13/10/2025
बिट्टू गेला!
ही बातमीच खरंतर गाव, जंगल अन् अस्सल व्याघ्रप्रेमी असणाऱ्या माझ्या सारख्या सर्वांसाठी दुःखद आहे. आमच्या सिंदेवाही तालुक्यात असा एकही माणुस नसावा ज्याला बिट्टू (T-40) या वाघाबद्दल माहीती नसावी. अबालवृद्धांपासून जंगलांच्या चप्प्याचप्प्याला बिट्टू माहीत होता. काल रात्री गोंदिया-बल्लारशहा ट्रेननं सिंदेवाही रेल्वेस्थानकापासून अगदी दोन किमी अंतरावर कारगाटा जंगल परीसरात त्याला धडक दिल्याने तो मृत पावला.
चांदाफोर्ट टू गोंदिया या रेल्वेमार्गावरील ही साधारणपणे अठरावी घटना आहे. रेल्वेच्या धडकेने असे तरूण-तरणाबांड वाघं मरणं अन् वन व रेल्वे प्रशासनाला त्यावर काहीही ठोस निर्णय करता न येणं म्हणजे नुस्तेच दुर्दैवी आहे.
खरंतर, लहानाचे मोठे झालोत. समज अन् उमज आली तेव्हा आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे पुस्तकातनं वाचलं. परंतू स्वतःच्या डोळ्यांनी चंद्रपूर पहायच्या आधीच आम्ही वाघं पाहीली. ताडोबाशी संबंध आला नसला तरी आमच्या तालुक्यातील वासेरा-पिपर्डा-कळमगांव कडील जंगल हा ताडोबा कोअर-बफर मध्ये असल्याने अन् आम्हीही ब्रम्हपुरी वनविभागाचा ताजा ऑक्सिजन घेऊनच मोठे झाल्यानं वाघ बघण्यात काही कमी नाही. त्यातचं तळोधीपासनं तर इकडे राजोली अन् नवरगांव पासनं तिकडे एकाऱ्यापर्यंत आपली टेरीटरी निर्माण करणारा बिट्टू आमच्या जवळचा!
तसा, बिट्टू हा सिंदेवाही शहराच्या चौफेर फिरतांनाचा अनेकांना आढळायचा. जाटलापूर-सिंदेवाही-आलेवाही-कच्चेपार-गुंजेवाही-तांबेगढी मेंढा हा त्याचा कोअर इलाका! असं आम्ही मानतो. पण बिट्टू ला आलेवाही रेल्वे स्टेशन अन् त्याच्या आसपासचा परीसर जबरदस्त पसंत पडला असावा, म्हणूनच की काय १२ वर्षाचा हा वाघ याच भागात नेहमी दिसायचा. त्याचा राजबिंडा देह, चित्तथरारक डरकाळी, भेदक नजर, शिकारीचा हूनर सारंकाही जबरदस्तचं होते.
माझा मित्र सुरज तर दररोज वनविभागाला पत्ता न लागू देता बिट्टूला नुस्ता भेटायचा. सुरज अन् बिट्टू हा समिकरणचं जुळलेला. सुरज आत्ता या क्षणाला बिट्टू कुठे असावा रे? असा प्रश्न जरी त्याला कुणी केला; तर तो परफेक्ट उत्तरापर्यंत जाईल, एवढं त्याचा बिट्टूप्रेम सर्वश्रुत होता.
आमच्या गावाकडील रस्त्यांनं दुपारी-तिपारी कधिही बाईकस्वारांना, गुराख्यांना, हौशांना अन् शेतकऱ्यांनाही भलामोठा ढोऱ्या वाघं दिसला, की समजावं 'ही ईजे बिट्टू'
खरोखरीच बिट्टू बिट्टू होता. एक व्याघ्रप्रेमी अन् त्याहून बिट्टू लवर म्हणून त्याच्या जाण्याची कल्पनाच करवत नाहीये. एरवी वाघांना दोन ते तिन फिमेल्स असतात. परंतु आमच्या बिट्टूला जवळजवळ तेरा ते चौदा फिमेल्स होत्या. हे किती मजेशीर अन् त्याचा दबदबा दाखविणारे आहे, नाही?
वयाच्या ऐण बारा-तेराव्या वर्षी बिट्टूच रेल्वेच्या धडकेत जाणं, त्याचा भाऊ श्रीनिवासचंही तिकडं ब्रम्हपुरी तालुक्यातील मुडझा गावाकडं शेतशिवारात विद्युत करंट लागून मरणं हे अतिशय दुर्दैवी आहे.
साधारणपणे दोन वर्षे वयानंतर वाघ शिकारीला सुरवात करतो परंतू अवघ्या दिडच वर्षात शिकारीवर तुटुन पडणाऱ्या अन् आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या 'जय' (T-01) वाघाचा बिट्टू बछडा! नागझिऱ्यात जन्मलेल्या अन् उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्याला पालथा घातलेल्या जय ची किर्ती जशी जगभर होती. अगदी तसाच बापाप्रमानं बिट्टू आमच्या गावगाड्यात फेमस होता.
'जय' आणि 'चांडीला' या दोन वाघांच्या पोटी बिट्टू आणि श्रीनिवास जन्माला आले. ही दोन्ही वाघं २०१४ साली उमरेड-कर्हांडला वन्यजीव अभयारण्यात जन्माला आली असली तरी तरणाबांड वाघांची कर्मभूमी असलेल्या आमच्या ब्रम्हपुरी वनविभागातच त्यांचा जीव रमला.
या भागात ते स्थिरावले, आपला साम्राज्य विस्तारला, जगले, तगले अन् नियतीच्या मनाने इथेच मेले सुद्धा!
खरंतर जंगलं अन् जंगली श्वापद जगली पाहीजेत या मताचेच आम्ही आहोत. परंतू धोरणकर्त्यांचे धोरण नुस्तेच कागदावर उपयोगाचे नाहीत. तर ते जमीनीवरही दिसलेत तर निसर्गाच्या कालचक्राप्रमाणं जगण्यात मज्जा येईल. काल बिट्टू गेला. अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषीक्त सम्राट म्हणून मिरवणारा 'सीएम' उर्फ 'छोटा मटका' (T-126) ब्रम्हा सोबतच्या युद्धात जखमी झाल्यानं त्याचेही आयुष्य आता कायमचे जेरबंद झाले. त्याची डरकाळी आता जंगलात ऐकू येणार नाही, तर ती आता पिंजऱ्यातच ऐकावी लागणार आहे. ही बाब देखील व्याघ्रप्रेमींसाठी तितकीच वेदनादायी आहे. परंतू ही गोष्ट विसरता-विसरताच असं अचानक बिट्टूचं जाणं मन हेलावून टाकणारं आहे.
त्यामुळं, भविष्यात असे दुर्दैवी घटना घडू नयेत याकरता वन व रेल्वे प्रशासनानं चालढकलं करणं सोडून यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. बल्लारशहा-चांदाफोर्ट-गोंदिया हा रेल्वेमार्ग ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, ब्रम्हपुरी वनविभागाचा बहुतांश भाग आणि नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अशा अतिसंवेदनशील वनक्षेत्रांमधून जात असल्यानं या क्षेत्राला 'वन्यजीव कॉरिडॉर' घोषित करून त्याठिकाणी Wildlife Mitigation Structures अद्ययावत करीत रेल्वे मार्गाच्या खाली किंवा वर प्राण्यांना सुरक्षितपणे मार्ग पार करता यावा यासाठी योग्य आकाराचे आणि नैसर्गिक स्वरूपाचे वन्यजीव अंडरपास आणि ओव्हरपास (पूल) बांधल्यास मोठे फायद्याचे ठरेल. रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी संवेदनशील क्षेत्रांमध्ये मजबूत आणि उंच तारांचे कुंपण (Fencing) उभारावेत ज्यामुळे प्राणी थेट ट्रॅकवर येऊ शकणार नाहीत. परंतु, हे कुंपण वन्यजीवांच्या पारंपरिक मार्गाला (कॉरिडॉरला) अडथळा न आणता, त्यांना अंडरपास/ओव्हरपासकडे वळवणारे असावेत हे ही तितकेच महत्त्वाचे आहे. यासोबतच रेल्वे मार्गाजवळ वन्यप्राण्यांची उपस्थिती ओळखण्यासाठी Thermal Imaging Cameras, Motion Sensors किंवा अन्य अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेच्या मोटरमनना त्वरित अलर्ट देणारी प्रणाली स्थापित केल्यास फार चांगल होईल.
बिट्टूला भावपूर्ण श्रद्धांजली! 🐯🌼😥
मादेशवार मंगेश | दि. १३/१०/२०२५
Sooraj Prakash Bansod