30/03/2025
शिर्डीत साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनासाठी वर्षभर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, बऱ्याचदा दर्शन घेण्यासाठी येत असताना किंवा दर्शन घेऊन परतताना भाविकांसोबत छोट्या मोठ्या दुर्घटना घडतात. या पार्श्वभूमीवर साई संस्थानने (Sai Sansthan) मोठा निर्णय घेतला आहे. साईभक्तांना आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने घेतलाय. मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे.
काय म्हणाले साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी?
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी म्हटले आहे की, जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येणार आहे, त्याच्यासाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यात अट अशी आहे की, जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येईल, त्यांनी दर्शनाला निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानची ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे भक्त साईबाबांच्या दर्शनासाठीच येत आहे, याची ओळख पटण्यास मदत होईल. जे फक्त नोंदणी करून येतील, त्यांचा विमा उतरवला जाणार आहे. सर्व साई भक्तांना यानिमित्त मी विनंती करत आहे की, आपण निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर उभारली गुढी
दरम्यान, साईबाबांच्या शिर्डीतही गुढीपाडवा अर्थात मराठी नववर्षाचा उत्साह दिसून आला. साई मंदिराच्या सुवर्ण कळसावर पारंपारिक पद्धतीने गुढी उभारण्यात आलीये. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून ही गुढी उभारली. आज मराठी नववर्षाचे स्वागतही मोठ्या उत्साहात पार पडत असून साई भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीये. आज साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रूपयांच्या आभूषणांसह साखरेच्या गाठीची माळ परिधान करण्यात आलीये. तर साई मंदिर आकर्षक फुलांनी सजले आहे.
Sai baba sansthan shirdi" .