20/07/2025
गोंधळी समाजाच्या ज्येष्ठ नेते विश्वासराव दोरवेकर यांच्यावर भ्याड हल्ला – फक्त निषेध नव्हे, आता एकत्र येण्याची गरज!
पुणे, 10-7-2025
गोंधळी समाजाचे ज्येष्ठ नेते, सत्यशोधक समाज भूषण पुरस्काराचे मानकरी, भटका विमुक्त समाजाचे मार्गदर्शक, तसेच प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट श्री विश्वासराव दोरवेकर यांच्यावर काल रात्री शनिवार वाडा परिसरात भ्याड आणि पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला. रात्री ८ वाजताच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला.
या घटनेमुळे गोंधळी समाजासह संपूर्ण भटक्या विमुक्त समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, पुण्यातील लघु व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत दोरवेकर कुटुंबातील दोन सदस्यांनी भाग घेतला होता. जरी त्यांचा पराभव झाला तरी त्यांना भरघोस मते मिळाली होती. हाच राग मनात धरून आणि पुढील राजकीय वाढ रोखण्यासाठी हे कटकारस्थान रचले गेले असावे.
दोन हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या हल्ल्याचे मूळ सूत्रधार अजूनही पडद्यामागे असून त्यांच्या विरोधात ठोस कारवाई होणे आवश्यक आहे.
"केवळ तीव्र निषेध पुरेसा नाही, आता भटक्या समाजाने एकत्र येऊन आवाज उठवण्याची वेळ आली आहे!"
श्री. विश्वासराव दोरवेकर हे केवळ नेता नाहीत, तर शनिवार वाडा परिसरातील लघु व्यावसायिकांचे खरे हितचिंतक आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानामुळे अनेकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे अशा समाजहितासाठी झटणाऱ्या नेतृत्वावर हल्ला म्हणजे संपूर्ण भटक्या समाजावर हल्ला होय.
आम्ही, आदर्श गोंधळी समाज विकास मंडळ – महाराष्ट्र राज्य, या भ्याड हल्ल्याचा केवळ निषेध करीत नाही, तर विश्वासराव दोरवेकर यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत. आम्ही शासनाकडे मागणी करतो की या हल्ल्यामागील खरे सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भटक्या समाजाच्या स्वाभिमानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी एकवटूया!
Facebook
Sonu Sk
Devendra Fadnavis