23/06/2025
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना लवकरचं मिळणार १ रुपयात २० लाखाचा अपघात विमा; चिन्मय कुलकर्णींचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन
सातारा : राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १ रुपयात २० लाख रुपयांचा अपघात विमा मिळावा अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यावर नितीन गडकरी यांनी प्रवाशांबाबत चांगली संकल्पना असून यावर लवकरचं सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते अपघात कमी करण्यासाठी घेत असलेल्या विविध उपाययोजना उल्लेखनीय आहेत. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना रेल्वेप्रमाणे नाममात्र १ रुपयात २० लाख रुपयांपर्यंतचा अपघात विम्याचे संरक्षण आपल्या मंत्रालयामार्फत देण्यात यावे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवास करताना ही सुविधा केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. याचं तत्वावर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमा संरक्षणाची सुविधा अत्यावश्यक आहे. त्यासाठी लागणारे पैसे आपण टोलच्या माध्यमातून आपण वसुल करावेत. जेवढा कालावधी संबंधित वाहन महामार्गावरुन प्रवास करेल तेवढ्या कालावधीचा विमा त्या प्रवाशाला मिळेल. रोज लाखो नागरिक खासगी वाहने, बस, ट्रक आणि इतर साधनांनी महामार्गांचा वापर करतात. रस्ते अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. अपघातामध्ये मृत्यू अथवा गंभीर जखमी झाल्यास कुटुंबियांची आर्थिक व मानसिक परिस्थिती ढासळते. आपण सरकारतर्फे १ रुपयात हे विमा संरक्षण उपलब्ध करून दिले तर प्रवाशांसाठी अतिशय लोकहिताची व दूरगामी परिणाम करणारी ही योजना ठरेल.यावेळी भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके, शैलेश संकपाळ,सोशल मीडिया संयोजक प्रथमेश इनामदार उपस्थित होते.