06/09/2026
संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिला दहीहंडी उत्साहात
सोलापूर : संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या वतीने जुळे सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली. साक्षी ठेंगील हिने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला. विजेत्या पथकास संभाजी ब्रिगेडच्या वतीने ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
#सुराज्यडिजिटल
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जाधव वाघमारे उपस्थित होत्या. महिलांना समान संधी देण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेडने महिला दहीहंडीचे आयोजन केल्याचे कौतुक करत, ‘‘सर्वत्र पुरुष गोविंदा दहीहंडी फोडताना दिसतात; मात्र जुळे सोलापूर येथे महिलांसाठी दहीहंडीचे आयोजन करून त्यांना ही संधी देण्यात आली, याचा निश्चितच अभिमान आहे,’’ असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
महिलांना सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या नेतृत्वगुणांना व्यासपीठ मिळावे तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या विशेष महिला दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापुरातील शिवज्ञा ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, महिलांचा उत्साह आणि उपस्थित नागरिकांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, रील स्टार प्रीती वराडे, शहराध्यक्ष सुनीता घंटे, जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा कोळी, शहराध्यक्ष वैभव गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शेळके यांनी केले. यावेळी अक्षय कांबळे, रमेश चव्हाण, ओंकार कदम, गजानन शिंदे, वैभव गंभीरे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.