09/08/2026
ऑगस्ट क्रांती स्तंभ अभिवादनाचा लोकप्रतिनिधीना विसर
सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्हा क्रांतीकारकांचा म्हणून ओळखला जातो. क्रांतीकारकांचा जाज्वल्य इतिहास चिरंतन ठेवण्यासाठी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभ उभारण्यात आला आहे. दि. ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून राज्यभरात साजरा केला जातो. मात्र साताऱ्यात ऑगस्ट क्रांती स्तंभाला लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना अभिवादन करण्याचा विसर पडला याचा जाहीर निषेध करत अवघ्या १० सामाजिक कार्यकर्त्यांनी स्तंभ परिसराची स्वच्छता करून अभिवादन केले.
महाराष्ट्रात राजकारण्यांना आणि सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना उठता बसता क्रांतीकारकांचे नाव घ्यावे लागते. मात्र, त्यातील कोणालाही या क्रांती दिनाबद्दल सोयरसुतक नसल्याचे रविवार दि. ८ ऑगस्ट क्रांती दिनी उघड झाले. जिल्हयात चार मंत्री, डझनभर आमदार, शेकडो लोकप्रतिनिधी आणि ५० हून अधिक शासकीय विभागाचे प्रमुख असणाऱ्या अधिकाऱ्यांची उदासीनता या दिवशी चव्हाट्यावर आली.रविवार दि.९ रोजी सकाळी हजेरी माळावर ऑगस्ट क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यासाठी काही कार्यकर्ते गेले असता मुख्य गेटला कुलूप होते. याबाबत फोनाफोनी केल्यानंतर १० वाजता गेट उघडले. स्तभांभोवती अस्वच्छता, गवत, झुडपे दिसताच कार्यकर्त्यांनी थेट स्वच्छता केली. नंतर अभिवादन करून घोषणा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे ,भरत राऊळ ,शिवाजी जाधव ,गणेश अहिवळे,महारुद्र तिकुंडे,गुलाब बनसोडे ,विजय जाधव,कैलास कुंभार ,जयवंत कांबळेप्रज्योत तिकुंडे ,सागर जगदाळे ,मोहन शिंदे ,हणमंत शिंदे एवढे उपस्थित होते.
यावेळी सुशांत मोरे म्हणाले, क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात जन्माला आलेल्या प्रत्येकाने याठिकाणी अभिवादन करण्यासाठी यायला हवे होते. मात्र मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, जिल्ह्यातील मुख्य शासकीय अधिकाऱ्यांना या दिवशी अभिवादन केलेच पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांना क्रांतीकारकांच्या बद्दल शब्द उच्चारण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगून सर्वांचा जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी महारुद्र तिकुंडे, शिवाजी जाधव, गणेश अहिवळे, कैलास कुंभार, जयवंत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.