यांनी ही मागणी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजून दावा सोडायला तयार नाही, असे चित्र दिसत आहे. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना, भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत हे स्पष्ट केले. तसेच अनिकेत तटकरे यांची विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाली आहे. शिवाय त्यावेळी झालेल्या चर्चा, दिलेले शब्द लक्षात घेऊन गोगावले यांना पालकमंत्री बनवावे, अशी मागणी केली. सामंत यांच्या या वक्तव्यातून विधान परिषद निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देताना पालकमंत्रीपदाबाबतही चर्चा झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
या संदर्भात माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना विचारले असता, दोन दिवस याच प्रश्नांना उत्तर देत असल्याचे त्यांनी त्रासिक चेहऱ्याने सांगितले. तसेच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही स्पष्ट केले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यातून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला नसल्याचे स्पष्ट होत आहे. डिसेंबर 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर 18 जानेवारी 2025 रोजी पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात रायगडमध्ये आदिती तटकरे यांची नियुक्ती झाली होती. मात्र, त्याच रात्री आक्रमक झालेल्या शिवसेना नेते भरत गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन करून महामार्ग रोखला. या उग्र आंदोलनानंतर दुसऱ्याच दिवशी (19 जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली. तेव्हापासून या पदाचा निर्णय झालेला नाही आणि रायगडमध्ये अनेकदा शिवसेना आमदार विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक चकमक होत असते.