14/09/2025
🔥 “वडार वेदना” 🔥
पाटा-वरवंटा, खलबत्ता घडवला,
घामाचा थेंब दगडांत मुरवला.
विहिरी-तलाव, पाट-चार्या खोदल्या,
घणाघाती वारांनी पर्वत फोडल्या.
खडी-भुगा करून रस्ते पसरले,
टोलेजंग किल्ले उभे आम्ही केले.
शिवरायांना जाण्यास दगडी पायऱ्या घडवल्या,
आमच्या जीवावर साम्राज्य उभे केलेल्या!
येशी बांधल्या गाव रक्षणासाठी,
लेण्या कोरल्या कला-अध्यात्मासाठी.
मंदिर, मस्जिद, मुर्त्या आम्ही घडवले,
पण आमच्याच झोपड्यांना विटा नाही मिळाले.
रेल्वे लाईन टाकल्या, बोगदे खोदले,
खांद्यावर जगाचे ओझे उचलले.
पण सत्तेत आमच्या वाटा नाही,
खरं आरक्षण, शिक्षण सवलती नाही!
इंग्रजांना आम्ही सळो की पळो केले,
त्यासाठी गुन्हेगार ठरवले गेले.
भारत स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ झाला,
पण आम्हाला १९५२ ला ‘विमुक्त’ ठरवला!
सत्ताधाऱ्यांनी प्रथम प्राधान्य द्यायचं होतं,
पण आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं होतं.
शिक्षण-आरोग्याच्या दाराशी न पोचवलं,
विकासाच्या रथातून आम्हाला फेकून दिलं.
दहा शासननिर्णय सहा वर्षे झुलले,
आश्वासनांच्या कागदांत स्वप्नं जळले.
“लवकरच” म्हणता म्हणता पिढ्या गेल्या,
आशेच्या भिंतीवर फक्त राख उरल्या!
🔥 आरक्षण नाही—घर नाही,
🔥 दाखले नाही—वैधता नाही.
🔥 रोजगार नाही—सन्मान नाही,
🔥 मग आमच्या रक्ताची किंमत कोण ठरवणार भला?
उठा रे बंधू-भगिनींनो —क्रांतीची वेळ आली,
छिन्नीच्या टोकाने बेड्या तुटायला हवी.
तुमच्या पावलांचा आवाज रणशिंग ठरो,
हुंकाराने बहिऱ्या भिंतींना भेदो!
“दगड आमचा—कल्ला आमचा,
या राज्याचा पाया आमचा!”
हे वाक्य आकाश फाडेल,
हा हुंकार इतिहास लिहील!
🔥 भीक नको—हक्क हवा,
🔥 अन्याय नव्हे—न्याय हवा!
दगडांतून देव घडवला आम्ही,
आता दगडांतून हक्क घडवू आम्ही!
हा ज्वालामुखी एकदा फुटला,
तर अन्यायाचा किल्ला राख झाला!
हा हुंकारच आमचं संविधान,
हा हुंकारच आमचं शस्त्र महान!
कवी रमेश जेठे सर
संपादक:- "शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा"
🔥🔥🔥🔥🔥